कठोर तपस्वी ब्रह्मर्षि विश्वामित्र !

ब्रह्मर्षि विश्वामित्र

प्राचीन राजा ‘गाधि’ याचा धर्मात्मा पुत्र राजा विश्वामित्र एकदा सैन्यासह एका आश्रमाजवळ येऊन पोचले. अनुपम निसर्गसौंदर्याने नटलेला दैवी आश्रम होता महर्षि वसिष्ठांचा ! आश्रमाचा संपूर्ण परिसर आनंदाने आणि निर्भयपणे विहार करणार्‍या पशू-पक्ष्यांमुळे शोभून दिसत होता. अनेक तपस्वी तिथे साधना करत होते. जणू दुसरा ब्रह्मलोकच तो ! महाबली विश्वामित्रांचे महर्षि वसिष्ठांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. राजाने महर्षि वसिष्ठांच्या आश्रमाच्या दिव्यत्वाचे दर्शन घेतले. दोघे भेटीने धन्य झाले.

कामधेनूची अभिलाषा !

महर्षि वसिष्ठांकडे शबला नावाची इच्छित वस्तू उत्पन्न करून देणारी कामधेनू होती. महर्षि वसिष्ठांनी तिला राजा विश्वामित्रांसाठी रुचकर भोजन, तसेच वस्त्र अन् द्रव्यालंकारही देण्यास सांगितले. कामधेनु शबलेने महर्षि वसिष्ठांचे आज्ञापालन करत नाना प्रकारच्या रुचकर भोजनाने भरलेली सहस्रो चांदीची ताटे उत्पन्न केली. दिव्य असे वस्त्रालंकारही विश्वामित्रांना देण्यासाठी उत्पन्न केले. महर्षि वसिष्ठांनी राजा विश्वामित्रांसह त्यांच्या एक अक्षौहिणी सैन्याला भोजन आणि द्रव्य देऊन संतुष्ट केले. हे सर्व पाहून ‘कामधेनू शबला आपल्याकडे असावी’, असा लोभ विश्वामित्रांच्या मनात निर्माण झाला. महर्षि वसिष्ठांनी विश्वामित्राच्या मनातील लोभ त्यांनी जाणला. ते म्हणाले, ‘‘हे राजन्, माझा जीवननिर्वाह सर्वकाही या शबलेवरच अवलंबून आहे.’’ यावर विश्वामित्रांनी त्यांना सुवर्णालंकारांनी विभूषित असे १४ सहस्र हत्ती, ४ श्वेत घोडे जुंपलेले ८०० सुवर्णाचे रथ, ११ सहस्र घोडे आणि १ कोटी गायी देताे, असे सांगितले. महर्षि वसिष्ठांनी पुन्हा त्याच नम्रतेने पण निर्धारपूर्वक विश्वामित्रांना नकार दिला. तेव्हा विश्वामित्र बळजोरीने शबलेला घेऊन निघाले. त्यामुळे शबला गायही क्रोधित झाली. तिने राजाच्या शेकडो सैनिकांना जोरदार झटका दिला आणि त्यांच्या हातून सुटून ती वेगाने महर्षि वसिष्ठांजवळ पोचली. अतिशय विनययुक्त वाणीने शबला गाय म्हणाली, ‘‘हे ऋषिवर्य, ब्राह्मणामध्ये क्षत्रियांपेक्षा अधिक दिव्य बळ असते. आपल्या सेवेमुळेच या सिद्धी मला प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा आपण मला आज्ञा करावी. मी त्या दुरात्मा राजाचे बळ आणि त्याचा अभिमान नष्ट करून टाकते.’’

राजा विश्वामित्रांचे गर्वहरण !

कामधेनूचे सांगणे ऐकून महर्षि वसिष्ठांनी शबलेला आज्ञा केली, ‘‘शत्रूसेनेला नष्ट करणार्‍या सैनिकांची सृष्टी कर.’’ वसिष्ठांचा हा आदेश ऐकून कामधेनू शबलेने एकच हुंकार भरला. त्यासरशी शेकडो वीर उत्पन्न झाले. विश्वामित्रांनी त्या वीरांशी मोठे युद्ध केले; परंतु शबलेने उत्पन्न केलेल्या त्या वीरांनी विश्वामित्रांच्या संपूर्ण सेनेचा तात्काळ संहार केला. आता विश्वामित्रांचे १०० पुत्र वसिष्ठांवरच तुटून पडले. तेव्हा महर्षि वसिष्ठांनी केवळ एक हुंकार भरताच सर्व जण जळून भस्म झाले. पुत्र आणि सेना दोन्ही मारले गेल्याने विश्वामित्र लज्जित झाले. राजा विश्वामित्रांचे गर्वहरण झाले.

‘राजर्षि’ पद आणि महर्षि वसिष्ठांशी युद्ध !

आता विश्वामित्रांना कळून चुकले की, केवळ क्षात्रतेज असून उपयोग नाही, तर त्याला साधनेची, तपश्चर्येची जोड देणे आवश्यक आहे. मग हिमालयात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप केले. भगवान शंकरांनी सर्व अस्त्रे त्यांच्या हृदयात स्फुरित होण्याचा इच्छित वर दिला. विश्वामित्रांना पुष्कळ गर्व झाला. त्या अस्त्रांचा उपयोग करून वसिष्ठांचे सारे तपोवन नष्ट करून टाकले. वसिष्ठ यमदंडासारखा भयंकर ब्रह्मदंड घेऊन ते तात्काळ विश्वामित्रांचा सामना करण्यास सिद्ध झाले. विश्वामित्रांनी महर्षि वसिष्ठांवर अस्त्रे सोडली; परंतु त्या ब्रह्मदंडाच्या महान सामर्थ्यामुळे त्या अस्त्रांचा महर्षींवर कोणताच परिणाम होत नसे. उलट महर्षींपाशी पोचताच ती अस्त्रे त्यांच्या चरणांवर पुष्प होऊन समर्पित होत असत. विश्वामित्रांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला; परंतु महर्षि वसिष्ठांच्या ब्राह्मतेजापुढे महाभयंकर ब्रह्मास्त्रही शांत झाले. विश्वामित्रांना कळून चुकले की, तपश्चर्येमुळे प्राप्त झालेले तेजच खरे बळ आहे.

कठोर तपश्चर्या !

विश्वामित्रांनी ब्रह्मदेवाच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली. आणि ‘राजर्षि’ पद मिळवले. विश्वामित्रांनी पुनः १ सहस्र वर्षे घोर तपश्चर्या आरंभली. त्याचे फळ म्हणून ‘ऋषि’ हे पद मिळाले. विश्वामित्र पुन्हा घोर तपश्चर्या करू लागले. मेनकेने त्यांची तपश्चर्या भंग केली. मेनका विश्वामित्रांसह १० वर्षे राहिली. त्यानंतर ‘ब्रह्मर्षि पद प्राप्त करावयाचे आहे’, याची त्यांना आठवण झाली. त्यांना खंत वाटली. ‘काम’ आणि ‘मोह’ या दोषांमुळे आपली आतापर्यंतची तपश्चर्या व्यर्थ गेली’, याविषयी त्यांना पुष्कळ पश्चात्ताप झाला. ते हिमालयात पुन्हा एकदा अत्यंत कठोर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. त्यांनी एवढे कठोर तप चालू केले की, देवतांनी त्यांना अखेरीस ‘महर्षि’ पदवी दिली. विश्वामित्रांनी पुन्हा अत्यंत कठोर, घोर तपश्चर्या आरंभ केली. दोन्ही हात उंच करून कुठल्याही आधाराविना उभे रहाणे, केवळ वायूभक्षण करणे, थंडीच्या दिवसांत रात्रंदिवस पाण्यात उभे रहाणे अशा प्रकारे त्यांची सहस्रो वर्षे तपश्चर्या झाली. देवांच्या सांगण्यावरून रंभेने अत्यंत सुंदर रूप धारण करून विश्वामित्रांना भुलवण्यास आरंभ केला. शेवटी संयम न राहिल्याने विश्वामित्र अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी रंभेला शाप दिला. काम आणि मोह यांच्यावर तर नियंत्रण मिळवले; पण अजून क्रोधावर नियंत्रण प्राप्त झाले नाही. क्रोधामुळे केलेली साधना वाया गेली होती. या जाणिवेनंतर विश्वामित्रांच्या चित्ताला शांती मिळेनाशी झाली; पण यावर उपाय एकच होता. त्यांनी पुन्हा एकवार अतीघोर प्रतिज्ञा करून न खाता-पिता अत्यंत दुष्कर तपश्चर्या केली. त्यांनी केलेल्या या प्रतिज्ञेला संपूर्ण विश्वात कुठेही तोड नव्हती. १ सहस्र वर्षे पूर्ण होईपर्यंत विश्वामित्र एखाद्या काष्ठाप्रमाणे तप करत राहिले. जेव्हा १ सहस्र वर्षांच्या तपश्चर्येचे त्यांचे व्रत पूर्ण झाले, त्या वेळी त्यांनी अन्न ग्रहण करण्याचे ठरवले. तेवढ्यात देवराज इंद्र ब्राह्मणाचा वेष घेऊन तेथे आला आणि त्यांच्याकडे अन्नाची याचना करू लागला. त्यांनी सर्व भोजन त्या ब्राह्मण वेषातील इंद्राला दिले. इतक्या दीर्घकाळ केलेल्या अत्यंत कठोर तपश्चर्येमुळे देवता, ऋषि सर्वच थक्क झाले. अनेक प्रकारे त्यांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न करूनही त्यांची तपश्चर्या चालूच होती. त्या उग्र तपश्चर्येमुळे देवतांनी अखेर त्यांना ब्रह्मर्षि पद दिले; परंतु विश्वामित्रांना वाटत होते की, ‘वसिष्ठांनी मला स्वतःच्या मुखातून ब्रह्मर्षि संबोधून मान्यता द्यावी’; परंतु विश्वामित्रांचे ब्रह्मर्षि वसिष्ठांपुढे जाण्याचे धाडस नव्हते. ते वसिष्ठांच्या आश्रमात तर पोचले; पण दडून बसले होते. वसिष्ठ प्रसन्न मनाने पत्नी अरूंधतीसह अंगणात बसले होते. अरुधंती वसिष्ठांना म्हणाली, ‘‘किती छान आणि प्रसन्न चांदणे पडले आहे.’’ वसिष्ठ म्हणाले, ‘‘अगदी विश्वामित्रांच्या तपस्येसारखे अमृतसिंचन होत आहे.’’ विश्वामित्रांनी ब्रह्मर्षि वसिष्ठांचे बोलणे ऐकले. त्यांनी पुढे येऊन वसिष्ठांच्या चरणांवर डोके ठेवले. पश्चात्तापाचे अश्रू त्यांच्या नेत्रांतून ओघळू लागले. वसिष्ठांनी विश्वामित्रांना छातीशी धरले. विश्वामित्रांच्या आनंदाला उधाण आले !

(संदर्भ : भक्तीसत्संग क्र. २९३, सनातन संस्था)