दक्षिण चीन समुद्रात चीन-फिलिपाईन्स यांच्या सैनिकांमध्ये चकमक

फिलीपिन्सच्या सागरी जहाजांवर हल्ला करताना एका चिनी तटरक्षक दलाच्या जवानाला कुऱ्हाडीचा वापर करताना कॅमेऱ्यात पकडण्यात आले.

मनिला (फिलिपाईन्स) – दक्षिण चीन समुद्रात १७ जून या दिवशी चीन आणि फिलिपाईन्स यांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. या वेळी चीनच्या सैनिकांनी कुर्‍हाडी आणि धारदार शस्त्रे यांद्वारे आक्रमण केल्याचा दावा फिलिपाईन्सने केला आहे. या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात चिनी सैनिकी त्यांच्या नौकांवर हातात शस्त्रे घेऊन उभे असलेले दिसत आहेत.

याविषयी फिलिपाईन्सच्या सैन्याधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देतांना सांगितले की, चिनी तटरक्षक दलाचे अधिकारी बेकायदेशीरपणे आमच्या नौकांवर चढले होते. या वेळी त्यांनी अनेक रायफलही लुटल्या. त्यांनी नौकांवरील उपकरणे नष्ट केली, तसेच नौकांवर शस्त्रांद्वारे वार केले. त्यांनी आमच्या सैनिकांचे भ्रमणभाषही हिसकावले.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, फिलिपाईन्सच्या नौकेतून शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात होते. त्यांच्या सैनिकांनी आमच्या नौकेला आधी धडक दिली होती. त्यानंतर आमच्या अधिकार्‍यांनी त्यांच्यावर कारवाई केली.