|
नवी देहली – नरेंद्र मोदी सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा ९ जूनला राष्ट्रपती भवनात होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतच्या शेजारी असलेले श्रीलंका, मालदीव, सेशेल्स, बांगलादेश, मॉरिशस, नेपाळ, भूतान इत्यादी देशांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे; परंतु पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले आहे. वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले होते; पण २०१९ मध्ये त्यांनी पाकिस्तानला निमत्रण दिले नव्हते. शपथविधी सोहळ्याला ८ सहस्र महनीय व्यक्ती उपस्थित असणार आहेत.
देहलीत कडेकोट सुरक्षाव्यवस्था
१. देहलीत काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘जी-२०’ परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळेप्रमाणे शपथविधीच्या कार्यक्रमाला चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षाव्यवस्थेचा देहली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी आढावा घेतला आहे.
२. कडेकोट सुरक्षाव्यवस्था राखण्यासाठी शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. १० जून पर्यंत शहरात ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
३. शपथविधी सोहळ्याच्या दिवशी, म्हणजे ९ जून या दिवशी देहलीला ‘नो फ्लायिंग झोन’ (हवाई वाहतुकीस मनाई) घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी या परिसरातून कुठलेही विमान, हेलिकॉप्टी आदी उड्डाण करू शकणार नाही.
४. सुरक्षाव्यवस्थेसाठी देहली पोलीस, राष्ट्रपती सुरक्षा रक्षक, गुप्तचर विभागाचे पथक, सुरक्षादलाचे ब्लॅक कॅट कमांडोज आणि एन्.डी.आर्.एफ्. पथक तैनात करण्यात आले आहे.