PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला या वेळीही शेजारी देशांच्या प्रमुखांना आमंत्रण

८ ऐवजी ९ जून या दिवशी होऊ शकतो शपथविधी

नवी देहली – नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी शेजारील देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात येत आहे. हा शपथविधी सोहळा ८ किंवा ९ जून या दिवशी होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. अद्यापही हा दिनांक अंतिम झालेला नाही.

श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान प्रचंड, तसेच मॉरिशस आणि भूतान यांच्या प्रमुखांचा शपथविधी सोहळ्यामध्ये समावेश असेल. श्रीलंकेचे अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी निवडणूक जिंकल्याविषयी पंतप्रधान मोदी यांचेे अभिनंदन करण्यासाठी दूरभाष केला होता. या वेळी मोदी यांनी त्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले. बांगलादेशाच्या पंतप्रधानांशी दूरभाषवर झालेल्या संभाषणात मोदी यांनी त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनीही मोदी यांना दूरभाष करून त्यांचे अभिनंदन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनीही पंतप्रधान मोदी यांना दूरभाष करून त्यांच्या विजयासाठी त्यांचे अभिनंदन केले. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, मालदीव, फ्रान्स, इस्रायल, जपान यांच्यासह ९० हून अधिक नेत्यांनी मोदी यांचे अभिनंदन केले.