५.५.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना होणारे तीव्र शारीरिक त्रास आणि त्यावर केले जाणारे उपचार’ पाहिले. आता या भागात ‘अशा स्थितीतही त्यांनी कशा सेवा केल्या ?’ ते येथे दिले आहे.
या पूर्वीचा भाग बघण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/790740.html
(भाग १५)
७. तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही गुरुकृपेने झालेल्या सेवा !
‘मला पुष्कळ शारीरिक त्रास होत असल्यामुळे व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा करणे कठीण झाले होते. तरीही गुरुकृपेने देवाने माझ्याकडून पुढील सेवा करून घेतल्या.
७ अ. देवद आश्रमातील साधकांचे शुद्धीकरण सत्संग घेणे : डिसेंबर २०११ पासून मला गुरुकृपेने देवद आश्रमतील साधकांचे शुद्धीकरण सत्संग (स्वभावदोष निर्मूलन सत्संग-टीप १) घेण्याची सेवा मिळाली. हे सत्संग सकाळी ९.३० ते १२.३०, दुपारी ३ ते रात्री ८ पर्यंत चालायचे. दुपारचा सत्संग चहासाठी मध्ये अर्धा घंटा थांबवत असे. अनेक वेळा रात्री महाप्रसादानंतरही हे सत्संग चालू होत ते रात्री ११.३० वाजेपर्यंत चालत असत.
दुपारी महाप्रसाद घेतल्यावर मी दुपारी १ ते २ आराम करत असे. नंतर थोडा वेळ परात्पर गुरु पांडे महाराज माझ्यावर नामजपादी उपाय करायचे आणि माझ्या पाठीला थोेडे मर्दनही करायचे. त्यांच्या उच्च आध्यात्मिक पातळीचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत असे.
७ अ १. उठून बसू शकत नसल्यामुळे चूक सांगणार्या साधकांचा केवळ आवाज ऐकू शकणे आणि ध्वनीवर्धक हातात धरून बोलता येण्याएवढी शक्ती नसल्यामुळे तो तोंडासमोर ‘स्टँड’वर लावला जाणे : आश्रमातील जुन्या इमारतीच्या तळमजल्यावरील मोकळ्या जागी माझ्यासाठी पलंग ठेवला जात असे. मी पलंगावर झोपूनच असायचो आणि चुकांशी संबंधित साधक माझ्यासमोर भूमीवर खाली बसायचे. जो साधक बोलत असेल, त्याचा मला केवळ आवाज ऐकू येत असे; पण मला उठता येत नसल्याने मी उठून त्याला पाहूही शकत नव्हतो. माझ्या अंगात शक्ती नसल्यामुळे ‘मी बोलत असलेले सगळ्यांना ऐकू जावे’, यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा लावली जात असे. मी ध्वनीवर्धक हातात धरून बोलू शकत नसल्याने ‘तो माझ्या तोंडासमोर येईल’, अशा ‘स्टँड’वर लावला जात असे.
७ अ २. शुद्धीकरण सत्संग घेतांना अनुभवलेली गुरुकृपा ! : मला पुष्कळ शारीरिक थकवाही असल्यामुळे सत्संग चालू असतांना सतत ग्लानी येत असे. असे असले, तरी मला बोलायचे असेल, तेव्हा गुरुदेवांच्या कृपेमुळे मी बरोबर जागा होत असे आणि जणू ‘मी साधकांचे सर्व बोलणे ऐकले आहे’, अशा प्रकारे त्या सत्संगात बोलत असे ! त्या कालावधीत मला अशी अनुभूती पुष्कळ वेळा आली.
हे शुद्धीकरण सत्संग जवळपास ६ मास चालू होते. हे सत्संग आठवड्यातून ४ – ५ दिवस असायचे आणि उरलेल्या दिवसांत ‘चैतन्य वाहिनी’ची (टीप २) सेवा असायची.
७ आ. गुरुदेवांच्या कृपेने महाराष्ट्रातील इतर साधकांचेही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी सत्संग घेणे : गुरुदेवांच्या कृपेने मे २०१२ पासून मी महाराष्ट्रातील नागपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, जळगाव, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांतील, तसेच बेळगाव (कर्नाटक) येथील साधकांसाठी स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे सत्संग घेण्याची सेवा केली. मी देवद, पनवेल येथील आश्रमात असल्याने मी ते सत्संग ‘ऑनलाईन’ घेतले. जिल्ह्यांच्या विस्तारानुसार हे सत्संग साधारण २ ते ४ आठवडे चालायचे. प्रत्येक जिल्ह्याचा स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचा सत्संग झाल्यानंतर मी महत्त्वाच्या आणि गंभीर चुकांच्या चौकटी अन् साधकांच्या अयोग्य दृष्टीकोनावर योग्य दृष्टीकोन सांगत असे. एक साधक ते लिहून घेऊन ते पुढे संकलन विभागाला पाठवत असे.
७ आ १. महाराष्ट्रातील साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी सत्संग घेतांना त्यांच्या चुका एक आठवडा आधीच मागवून घ्याव्या लागणे आणि प्रत्यक्ष सत्संगासाठी दिनांक, वेळ इत्यादींसाठी पुष्कळ समन्वय करावा लागणे : ज्या जिल्ह्यांचे सत्संग घ्यायचे असायचे, त्या जिल्ह्यातील एकेका गावातील सर्व साधकांच्या चुका मी एक आठवडा आधी संगणकीय पत्राद्वारे मागवून घेत असे. त्यातील गंभीर चुका निवडून मी त्यांचा अभ्यास करून त्या चुका सत्संगात घेत असे. मी देवद आश्रमात असायचो आणि ज्या गावातील साधकांच्या चुका घ्यायच्या असायच्या, ते साधक त्यांच्या गावात एका ठिकाणी एकत्र यायचे. दोन्ही ठिकाणी भ्रमणभाषला ध्वनीवर्धक लावून सर्वांना सत्संग ऐकता येण्याची सोय केली जात असे. या सेवेसाठी सत्संगाच्या वेळा ठरवणे, चुका समजून घेणे इत्यादींसाठी मला जिल्ह्यांशी मोठ्या प्रमाणात समन्वय करावा लागत असे.
७ आ २. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सत्संगही दुपारी दीडपासून सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत चालू असायचे. केवळ चहासाठी मध्ये अर्धा घंटा सत्संग थांबवत असे.
७ आ ३. भ्रमणभाष तोंडाजवळ घेऊन मोठ्याने बोलतांना थकवा येणे; म्हणून नंतर वजनाने हलका ध्वनीवर्धक छातीवर ठेवून बोलणे : तेव्हा आतासारखे ‘स्मार्ट फोन’ नव्हते. साध्या भ्रमणभाषवर तो तोंडाजवळ घेऊन मोठ्याने बोलावे लागायचे. त्यामुळे मी बोलतांना पुष्कळ थकून जात असे. ‘मोठ्याने बोलता येईल’, अशी माझी स्थिती नव्हती. नंतर वजनाने हलका ध्वनीवर्धक मिळाला. तो छातीवर ठेवून मी बोलत असे. साधक काही सांगत असतांना त्यांना ‘हां’, ‘हो’, एवढा प्रतिसाद देण्यासही मला कष्ट पडत; म्हणून मी देवद येथील उत्तरदायी साधकांना ‘तुम्ही साधकांना प्रतिसाद देत जा’, असे सांगत असे.
८. शारीरिक क्षमता नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने एक वर्ष ‘ऑनलाईन’ सत्संगात बोलू शकणे
नंतर माझ्या पोटाचे स्नायू अत्यंत कमजोर झाले. बोलण्यासाठी स्नायूंमध्ये लागणारे बळही माझ्यात नव्हते. झोपून बोलायला अधिक बळ लागते; म्हणून वैद्यांनी मला न बोलता झोपून रहायला सांगितले होते; पण प.पू. गुरुदेवांनी मला सत्संगात दिवसभर बोलण्याचीच सेवा दिली होती. ‘श्री गुरूंचे आज्ञापालन करणे’, हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे माझी शारीरिक क्षमता नसतांनाही मी श्री गुरूंचा संकल्प आणि श्री गुरूंचे सामर्थ्य यांमुळे वर्षभर ‘ऑनलाईन’ सत्संगात बोलू शकलो !
९. भारतभरातून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणे
हे सत्संग चालू असतांनाच एप्रिल २०१२ ते मे २०१३ पर्यंत मी महाराष्ट्र आणि भारतातील अन्य भागांतून येणार्या साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा केली. तेव्हा भारतभरातून ३५ साधक देवद आश्रमात आले होते. ‘त्या प्रत्येक साधकाशी वैयक्तिक बोलणे, त्यांच्या साधनेचा आढावा घेणे, त्यांचा एकत्रित साप्ताहिक सत्संग घेणे’, अशा सेवाही चालू झाल्या. साधकांची व्यष्टी साधना चांगली चालू झाल्यावर ते साधक परत जात असत आणि त्यांच्या जागी नवीन साधक येत असत. असे हे सत्संगही वर्षभर चालू राहिले होते.
१०. एप्रिल २०१३ मध्ये पुन्हा देवद आश्रमातील साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी सत्संग घेणे
एप्रिल २०१३ मध्ये पुन्हा एक मासासाठी मला (सौ.) अश्विनी पवार (वर्ष २०१७ मध्ये त्या सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत झाल्या.) यांच्या समवेत देवद आश्रमातील साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सत्संग घेण्याची सेवा मिळाली. सत्संग चालू असतांना मी पलंगावर पडून असलो, तरी मला काही सांगायचे असल्यास मी थोडा वेळ बसून सांगू शकत होतो. तेव्हा मला ५ – ७ मिनिटांसाठी बसायला जमू लागले होते. त्यानंतर एप्रिल २०१४ पासून अश्विनीताई यांच्या समवेत देवद आश्रमातील पुढचे शुद्धीकरण सत्संग चालू झाले. ते साधारण ६ मास चालू होते. हे सत्संग दुपारी चालू व्हायचे ते सायंकाळपर्यंत चालायचे.
११. गुरुकृपेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी लिखाण करणे
व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ‘एखाद्या स्वभावदोषावर कशी मात करावी ?’, ‘अहं अल्प करण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ?’, ‘स्वभावदोष निर्मूलनातील अडचणी आणि उपाय’, अशा विषयांवर गुरुकृपेने देवाने माझ्याकडून लिखाण करून घेतले, म्हणजे मी ते सांगत असतांना एक साधक ते लिहून घेत असे. शारीरिक स्थिती कितीही प्रतिकूल असली, तरीही प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला या सर्व सत्संगांना उपस्थित रहाता येत असे. गुरुदेवच ती सेवा माझ्याकडून करून घेत असत ! ‘अशक्यही शक्य करतील स्वामी !’, हेच मी सतत अनुभवले.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण ! (क्रमशः पुढच्या रविवारी)
इदं न मम ।’ (हे लिखाण माझे नाही !)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.३.२०२४)
|