कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव सोहळा २४ एप्रिलला रात्री भाविकांच्या अलोट गर्दीत आणि अपार उत्साहात पार पडला. वर्ष १८२४ पासून हा रथोत्सव चालू आहे. हा रथोत्सव भक्ती आणि शक्तीचा उत्सव मानला जातो. चैत्र पौर्णिमेला जोतिबा येथील यात्रा झाल्यावर प्रत्येक वर्षी हा रथोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. यंदाच्या उत्सवासाठी सागवानी लाकडाचा नवीन रथ सिद्ध करण्यात आला होता. त्यावर आकर्षक असा चांदीचा पत्रा बसवण्यात आला आहे. फुलांनी आणि विद्युत् रोषणाईने सजलेल्या या रथावर श्री महालक्ष्मीदेवीची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक श्री. महादेव दिंडे, महालक्ष्मी भक्त मंडळाचे श्री. राजू मेवेकेरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. रथोत्सवाच्या मार्गावर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि त्यावर फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या होत्या. महाद्वार रस्ता, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे रथ पुन्हा मंदिरात आला. ‘करूया उदो उदो अंबाबाईचा…’च्या जयघोषात भाविक अपार भक्तीत डुंबून गेले. अनेक भाविक, परिसरातील मंडळे यांनी फुटाणे, खडीसाखर, शिरा यांचे वाटप केले.