नवी देहली – देशातील प्रमुख अन्वेषण यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्धचे गुन्हे यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी देशातील प्रमुख अन्वेषण यंत्रणांना दिला. ‘सीबीआय’च्या स्थापना दिनानिमित्त डी.पी. कोहली स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘तंत्रज्ञानामुळे वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे अन्वेषण यंत्रणेसाठी जटिल आव्हाने निर्माण होत आहेत’, असेही सांगितले.
सनन्यायाधीश पुढे म्हणाले की, सीबीआयला ‘भ्रष्टाचारविरोधी अन्वेषण यंत्रणा’ या त्याच्या भूमिकेच्या पलीकडे विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांचे अन्वेषण करण्यास सांगितले जात आहे. मला वाटते की, आपण प्रमुख अन्वेषण यंत्रणांचा विस्तार फार अल्प केला आहे. त्यांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षेशी आणि देशाविरुद्धचे आर्थिक गुन्हे, यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
ब्रिटिशकालीन कायदे पालटल्याविषयी केंद्र सरकारचे कौतुक !
या वेळी सरन्यायाधिशांनी ब्रिटीश काळातील कायदे पालटून त्याजागी आणलेल्या नवीन कायदे आणल्याविषयी केंद्र सरकारचे कौतुक करत ‘न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे’, असे सांगितले. ते म्हणाले की, भारतीय नागरी संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा पुराव्यांचा अखंड प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक दृष्टीकोन प्रदान करतात.