नवी मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त २८ मार्च या दिवशी वाशी, तुर्भे, सानपाडा परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१. शिवप्रतिष्ठानच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे २७ मार्च या दिवशी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शिवप्रेमींसाठी दोन दिवस हे प्रदर्शन खुले असणार आहे. सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पहाण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
२. २८ मार्च या दिवशी पहाटे रायगड येथून वाशी येथे शिवज्योत आणण्यात येणार आहे. सकाळी विविध विभागातील शिवप्रेमी वाशी येथे येऊन छत्रपतींना अभिवादन करून येथून शिवज्योत आपापल्या परिसरात नेऊन तेथे कार्यक्रम घेणार आहेत.
रायगड येथून आणलेला मातीचा मंगलकलशही त्यांना देण्यात येणार आहे. संपूर्ण चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे विठ्ठल मोरे यांनी दिली.
ए.पी.एम्.सी. मार्केट येथे शिवजयंती निमित्त पुणेरी ढोल-ताशांच्या पथकात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गणेश म्हांगरे यांनी दिली.
सानपाडा येथे हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानात सानपाडा सामजिक संस्थेच्या वतीने शिवयंती उत्सव होणार आहे. यामध्ये सायंकाळी शिवप्रतिमा पूजन, लाठीकाठी, तलवारबाजी प्रत्यक्षिके, प्रा. प्रदीप कदम यांचे शिव व्याख्यान, स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मिलिंद सूर्यराव यांनी दिली.
शिवबा मित्र मंडळ आणि सानपाडा युवा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा गावात शिवसेना शाखेजवळ सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर, शिवप्रतिमा पूजन, सत्यनारायण पूजा, सायंकाळी भव्य मिरवणूक सोहळा आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सोमनाथ वास्कर यांनी दिली.
श्री दत्तगुरु बालगोपाळ उत्सव मंडळ आणि शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी सेक्टर १५ येथे शिवप्रतिमा पूजन, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, आरोग्य तपासणी, ‘होम मिनिस्टर’ आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती दर्शन भणगे यांनी दिली.