Bhojshala Survey : भोजशाळेच्या सर्वेक्षणाला प्रारंभ !

सर्वेक्षणाला स्थगिती देण्याच्या मागणी करणार्‍या मुसलमान पक्षाच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

नवी देहली – मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील भोजशाळेच्या सर्वेक्षणाला पुरातत्व विभागाने आरंभ केला आहे. या सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या मुसलमान पक्षाच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मौलाना कमालउद्दीन वेलफेअर सोसायटीने ही याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. यात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने दिलेल्या सर्वेक्षणाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी पत्रकारांना सांगितले की,

न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आज (२२ मार्च) सकाळपासून सर्वेक्षण चालू केले. मुसलमान पक्षाने या सर्वेक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने लगेचच त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला. सध्या या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार नाही.

सर्वेक्षण चालू रहाणार आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात कोणतीही नवीन दिनांक सुनावणीसाठी निश्‍चित केलेली नाही. नवीन दिनांक देण्यात येईपर्यंत तरी सर्वेक्षण चालू रहाणार आहे.

भोजशाळेच्या सर्वेक्षणाला प्रारंभ

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पथकाने भोजशाळा परिसराचे सर्वेक्षण चालू केले. स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह १२ जणांचे पथक सकाळी येथे पोचले. सर्वेक्षणाचे काम २२ मार्चला दोन टप्प्यांत केले गेले. सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण झाले. शुक्रवार असल्याने नमाजासाठी काही वेळ काम थांबवण्यात आले.

सर्वेक्षणानंतर आमच्या बाजूने अनेक भक्कम पुरावे मिळतील ! – भोज उत्सव समिती

भोज उत्सव समितीचे सरचिटणीस सुमित चौधरी म्हणाले की, भोजशाळा राजा भोज यांनी बांधली होती. असे अनेक पुरावे आहेत, ज्यावरून येथे हिंदूंचे मंदिर असल्याचे स्पष्ट होते. येथे हवनकुंड आहे. देवतांच्या प्रतिमाही आहेत. अंतर्गत सर्वेक्षणानंतर आमच्याकडे अनेक सबळ पुरावे असतील, जेणेकरून आमच्या बाजूने निर्णय घेता येईल.

६० कॅमेर्‍यांच्या साहाय्याने सर्वेक्षणावर लक्ष !

सर्वेक्षणासाठी देहली आणि भोपाळ येथील पथक आले आहे. सर्वेक्षणासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. इंद्रजित बकलवार यांच्या सह १७५ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच ६० कॅमेर्‍यांच्या साहाय्याने या भागावर लक्ष ठेवले जात आहे. धारचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, आम्ही सर्वेक्षण पथकाला त्याच्या कार्याशी संबंधित सर्व आवश्यक साहाय्य पुरवले आहे. पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे काम चालू असतांना आणि सध्या शहरात शांतता आहे.