इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाचे प्रदर्शन २९ फेब्रुवारीपर्यंत करणार नाही ! – ‘नेटफ्लिक्स’

‘नेटफ्लिक्स’चे मुंबई उच्च न्यायालयात आश्वासन !

मुंबई – शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिच्यावर आधारित ‘ओटीटी (ओव्हर द टॉप) व्यासपिठावरून प्रदर्शित होणार्‍या माहितीपटाचे प्रदर्शन २९ फेब्रुवारीपर्यंत केले जाणार नाही, असे ‘नेटफ्लिक्स’च्या वतीने २१ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. प्रकरणाच्या अन्वेषणाशी संबंधित सीबीआयच्या अधिकार्‍यांना हा माहितीपट दाखवण्यासाठी विशेष आयोजन करण्याचे आदेशही न्यायालयाने ‘नेटफ्लिक्स’ला दिले आहे.

सौजन्य एबीपी माझा 

‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : द बरिड ट्रुथ’ या माहितीपटाला स्थगिती देण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २१ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची नोंद घेऊन माहितीपटाचा भाग असलेल्या खटल्यातील उर्वरित साक्षीदारांची माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने ‘नेटफ्लिक्स’ला दिले होते.