Gyanvapi Survey : ज्ञानवापी मशिदीच्या टाळे ठोकलेल्या भागात भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण व्हावे  !

हिंदु पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

नवी देहली – ज्ञानवापी प्रकरणात हिंदु पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. न्यायालयाने १९ मे २०२३ या दिवशी ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंग सापडलेल्या परिसरामधील जागेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणावर बंदी घातली होती. हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेतून ही बंदी उठवण्यात यावी, तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना या जागेचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. या माध्यमातून सीलबंद भागात असलेल्या शिवलिंगाचे स्वरूप आणि त्याच्याशी निगडित इतर वस्तूस्थिती कोणतीही हानी न होता तपासता येईल.

१. या याचिकेत ‘आवारात बांधण्यात आलेल्या नवीन भिंती, तसेच छत हटवूनच सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याखेरीज इतर टाळे ठोकलेल्या ठिकाणीही उत्खनन आणि इतर शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करून त्याचा अहवाल न्यायालयाला देण्यात यावा’, अशी मागणी करण्यात आली आहे.

२. अधिवक्ता जैन यांनी वजूखानाचे (नमाजाच्या वेळी हात आणि पाय धुण्याच्या जागेचे) पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे सांगितले होते. यावरून ते ‘शिवलिंग’ आहे कि कारंजे, हे स्पष्ट होईल. सध्या वजूखान्याच्या परिसराला टाळे ठोकण्यात आले आहे. त्याची देखरेख सध्या वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे आहे.

३. अलीकडेच वजूखान्याच्या परिसराचे पुरातत्व विभागाने केलेले सर्वेक्षण उघड करण्यात आले होते. यावरून येथे मंदिर तोडून मशीद बांधल्याचे निष्पन्न झाले होते.