रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत व्यक्ती झाली जिवंत !

दर्शनपाल

चंडीगड – रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना शारीरिक दुखापती झाल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. यात काहींचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र या खड्ड्यांमुळे मृत व्यक्ती जिवंत झाल्याची आश्‍चर्यजनक घटना हरियाणा राज्यातील करनाल येथे घडली आहे.

सौजन्य घरदार 

८० वर्षीय दर्शनपाल यांना पतियाळातील रुग्णालयात उपचार चालू असतांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दर्शनपाल यांचे कुटुंबीय त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावी घेऊन जात होती. वाटेत केथल आणि निसिंग या गावांच्या जवळ रस्त्यात रुग्णवाहिकेचा टायर एका खड्ड्यात गेला. त्यामुळे रुग्णवाहिकेला जोरात धक्का बसला. तेव्हा दर्शनपाल यांच्या कुटुंबियांना त्यांचा हात हलतांना दिसला. त्यांनी हाताची नस तपासून पाहिली. दर्शनपाल जिवंत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दर्शनपाल यांना घेऊन तातडीने निसिंगमधील रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी दर्शनपाल यांना तपासल्यावर ते जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले. दर्शनपाल यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. दर्शनपाल यांची स्थिती आधीपेक्षा बरी असल्याचे डॉ. नेत्रपाल यांनी सांगितले. काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल आणि नंतर यांनी डिस्चार्ज दिला जाईल.