धामंत्री, ता. तिवसा (अमरावती) – २० जानेवारी या दिवशी श्री महेश भवन, अमरावती येथे एकदिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर श्री नागेश्वर महादेव संस्थान, धामंत्री येथे मंदिर व्यवस्थापन, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने तिवसा, धामणगाव आणि चांदूर रेल्वे, तसेच अन्य भागांतील मंदिर विश्वस्तांची सभा पार पडली. यात मंदिर परिषद घेण्याचा उद्देश, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य यांची माहिती देण्यात आली. मंदिरांनी त्यांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. मंदिरांच्या समस्या सोडवणे, मंदिरांना धर्मशिक्षणाचे केंद्र बनवणे, तसेच मंदिरांत वस्त्रसंहितेचे फलक लावण्ो यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सभेला १२५ हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी महासंघाच्या वाटचालीत सहभागी होऊन कार्य करण्याचा संकल्प केला. मंदिराचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा निमंत्रक श्री. कैलास पनपालिया यांनी प्रस्तावना, तर सौ. पल्लवी पनपालिया यांनी सूत्रसंचालन केले.
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. जनार्दन पंत बोथेगुरुजी, श्री क्षेत्र जहागीरपूर महारूद्र मारोती संस्थानचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश परतानी, संत श्री. लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडचे अध्यक्ष श्री. अशोक पावडे, श्री. कमलकिशोरजी पनपालिया, श्री नागेश्वर महादेव संस्थानचे अध्यक्ष श्री. कैलास पनपालिया, संत श्री आडकुजी महाराज संस्थानचे सचिव श्री. अभिजीत बोके, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे महाराष्ट्र पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल हे व्यासपिठावर उपस्थित होते. श्री पिंगळादेवी संस्थान, श्री. कोंडेश्वर संस्थान, संत गुलाबबाबा संस्थान, संत अच्युत महाराज संस्थान, संत भिकाजी महाराज संस्थान, संत अवधूत महाराज संस्थान, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर; श्री विठोबा संस्थान सावंगा, संत पागलदास महाराज, श्री मंगलादेवी संस्थान, श्री जगदंबा देवस्थान, श्री नृसिंह संस्थान, श्री पाताळेश्वर गुप्तेश्वर संस्थान यांसह जिल्ह्यातील मंदिरांचे विश्वस्त, पुजारी उपस्थित होते.