श्री दत्ताची रूपे !

मूर्तीविज्ञान

सनातननिर्मित दत्त देवतेचे सात्त्विक चित्र

प्रत्येक देवता हे एक तत्त्व आहे. हे तत्त्व युगानुयुगे असतेच. देवतेचे तत्त्व त्या त्या काळाला आवश्यक अशा सगुण रूपात प्रगट होते, उदा. भगवान श्रीविष्णूने कार्यानुमेय धारण केलेले ९ अवतार. मानव कालपरत्वे देवतेला विविध रूपांत पुजायला लागतो. ख्रिस्ताब्द १००० च्या सुमारास दत्ताची मूर्ती त्रिमुखी झाली, त्यापूर्वी ती एकमुखी होती. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)

भक्तांनी दत्तात्रेयांची जशी उपासना केली, त्याप्रमाणे भक्तांना त्यांच्या रूपाचे दर्शन झाले आहे. अलीकडच्या काळातील संत प.प. टेंब्येस्वामी, प.पू. गगनगिरी महाराज यांना त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे दर्शन घडले होते. त्यांच्या चरित्रात तसा उल्लेखही आहे.’

दत्तपुराणातील दत्ताची विविध रूपे

‘दत्ताची विविध रूपे आणि विविध नावे आणि त्यानुसार असलेली वस्त्राभूषणे यांपैकी सर्वांना ठाऊक असलेली नावे, म्हणजे दत्तात्रेय, दत्त, गुरुदत्त, अवधूत अशी असून त्याची रूपे एकमुखी-द्विभुज, एकमुखी-चतुर्भुज आणि एकमुखी-षड्भुज, अशी आहेत. दत्तात्रेयाची राजसवस्त्रे, संन्यासी वस्त्रे आणि दिगंबर वेष प्रसिद्ध आहेत. दत्तात्रेयाच्या विविध रूपांशी विविध कथा जोडलेल्या आहेत.

१. चतुर्भुज दत्त

हे दत्तात्रयाचे पहिले सगुण साकार दर्शन आहे. ‘अत्रि’ हे ब्रह्मदेवाचे पुत्र. अत्रिऋषींनी गरुडासनात एका पायावर उभे राहून घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मा, विष्णु, महेश हे तीनही देव त्यांच्यापुढे उभे राहिले. अत्रिऋषींनी त्यांना पाहिले. त्यांच्या अंतःकरणात हे तीनही देव एकाच परमत्म्याची तीन रूपे आहेत, असा भाव असल्यामुळे त्यांनी, परमात्मा या स्वरूपात, तीन मिळून एकच देव समजून अत्यंत श्रद्धेने नमस्कार करून त्यांची स्तुती केली. त्यामुळे हे तीनही देव प्रसन्न झाले आणि त्यांनी ‘एकमुखी चतुर्भुज’, या रूपामध्ये अत्रिऋषींना त्यांच्या पुत्राच्या रूपात दर्शन दिले. शांडिल्य ऋषींनी एकमुखी चतुर्भुज रूपातील दत्ताची उपासना करून ज्ञान आणि मोक्ष मिळविला.

२. द्विभुज दत्त

ब्रह्मदेवपत्नि सावित्री, विष्णुपत्नि रमा आणि महेशपत्नि उमा, यांनी नारद महर्षिच्या मुखातून अनसुयेच्या पतिव्रत्त्याची थोरवी ऐकली. त्या तिघींनाही अनसूयेविषयी ईर्षा उत्पन्न झाली. त्यामुळे तिची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी आपापल्या पतींना अनसूयेकडे पाठवले. तीनही देव ब्राह्मणवेशांत अत्रिऋषींच्या आश्रमात आले. त्यांनी अनसूयेकडे भिक्षेची याचना करतांना, ‘तिने विवस्त्र होऊन (नग्न स्वरूपात) येऊन भिक्षा वाढावी’, अशी इच्छा प्रकट केली. अनसूयेने त्यांना ओळखले आणि आपल्या पतीच्या कमंडलूतील पवित्र पाणी घेऊन त्यांच्या अंगावर शिंपडले. त्या पाण्याच्या पावित्र्यामुळे तीनही देवांचे तान्ह्या बाळां (मुलां)मध्ये रूपांतर झाले. अनसूयेने त्यांना आपले पुत्र मानले. यातील दत्तात्रेय एकमुखी द्विभुज स्वरूपातले आहेत.

३. षड्भुज दत्त

अनसूया ही तिच्या पातिव्रत्त्यामुळे देवांना वंदनीय होती. एकदा कुशिक पत्नीने सूर्याला अडवल्यामुळे सूर्य उगवला नाही. त्याचे कारण असे झाले की, मांडव्य ऋषींना एका राजाने चोरीच्या आरोपावरून सुळावर चढवले होते. मांडव्यऋषींनी आपल्या तपोबलाने प्राणधारणा केली होती. त्याच सुमाराला कुशिकाला त्याच्या इच्छेवरून त्याची पतिव्रता पत्नी आपल्या खांद्यावरून त्याला घेऊन एका वेश्येकडे चालली होती. अंधारामध्ये पत्नीच्या खांद्यावर बसलेल्या कुशिकाचा पाय पांडव ऋषींना लागून त्यांना वेदना झाल्या. त्यामुळे त्यांनी त्याला शाप दिला की, ‘ज्याचा पाय मला लागला, तो सूर्याेदय होताच मृत होईल.’ हे ऐकताच कुशिक पत्नीने सूर्य उगवण्यास प्रत्यवाय केला. त्यामुळे पृथ्वीवर संकट ओढवले. त्याची काळजी वाटून सर्व देव अनसूयेकडे आले. एका पतिव्रतेने निर्माण केलेले संकट दुसरी पतिव्रताच हरण करील, असा त्यांना विश्वास होता. सर्व देवांसमवेत अनसूया कुशिक पत्नीकडे आली. तिने तिच्या पतीच्या जिवीत्वाची हमी दिली. कुशिक पत्नीने ते मान्य केल्यामुळे सूर्याेदय झाला. त्याच वेळी कुशिक मरण पावले; परंतु अनसूयेने आपल्या पातिव्रत्याच्या बळावर त्यांना जिवंत केले. देवांनी अनसूयेला वरदान दिले की, ‘ब्रह्मा, विष्णु, महेश हे तिच्या पोटी जन्म घेतील.’  त्यानुसार ब्रह्माच्या अंशापासून चंद्र, महेशाच्या अंशापासून दुर्वास आणि विष्णुच्या अंशापासून दत्तात्रेयांचा जन्म झाला. दत्तात्रेयांचा जन्म हा मृग नक्षत्र क्षितिजावर असतांना बुधवारी संध्याकाळी मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. हे त्यांचे रूप एकमुखी सहा हातांचे आहे. (दत्तपुराण २.५.३४-४३) सहा हातांमध्ये प्रत्येकी स्फटिकमाला, कमंडलू, डमरू, त्रिशूळ, कमळ आणि सुदर्शन चक्र आहे.