नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) – येथील हिवाळी अधिवेशनाच्या ८ व्या दिवशी म्हणजे १८ डिसेंबर या दिवशी विधीमंडळ परिसरात विरोधक अमली पदार्थ माफिया ललित पाटील प्रकरणी आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रग्जची नशा’ म्हणत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. ‘ड्रग्जने तरुणाई उद़्ध्वस्त करणार्या सरकारचा धिक्कार असो, तरुणाईला नशेच्या खाईत लोटणार्या सरकारचा धिक्कार असो, ड्रग्ज माफियांवर कारवाई न करणार्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांनी घोषणा दिल्या.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, दाऊदच्या साथीदारांसमवेत जेवायला बसलेले मंत्री गिरीश महाजन यांची चौकशी करावी. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांच्या वतीने करण्यात आली होती; मात्र सरकार विरोधकांच्या या दबावाला बळी पडले नाही. त्यामुळे केवळ १० दिवसांचे अधिवेशन होत आहे.