समाजमनावर सर्वाधिक परिणाम करणारे सध्याचे करमणूक माध्यम म्हणजे ‘चित्रपट’ ! संसदेत काँग्रेसच्या राज्यसभेच्या सदस्या रंजीत रंजन यांनी ‘ॲनिमल’ या चित्रपटावर टीका करत त्याचा समाजमनावर होणारा नकारात्मक परिणाम काही सूत्रांच्या माध्यमातून मांडला, तसेच ‘सेन्सॉर बोर्डा’वरही शंका उपस्थित केली. प्राणी प्रजातीतील शक्तीशाली नर मादी निवडते. विदेशी विचारसरणीनुसार या शक्तीमान नराला ‘अल्फा’ असे संबोधले जाते. शारीरिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या शक्तीशाली आणि वर्चस्ववादी पुरुष अशी ही संकल्पना आहे. पुढच्या काळात ती बलाढ्य उद्योगपती, नेते यांना वापरली जाऊ लागली. अशाच काहीशा संकल्पनेवर आधारित ‘ॲनिमल’ चित्रपटात मानवी मनातील काही क्रूर बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. विकृतीवर सकारात्मक प्रवृत्तीचा जय झाला, तर ती समाजमनावर बिंबते. तसे काही न झाल्यामुळे या पात्राविषयी काहींना घृणा वाटली, तरी काही त्याचे अनुकरण करणार नाहीत कशावरून ? मानवी मनातील ‘जनावर’ प्रवृत्ती प्रदर्शित करणार्या ‘ॲनिमल’ चित्रपटातून अशा स्वरूपाचा खलनायक उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपट समाजाचा आरसा असला, तरी त्याचप्रमाणे याचे समाजालाही अनुसरण करावेसे वाटू शकते, यात शंका नाही.
दिवसेंदिवस चित्रपटातील लैंगिकतेमध्ये दाखवण्यात येणारी विकृती किती खालच्या थराला गेली आहे, याचे उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे. त्यामुळे होणार्या समाजहानीला उत्तरदायी कोण असणार ? याचा विचार होतांना दिसत नाही. या चित्रपटातील समलैंगिकतेविषयीचे दृश्य कापण्यात आल्याची मान्यताही यातील नट बॉबी देओल यांनी दिली आहे. म्हणजे चित्रपट कुठल्या थरापर्यंत युवकांवर कुसंस्कार करणारा ठरला असता, हे लक्षात येते. चित्रपटात काम करणारे अभिनेते युवावस्थेतील मुलांचे आदर्श असतात. या वयात युवकांची बुद्धी आणि मन प्रगल्भ नसते. अनुकरण ही सहज प्रवृत्ती असते. त्यातून गुन्हेगारी वृत्ती आणि विकृत प्रवृत्ती वाढीस लागू शकते. परस्त्रीला मातेचा दर्जा देण्याचा संस्कार असणार्या भारतात महिलांवरील अत्याचारांत अगणित वाढ झाली आहे. याचे एक प्रमुख मूळ कारण अश्लील चित्रपट हेच आहे. समाजमनावर परिणाम करणारे चित्रण प्रसारित होऊ न देणे हे ‘सेन्सॉर बोर्डा’चे दायित्व आहे. ते त्यांनी कितपत निभावले आहे ? असाच प्रश्न आता त्यामुळे पडत आहे. असा चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमा करत आहे. हे कुठल्या समाजाचे लक्षण आहे ? हाही विचार व्हायला हवा.
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.