गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषद : मान्यवरांचे अनमोल मार्गदर्शन आणि कृतीविषयक सकारात्मक चर्चा !

म्हार्दोळ, फोंडा : सिंहपुरुष सभागृह, श्री महालसा देवस्थान, म्हार्दोळ, फोंडा येथे १० डिसेंबर या दिवशी ‘गोवा राज्यस्तरीय मंदिर-धार्मिक संस्था परिषद’ पार पडली. ‘मंदिरे ही मन:शांती देणारी केंद्रे आहेत आणि यामुळे मंदिरांचे संवर्धन अन् जतन होणे आवश्यक आहे. मंदिर विश्‍वस्तांनी एकमेकांमध्ये जवळीक निर्माण करून संघटन भक्कम करणे अत्यावश्यक आहे’, हा या परिषदेच्या आयोजनामागील मुख्य उद्येश होता. या संदर्भातील मान्यवरांचे विचार येथे दिले आहेत.

गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेतील पहिले उद्बोधन सत्र

गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेतील पहिल्या उद्बोधन सत्रामध्ये उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संतोष रिवणकर यांनी मंदिरांसंबंधी कायदे, श्री. अजित पद्मनाभ यांनी ‘डिजिटल टेम्पल हेरिटेज टुरिझम्’, प्रसिद्ध वास्तूविशारद श्री. अभिजीत साधले यांनी ‘मंदिरांचे स्थापत्य : नूतन वास्तू बांधतांना घ्यावयाची दक्षता’ आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘मंदिर सुप्रबंधन’ या विषयावर मार्गदर्शन केले.

मंदिरांतील वाद सामोपचाराने सोडवावा ! – अधिवक्ता संतोष रिवणकर, उच्च न्यायालय

अधिवक्ता संतोष रिवणकर

गोव्यातील मंदिरांचे व्यवस्थापन हे पोर्तुगिजांनी बनवलेल्या ‘देवस्थान रेग्युलेशन कायद्या’नुसार चालते. या कायद्याची ‘मंदिर संस्था’ आणि ‘कोमुनिदाद संस्था’, अशी २ महत्त्वाची अंगे आहेत. या कायद्याच्या अंतर्गत देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी म्हणून मामलेदारांची नियुक्ती केली जाते. या अंतर्गत मंदिरांच्या व्यवस्थापनाचा जमा-खर्च मंदिर व्यवस्थापनाला सरकारला सादर करावा लागतो, तसेच मंदिरांतील एखाद्या सूत्रासंबंधी न्यायालयात जाण्यासाठीही मामलेदाराची अनुमती घ्यावी लागते. मंदिरांच्या सदस्यांची सूची त्यांना सुपुर्द करावी लागते. थोडक्यात या कायद्याच्या माध्यमातून सरकारने मंदिरांचे नियंत्रण स्वत:कडे ठेवले आहे; मात्र हा कायदा देशातील इतर राज्यांच्या तुलनेत चांगला आहे. मंदिरांमधील विश्‍वस्त, पुजारी आदींमधील वाद न्यायप्रविष्ट झाले आहेत. वाद न्यायालयात गेल्याने सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्याची संधी चालून येते. यासाठी मंदिरांतील वाद आपापसांत सामोपचाराने मिटवले पाहिजेत.

पूर्वजांनी जपून ठेवलेल्या मंदिरांच्या वारशाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक ! – श्री. अजित पद्मनाभ, संस्थापक आणि मुख कार्यकारी अधिकारी, ‘हू विआर्’ आस्थापन, बेंगळुरू

श्री. अजित पद्मनाभ

प्रत्येकाने मंदिर परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि धर्म यांविषयीची मूल्ये समजून घेणे आवश्यक आहे. मंदिर तंत्रज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. मंदिरांमध्ये महसूल निर्माण करण्याची प्रचंड क्षमता आहे. पूर्वजांनी जपून ठेवून आपल्यापर्यंत पोचवलेल्या मंदिरांच्या वारशाचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे.

सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्ये जपली पाहिजेत ! – श्री. अभिजीत साधले, प्रसिद्ध वास्तूविशारद

श्री. अभिजीत साधले

मंदिर हे एक शास्त्र आहे आणि ते वापरात ठेवू तोपर्यंत मंदिरे रहाणार आहेत. मंदिर संकल्पना ही एक वैदिक संकल्पना आहे आणि तेव्हापासून ती सातत्याने विकसित झाली आहेत. मंदिरांचे नूतनीकरण करतांना काळजी घ्यायला हवी. सभामंडप आणि यज्ञवेदी यांच्यात साम्य आहे. विकासाच्या नावाने मंदिराची उभारणी करतांना किंवा नूतनीकरण करतांना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांचा र्‍हास होऊ देऊ नये.



मंदिर व्यवस्थापनावर अभ्यासक्रम सुनिश्‍चित करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

शास्त्र, विधी, परंपरा यांच्याशी संबंधित मंदिरांच्या व्यवस्थापनावर अभ्यासक्रम असावा, अशी अनेक मंदिरांनी आमच्याकडे मागणी केली आहे. सर्वच क्षेत्रांसाठी व्यवस्थापन आहे, तसेच मंदिरांसाठीही असले पाहिजे. अभ्यासक्रमाविषयी पुढील सूत्रे सुनिश्‍चित करण्यात आली आहेत.

श्री. चेतन राजहंस

मंदिर समितीच्या सदस्यांना सामान्य वैदिक किंवा धार्मिक विधी, मंदिराचे प्रशासन आणि मंदिरातील परंपरा यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मंदिरातील पुरोहिताला त्याचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व, तसेच मंदिरांचे विश्‍वस्त आणि समितीचे सदस्य यांना त्यांचे कर्तव्य अन् उत्तरदायित्व यांविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे. मंदिराचे नूतनीकरण करतांना किंवा नवीन मंदिराच्या उभारणीसाठी मंदिराच्या स्थापत्यशास्त्राची माहिती असणे आवश्यक आहे. ‘सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एखादा प्रकल्प सरकार दरबारी कसा मांडावा ?’, याविषयी समितीचे विश्‍वस्त किंवा सदस्य यांना ज्ञान असणे आवश्यक आहे. मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍याचे चारित्र्य सुयोग्य असणे आवश्यक असते. समितीचा सदस्य हा देवाचा भक्त असला पाहिजे, यासाठीच चरित्र व्यवस्थापन या विषयावर माहिती असली पाहिजे. मुख्यत्वे मंदिराच्या समितीचा सदस्य हा साधना करणारा असावा. कोणताही नव्याने अभ्यासक्रम ठरवतांना प्रारंभी ती ‘केस स्टडी’ असते. यासाठी अभ्यासक्रम निश्‍चित करतांना सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य करावे.

मंदिरांचा धर्मजागृतीच्या कार्यासाठी वापर व्हावा ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

या परिषदेच्या माध्यमातून मंदिरांच्या विश्‍वस्तांमध्ये जवळीक आणि ओळखी वाढण्यास साहाय्य झाले आहे. यामुळे मंदिर विश्‍वस्तांच्या संघटनाला पुष्टी मिळणार असून हीच परिषदेची मोठी फलश्रुती आहे. हे कार्य पुढे वृद्धींगत झाले पाहिजे. मंदिरांमधून धर्मजागृतीचे कार्य झाले पाहिजे. धर्मकार्यातील गैरप्रकारांना आळा घातला गेला पाहिजे.

मंदिरांमध्ये आपण धर्मशिक्षणवर्ग, धर्मग्रंथांचे वाचनालय, संस्कारवर्ग आदी चालू केले पाहिजेत. सात्त्विक पुरोहित निर्माण करण्याचे कार्य मंदिरांनी हाती घेतले पाहिजे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत असल्याने मंदिरांच्या आवारात मद्य आणि मांस यांच्या दुकानांना अनुमती देऊ नये. मंदिराच्या धनाचा उपयोग योग्य कारणासाठीच झाला पाहिजे. मंदिरांच्या समित्यांनी आपापसांत नियमित बैठका घेऊन समन्वय वाढवला पाहिजे. एखाद्या ठिकाणी धर्मावर आघात झाल्यास मंदिर समित्यांनी संघटितपणे त्याला विरोध केला पाहिजे. गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेच्या माध्यमातून निर्माण झालेले धर्मबंधुत्व कृतीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे.



परिषदेतील परिसंवाद : पुरातत्व विभाग आणि मंदिर

गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेत ‘पुरातत्व विभाग आणि मंदिर’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये पुराभिलेख संशोधक श्री. बालाजी शेणवी, पुरातत्व संशोधक श्री. वरद सबनीस, इतिहासकार प्रा. रोहित फळगावकर आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी सहभाग घेतला.

नकारात्मक विचारप्रवाहाला (नॅरेटिव्हला) उत्तर देण्यासाठी पुरातत्व ठेवा म्हणजे अस्तित्वाची खूण जपून ठेवणे अत्यावश्यक ! – प्रा. रोहित फळगावकर, इतिहासकार

प्रा. रोहित फळगावकर

भारतात मंदिरांचा इतिहास हा ५ व्या ते ६ व्या शतकांपासून चालत आलेला आहे. पुरातत्व माहिती आणि उपलब्ध शिलालेख यांवरून इतिहास लिहिला जातो. यासाठी पुरातन अवशेष जपून ठेवणे आवश्यक आहे. या पुरातन वस्तूंना इतिहासाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज गोव्यात एका घटकाकडून ‘पोर्तुगीज येण्यापूर्वी गोव्यात हिंदु धर्मीय नव्हते’, या विचारप्रवाहाचा (नॅरेटिव्ह) प्रचार केला जातो. ही एक गंभीर गोष्ट आहे. यामुळे आपला पुरातत्व ठेवा महत्त्वाचा आहे. आपला पुरातत्व ठेवा हा आपल्या अस्तित्वाची खूण आहे. मंदिरांचे नूतनीकरण करतांना शास्त्रविसंगत कृती केल्या जात आहेत. आपली पुरातन परंपरा कायम जपून ठेवली पाहिजे. गर्भगृहामध्ये पूर्वी मंद पेटणारे दिवे असायचे, तर आता तिथे लख्ख प्रकाश करण्यासाठी काही मंदिर समित्यांमध्ये स्पर्धा लागलेली दिसते. मंदिर संस्कृतीशी निगडित वाद्यसंस्कृती आज गोव्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तिचे जतन करणे आवश्यक आहे.

मंदिरांची कागदपत्रे जपून ठेवणे आणि मालमत्तेची नोंद प्रत्येक समितीने करणे आवश्यक !  – बालाजी शेणवी, पुराभिलेख संशोधक

श्री. बालाजी शेणवी

मंदिरांची शासनदरबारी नोंद असलेली कागदपत्रे जपून ठेवणे (उदा. १/१४ उतारा, भूमी नोंदणी क्रमांक, आदी) आणि मंदिरांच्या संपत्तीची नोंद करून ठेवणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक मंदिर समितीने त्यांच्या ३ वर्षांच्या कालावधीत मंदिरांची कागदपत्रे पडताळून सर्व माहिती गोळा करून ठेवली पाहिजे, अन्यथा मंदिर समित्यांना पुढे न्यायालयात खेपा खालण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मंदिरांच्या भूमीत अतिक्रमण होणे आदी अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागू शकते. मंदिरांची कागदपत्रे जीर्णावस्थेत असतील, तर ती ‘स्कॅन’ करून जपून ठेवली पाहिजेत. यासाठी आवश्यकता भासल्यास सरकारचे पुराभिलेख खाते किंवा पुराभिलेख संशोधक यांचे सहकार्य घ्यावे.

गोव्यातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या मंदिरांचे संवर्धन करणे, ही काळाची आवश्यकता ! – वरद सबनीस, पुरातत्व संशोधक

श्री. वरद सबनीस

भौगोलिकदृष्ट्या गोवा देशात सर्वांत लहान प्रदेश आहे, तरीही भारतातील अन्य राज्यांपेक्षा सर्वाधिक मंदिरे गोव्यात आहेत. पोर्तुगिजांनी सहस्रो मंदिरे नष्ट केली, तरीही गोव्यात सर्वाधिक मंदिरे आहेत आणि म्हणून गोव्याला ‘देवभूमी’ किंवा पुण्यभूमी असे संबोधले जाते. विध्वंस झालेल्या मंदिरांचे अवशेष जपून ठेवणे अत्यावश्यक आहे. हे अवशेष आपल्या पूर्वजांचा त्याग, बलीदान आणि संघर्ष यांचे प्रतीक आहे. गोव्यात पुरातत्व वारसा सहस्रो वर्षे जुना आहे आणि तो जतन करण्यासाठी मंदिर समितीने प्रयत्न केला पाहिजे. आज पुरातन मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि शास्त्रानुसार विसर्जन करणे योग्य आहे; मात्र ऐतिहासिक मूल्ये जपून ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे.


गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेत सहभागी मंदिर विश्‍वस्तांनी केलेले संकल्प

१. मंदिरांचे प्रतिनिधी संघटितपणे मंदिरांच्या व्यापक हिताचे कार्य करणार.
२. मंदिरांवरील सर्व प्रकारचे आघात, अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणार.
३. पोर्तुगिजांच्या जाचक राजवटीत आपल्या लढाऊ पूर्वजांनी जतन केलेला मंदिरांचा अमूल्य वारसा जपणे, हे आपले प्रत्येकाचे धर्मकर्तव्य आहे आणि ते  प्राण पणाला लावून करू.
४. मंदिरांचे वाद सामोपचाराने मिटवणार. मंदिर सरकारीकरणाला प्रोत्साहन देणारा कुठलाही अंतर्गत वाद सरकारी कार्यालय किंवा न्यायालय येथे जाणार नाही, यासाठी प्रयत्न करू.
५. मंदिरांच्या प्रथा-परंपरा, धार्मिक कृत्ये शास्त्रीय पद्धतीने होतील, यासाठी आम्ही आग्रही राहू आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा शासकीय-प्रशासकीय हस्तक्षेप अमान्य करू.



गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेत घेण्यात आलेले ठराव

पोर्तुगीजकालीन उद्ध्वस्त करण्यात आलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा

पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या; परंतु प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांकडून दुर्लक्षित मंदिरांचा तात्काळ जीर्णोद्धार करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी

राज्यातील गडकिल्ल्यांवरील घुमट्या, मंदिरे, तसेच पुरातत्व खात्याच्या अधीन असलेली मंदिरे यांच्या रक्षणाचे दायित्व सरकारने घ्यावे

हात उंचावून ठरावांना अनुमोदन देतांना उपस्थित

 गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेतील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि क्षणचित्रे

गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेतील दुसरे उद्बोधन सत्र

गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेच्या दुसर्‍या उद्बोधन सत्रामध्ये अधिवक्ता सुरेश राव; केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानचे सचिव श्री. राजेंद्र देसाई, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. श्‍वेता क्लार्क आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.

मंदिर ट्रस्टची सरकार दरबारी रितसर नोंदणी होणे आवश्यक ! – अधिवक्ता सुरेश राव

अधिवक्ता सुरेश राव

मंदिर ट्रस्टचा कायदेशीर हक्क मिळण्यासाठी ट्रस्टची सरकार दरबारी रितसर नोंदणी होणे अत्यावश्यक आहे. मंदिरे ‘सोसायटी रजिस्ट्रेशन’ कायद्याच्या अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रत्येकाने स्वत:पासून धर्माचरण चालू केले पाहिजे ! – राजेंद्र देसाई, सचिव, श्री विजयादुर्गा देवस्थान, केरी, फोंडा

मंदिरे ही धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्राबरोबरच आरोग्य अन् शिक्षण देणारी केंद्रे बनली पाहिजेत. केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थान विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यास कसा करावा?’, ‘परीक्षेला कसे सामोरे जावे?’ यांविषयी प्रशिक्षणवर्ग आयोजित करते. मंदिरात संस्कारवर्गही चालतात. मंदिर समितीच्या सदस्यांनी किंवा प्रत्येकाने स्वत:पासून धर्माचरण चालू केले पाहिजे. प्रत्येक मंदिरामध्ये येणार्‍या प्रत्येक पुरुष भाविकाला टिळा लावण्याची सोय उपलब्ध केली पाहिजे.

मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत ! – श्री. सत्यविजय नाईक

मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत. मंदिरांच्या माध्यमातून धर्मशिक्षण, संस्कारवर्ग आदी उपक्रम राबवले गेले पाहिजेत. यासाठी मंदिर समित्यांना हिंदु जनजागृती समिती सदैव सहकार्य करेल.

मंदिराची सात्त्विकता वाढवण्यासाठी मंदिरांचे पावित्र्य जपले पाहिजे ! – श्‍वेता क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

भारतात सुमारे २० लाख मंदिरे आहेत. मंदिरे ही सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत. मंदिरे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. ही सकारात्मक ऊर्जा मंदिरानुसार पालटत असते. मंदिरे ही आपली आध्यात्मिक संपत्ती आहे आणि आपण ती जपली पाहिजे. मंदिराची सात्त्विकता वाढवण्यासाठी मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे.


परिषदेत मंदिराच्या घुमटीच्या रक्षणाचे कार्य केलेल्यांचा सत्कार

आग्वाद किल्ल्यावर एका कार्यक्रमासाठी श्री महादेवाची घुमटी बंद करण्यात आली होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन ही घुमटी उघडण्यास भाग पाडले आणि तेथे देवाची पूजाअर्चा केली. या कार्यासाठी परिषदेमध्ये मान्यवरांच्या बजरंग दलाचे कार्यकर्ते सर्वश्री तनय कांदोळकर, खतेश कांदोळकर, सचिन सहानी, सचिन सिंह, दीपक कबूर, गुरुनाथ इगियन, रोहन सिंह, प्रदीप बंसाल, विकास यादव, सूमन बारिक आणि रवि चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.


न्यायालय, क्लब या ठिकाणी वस्त्रसंहिता हवी; मग मंदिरातच का नको ? – सौ. शेफाली वैद्य, लेखिका

सौ. शेफाली वैद्य

परिषदेच्या उद्घाटन सत्रात सौ. शेफाली वैद्य म्हणाल्या, ‘‘न्यायालयात जाण्यासाठी, कामावर जाण्यासाठी, क्लबमध्ये, अशा सर्वच क्षेत्रांमध्ये वस्त्रसंहिता लागू आहे, तर मग मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यास त्याला ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातला जातो’, असे म्हणून विरोध का केला जातो ? इतर ठिकाणी वस्त्रसंहितेला विरोध होत नाही. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यास मंदिरांची सात्त्विकता टिकून रहाण्यास साहाय्य होईल. हा उपक्रम सर्वत्र राबवला पाहिजे.’’


प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून झाला संवाद !

‘श्री परशुरामाने बाण मारला’ यावरून ‘बाणावली’ हे नाव पडले ‘बाणावली ही परशुरामभूमी म्हणतात, मग बाणावली येथे श्री परशुरामाची प्रतिकृती आहे का ? किंवा ती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत का ?’, असा प्रश्‍न उपस्थितांमधील एकाने विचारला. यावर इतिहासकार प्रा. रोहित फळगावकर उत्तरादाखल म्हणाले, ‘श्री परशुरामाने बाण मारला’ यावरून गावाला बाणावली हे नाव पडले. बाणावली येथे श्री कात्यायनी आणि श्री बाणेश्‍वर यांची मंदिरे होती, असा पोर्तुगीज कागदपत्रात उल्लेख आढळतो; मात्र आता तेथे मंदिरांचे अवशेष नाहीत.

जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांब संरक्षण स्मारक घोषित होण्याची शक्यता

‘जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हातकातरो खांबा’ला संरक्षण स्मारक म्हणून घोषित करणार का ?’, असा प्रश्‍न उपस्थिताने विचारला. यावर पुरातत्व संशोधक श्री. वरद सबनीस उत्तरादाखल म्हणाले, ‘‘हात कातरो’ खांब संरक्षण स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया सरकारदरबारी चालू आहे आणि लवकरच अशी घोषणा होण्याची शक्यता आहे. जनभावना जाणून घेऊन आणि यासंबंधी आलेल्या निवेदने यांवरून सरकार हा निर्णय घेण्याच्या सिद्धतेत आहे.’’


मंदिरांचे संघटन करण्याचा उपक्रम योग्य ! – दामू नाईक, भाजपचे नेते

१० डिसेंबरला म्हार्दोळ येथे झालेल्या गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेला भाजपचे नेते दामू नाईक उपस्थित होते. ते परिषदेविषयी अभिप्राय देतांना म्हणाले, ‘‘मंदिरांचे विश्‍वस्त, मंदिरांच्या समित्या, पुरोहित आदींचे संघटन करण्याचे कार्य उत्तम आहे. मंदिरांचे संघटन होणे काळाची आवश्यकता आहे. अयोध्येमध्ये श्रीरामाची मूर्तीची जानेवारी मासात प्राणप्रतिष्ठापना होत आहे. मंदिर एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि सातत्याने संघटनासाठी असे उपक्रम राबवले पाहिजेत.’’

कुंडई येथील श्रीक्षेत्र तपोभूमीच्या वतीने ‘चलो अयोध्या जागृती’ कार्यक्रम

अयोध्येत श्री राममंदिराच्या उभारणीच्या पार्श्‍वभूमीवर श्रीक्षेत्र तपोभूमी येथील श्री दत्त पद्मनाभ पिठाच्या वतीने उत्तर गोव्यात म्हापसा येथे १७ डिसेंबर या दिवशी सायंकाळी टॅक्सी स्टँड, म्हापसा येथे, तर दक्षिण गोव्यात ७ जानेवारी या दिवशी मडगाव येथे ‘चलो आयोध्या जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्रीरामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तपोभूमीच्या वतीने करण्यात आले. ही घोषणा परिषदेच्या वेळी तपोभूमीचे वेदमूर्ती केदार यांनी केली.

समारोप सत्रात मंदिराच्या रक्षणासाठी अवितरपणे कार्यरत असलेले गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत (भाई) पंडित यांचा सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.