मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत लेखी उत्तर

नागपूर – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली, सराटी येथे बेमुदत उपोषण आंदोलन केले होते. ‘या वेळी आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर नोंद झालेले गुन्हे सरसकट मागे घ्या’, अशी विनंती जरांगे पाटील यांनी सरकारला केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ डिसेंबर या दिवशी याविषयावरील लेखी उत्तर देत लाठीमाराच्या घटनेचा विस्तृत तपशील विधानसभेत सादर केला. या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी काही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास ठाम नकार दिला, तसेच ‘आंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केला. या घटनेत जवळपास ५० आंदोलक आणि ७९ पोलीस घायाळ झाले होते. त्यामुळे सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया चालू केली जाईल’, असे म्हटले. यामुळे आता जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलक कोणती भूमिका घेतात, हे पहावे लागणार आहे.

लाठीमाराची घटना घडल्यानंतर मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन राज्यात तीव्र झाले होते. त्या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः आंदोलकांची क्षमा मागितली होती.