नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मधील कालावधीमध्ये झालेल्या घडामोडींशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते आम्हाला भेटले, त्या वेळी आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमची त्यांच्याशी राजकीय चर्चा झालेली नाही, असे ट्वीट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे.
आमदार श्री. @nawabmalikncp हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 7, 2023
नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाजूला बसल्याच्या कारणावरून विधानपरिषदेमध्ये वादंग निर्माण झाला होता, तसेच भाजपवरही टीका झाली. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने सुनील तटकरे यांनी हे ट्वीट करून तसे पत्रही फडणवीस यांना पाठवले आहे.