हडफडे येथे उत्तररात्री घडला भीषण अपघात
पणजी, २ डिसेंबर (वार्ता.) : हडफडे येथे ‘२३ रेस्टॉरंट’जवळ उत्तररात्री सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने वाहन हाकणारा रशियाचा पर्यटक आंतोन बिचकोव्ह (वय २७ वर्षे) याने ३ पर्यटकांना ठोकर दिली. यामध्ये महेश शर्मा (नाशिक), दिलीपकुमार बांग (भाग्यनगर) आणि मनोजकुमार सोनी (भाग्यनगर ) हे पर्यटक ठार झाले. रशियाचा पर्यटक चालवत असलेले वाहन अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कोसळले आणि यामध्ये तो पर्यटक गंभीररित्या घायाळ झाला. त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत.
गिरी येथे अपघातात दुचाकीचालक ठार
म्हापसा नामोशी, गिरी येथील शाळेजवळील रस्त्यावरून जात असलेल्या ट्रकच्या बाजूने जातांना (‘ओव्हरटेक’ करतांना) दुचाकीचालकाचा तोल जाऊन तो ट्रकखाली चिरडला. विदेश पोळे (वय २३ वर्षे) असे दुचाकीचालकाचे नाव असून तो पोडवळ, खोर्जुवे येथे रहात होता. मयत विदेश पोळे पर्रा येथून ग्रीन पार्क हॉटेलच्या दिशेने जात होता, तर ट्रकही त्याच दिशेने जात असतांना हा अपघात झाला. पोलिसांनी ट्रकचालकाला कह्यात घेतले आहे.
(सौजन्य : Goan Reporter News)
गोव्यात अपघातांची मालिका चालूच : नोव्हेंबर मासात १५ जणांचा अपघाती मृत्यूपणजी : राज्यात सध्या अपघातांची मालिका चालू आहे. नोव्हेंबर मासात १५ जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीररित्या घायाळ झाले. डिसेंबर मासात २ दिवसांतच चौघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. डिसेंबर मासात गोव्यात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या पार्ट्यांची (मेजवान्यांची) संख्याही वाढली आहे आणि यामुळे मद्यप्राशन करून वाहन हाकण्याचे प्रमाणही वाढले आहे. |