शासनाच्या वतीने मंत्री उपस्थित रहातील ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – २ आणि ३ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ओझर (पुणे) येथील श्री विघ्नहर गणपति मंदिर येथे द्वितीय ‘राज्यस्तरीय मंदिर परिषद’ घेण्यात येत आहे. याविषयी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने २९ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या परिषदेचे निमंत्रण दिले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘या परिषदेला शासनाच्या वतीने मंत्री उपस्थित रहातील’, असे आश्वासन दिले.
या वेळी लेण्याद्री देवस्थानचे विश्वस्त श्री. कैलास लोखंडे, श्री विघ्नहर गणपति देवस्थानचे विश्वस्त श्री. श्रीराम पंडित, भाजपच्या किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय थोरात आणि सरचिटणीस श्री. नवनाथ थोरात उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मंदिर विश्वस्तांचे संघटन’ हा चांगला उपक्रम असल्याचे म्हटले. महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे ‘सुव्यवस्थापन आणि मंदिर संस्कृतीचे रक्षण’ या उद्देशाने जागृती अन् संघटनात्मक कार्य यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य चालू आहे. या दृष्टीने मंदिर महासंघाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला महाराष्ट्रातील ७०० हून अधिक श्रीक्षेत्रे, ज्योतिर्लिंगे, अष्टविनायक, ज्ञाती मंदिरे यांसह अन्य मोठी देवस्थाने यांचे विश्वस्त, पुजारी-पुरोहित आणि प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनाही मंदिर परिषदेचे निमंत्रण देण्यात आले.