‘पंतप्रधान कुसुम योजने’च्या कार्यवाहीत देशात महाराष्ट्र अग्रेसर !
मुंबई – महाऊर्जा आस्थापनाने महाराष्ट्राचे स्थान कायमच अव्वल रहाण्यासाठी प्रयत्न करावेत. महाऊर्जाने कार्यप्रणालीत सातत्य राखावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ‘पंतप्रधान कुसूम योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ७१ सहस्र ९५८ सौर पंप स्थापित करून देशात अग्रक्रम राखला आहे. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी महाऊर्जा विभाग आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रशासनाने ‘कुसुम’ योजनेद्वारे ९ लाख ४६ सहस्र ४७१ सौरपंप बसवण्याला मान्यता दिली आहे. आतापर्यंत सर्व राज्य मिळून २ लाख ७२ सहस्र ९१६ सौर पंप स्थापित करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक पंप बसवण्यात आले आहेत. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘शेतकर्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, यासाठी ऊर्जा विभागाने पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान कुसूम योजना प्रभावीपणे राबवली आहे. राज्यात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्राचाही कृषी पंपांसाठी आपण प्रभावीपणे उपयोग करून घेत आहोत. यामुळे सिंचनासाठी शेतकर्यांना खात्रीलायक पर्याय उपलब्ध होईल.’’