सांप्रदायिकतेची दुही नको !

‘व्‍यक्‍ती तितक्‍या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा अध्‍यात्‍मातील मूलभूत सिद्धांत आहे. याचाच अर्थ या जगात जेवढे कोटी लोक आहेत, तेवढे साधनामार्ग आहेत. जेव्‍हा सर्व जण एकाच प्रकारची साधना करतात, तेव्‍हा त्‍यांची अपेक्षित आध्‍यात्मिक प्रगती होतेच, असे नाही. तसेच त्‍यांच्‍यात संकुचित वृत्ती निर्माण होऊन स्‍वतःच्‍या संप्रदायाविषयी वृथा अहंकार निर्माण होण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे साधनेचा उद्देश सफल न होता, ते जन्‍म-मृत्‍यूच्‍या चक्रात अडकू शकतात. अनेक हिंदू सांप्रदायिकतेत अडकल्‍यामुळे समाजात दुही निर्माण झाल्‍याचे दुर्दैवी चित्रही बघायला मिळते.

एका जिल्‍ह्यातील एका गावात एका जागृत श्री गणेश मंदिरात २५० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्‍सव होतो. या उत्‍सवाला लोक लांबून येतात; परंतु अनंत चतुर्दशीच्‍या दिवशी येथे घडलेला प्रसंग अतिशय अशोभनीय होता. मंदिरातील कीर्तनात कीर्तनकारांनी गावातील काही लोकांविषयी अयोग्‍य वक्‍तव्‍य केले. त्‍यानंतर कीर्तनाच्‍या शेवटच्‍या दिवशी संबंधित लोक येऊन त्‍यांनी तिथे वादावादी केली आणि नंतर गंभीर प्रसंग निर्माण झाला. तेथील वातावरण पालटले. यामुळे त्‍या मंदिराचे पावित्र्य आणि चैतन्‍य यांवर परिणाम झाला. गावातील आध्‍यात्‍मिक नेतृत्‍व करणार्‍या दोघा व्‍यक्‍तींनी मंदिरातच अशोभनीय वर्तन केले. त्‍या वेळी कुणालाच कशाचे भान नव्‍हते. ‘आपलाच संप्रदाय मोठा’, या आविर्भावामध्‍ये एकमेकांना तुच्‍छ लेखून एकमेकांवर टीका करणे, धमकावणे असे अकल्‍पनीय घडले. आध्‍यात्मिकतेची जाण असणार्‍यांनी ‘आपण कुठे आहोत ? काय करत आहोत ? काय बोलत आहोत ?’, याचे भान ठेवायला हवे; कारण त्‍यांच्‍या चुकीच्‍या कृत्‍याने धर्माचीही  अपकीर्ती होते.

‘आपण जे आध्‍यात्मिक नेतृत्‍व करत आहोत, ते गुरुकृपेने मिळाले आहे’, याची जाण ठेवायला हवी. मंदिर हे वादविवादाचे ठिकाण नव्‍हे, तर ती समाज प्रबोधनाची पवित्र जागा आहे. आपल्‍या मनाची प्रगती साधून परमार्थामध्‍ये आनंद प्राप्‍त करण्‍यासाठी मंदिरे असतात. अशा मंदिरांतील उत्‍सव, उपासना ही ईश्‍वरावर श्रद्धा ठेवणार्‍या भक्‍तांना संस्‍कारीत करते. वरील प्रसंगात केवळ कर्तेपणा आणि सांप्रदायिक असल्‍याचा दांभिक अहंकार दिसला. आज राष्‍ट्र-धर्म संकटात असतांना हिंदूंनी संप्रदाय, जात बाजूला सारून एकत्र येण्‍याची आवश्‍यकता आहे. हिंदूंनी आपापसांत भांडण्‍यातील ऊर्जा राष्‍ट्र-धर्मावरील संकटाच्‍या विरोधात जागृती करण्‍यासाठी वापरली, तर त्‍यांची साधना होईल. धर्म टिकला, तरच संप्रदाय आणि पर्यायाने आपण टिकणार आहोत, हे लक्षात घ्‍यायला हवे !

– सौ. रमा देशमुख, नागपूर