‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. त्यांचे दर्शन झाल्यावर ‘प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीदेवी आपल्यासमोर उभी आहे’, अशी अनुभूती येते. त्यांनी गुरुकृपायोगानुसार साधना करून अल्प काळात शीघ्र आध्यात्मिक उन्नती साध्य केली. त्यांच्या जन्मकुंडलीत असलेल्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे व्यक्तीमत्त्व दर्शवणारे घटक
अ. लग्नरास (कुंडलीतील प्रथम स्थानातील रास) : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कुंडलीत प्रथम स्थानात ‘तूळ’ रास आहे. तूळ रास वायुतत्त्वाची असल्याने व्यक्तीत कार्यकुशलता, गतीशीलता, सेवाभाव, तत्त्वनिष्ठता आणि अलिप्तता हे गुण असतात. व्यक्तीची बौद्धिक क्षमता आणि आकलनशक्ती उत्तम असते.
आ. जन्मरास (कुंडलीतील चंद्राची रास) : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कुंडलीत चंद्र हा ‘कन्या’ राशीत आहे. कन्या राशीतील चंद्र जिज्ञासा, चिकित्सकपणा, अभ्यासूवृत्ती, तर्कशक्ती, नियोजनकौशल्य आणि कलाप्रियता ही वैशिष्ट्ये दर्शवतो. कन्या राशीतील चंद्र वैचारिक प्रगल्भता देतो.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या जन्मकुंडलीत आढळणारी आध्यात्मिक वैशिष्ट्ये
२ अ. ईश्वर आणि गुरु यांप्रती जन्मतः भाव असणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कुंडलीत गुरु आणि शुक्र या ग्रहांची युती आहे. हा योग जन्मतः ईश्वर आणि गुरु यांप्रती भाव दर्शवतो. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्यातील भावाचे रूपांतर भक्तीमध्ये केले. भक्ती म्हणजे गुरुचरणी संपूर्ण शरणागती ! त्यांनी स्वतः भक्ती करण्यासोबतच साधकांनाही भक्ती कशी करायची ?, ते शिकवले. त्यांनी भक्तीच्या बळावर व्यापक समष्टी कार्य केले; त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना ‘समष्टी राधा’ ही अद्वितीय उपमा दिली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेल्या साप्ताहिक भक्तीसत्संगांमध्ये त्यांच्या वाणीतून व्यक्त होणारी उत्कट भक्ती प्रत्येक साधकाला अनुभवास येते. त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे भक्तीसत्संगात उच्च लोकांतील वातावरण अवतरल्याची अनुभूती येते.
२ आ. नियोजनकौशल्य आणि अभ्यासूवृत्ती : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कुंडलीत रवि आणि चंद्र हे ग्रह ‘कन्या’ राशीत आहेत. कन्या राशीत ‘नियोजनकौशल्य आणि अभ्यासूवृत्ती’ हे गुण प्रधान आहेत. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात हे गुण प्रकर्षाने आढळतात. त्यांनी सर्व साधकांसमोर परिपूर्ण सेवेचा आदर्श ठेवला. एखादी सेवा मिळाल्यानंतर तिचा आध्यात्मिक स्तरावर अभ्यास करणे, बारकावे समजून घेणे इत्यादी कृतींद्वारे ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे त्यांनी साधकांना शिकवले. त्यांच्या शिकवणीमुळे साधकांच्या सेवांची फलनिष्पत्ती वाढली.
२ इ. सेवाभाव आणि तत्त्वनिष्ठता : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कुंडलीत शनि ग्रह योगकारक (प्रभावी) आहे. शनि ग्रह ‘सेवाभाव आणि तत्त्वनिष्ठता’ हे गुण देतो. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘प्रत्येक साधकाची आध्यात्मिक उन्नती लवकर व्हावी’, ही तळमळ असल्याने त्या साधकांना मानसिक स्तरावर न हाताळता नेहमी आध्यात्मिक स्तरावर हाताळतात.
२ ई. ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ या साधनामार्गांचा संगम : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कुंडलीतील ग्रहयोग ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ या तिन्ही साधनामार्गांसाठी पूरक आहेत. ‘गुरुकृपायोगा’त या तिन्ही साधनामार्गांचा संगम आहे. ‘केवळ गुरुतत्त्व शाश्वत आहे’ हे जाणून मायेचा त्याग करणे’, यातून त्यांनी ज्ञानयोग साधला. ‘गुरुचरणी सतत शरणागत रहाणे’, यातून त्यांनी भक्तीयोग साधला, तसेच ‘अखंड कार्यरत राहून परिपूर्ण सेवा करणे’, यातून त्यांनी कर्मयोग साधला. त्यामुळे त्यांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती झाली. तिन्ही साधनामार्गांचा संगम असल्याने कोणत्याही प्रकृतीच्या साधकाला त्या साधनेसंबंधी मार्गदर्शन करू शकतात.
२ उ. गुरु, मंगळ आणि शनि या ग्रहांचा नवपंचमयोग असल्यावर व्यापक समष्टी कार्य करण्याची क्षमता येणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कुंडलीत गुरु, मंगळ आणि शनि या ग्रहांचा नवपंचमयोग (शुभयोग) आहे. हा योग व्यापक समष्टी कार्य करण्याची क्षमता दर्शवतो. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेविषयक अनेक सेवा समर्थपणे आणि सहजतेने केली आहे. त्या सर्वत्रच्या साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आले. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मोठे योगदान असणार आहे.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची अलौकिक आध्यात्मिक वैशिष्ट्ये
३ अ. आध्यात्मिक त्रासांवर मात करणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कुंडलीत रवि आणि शनि या ग्रहांचा अशुभयोग आहे, तसेच त्यांचा जन्म ‘सर्वपित्री अमावास्या’ या तिथीला झाला आहे. त्यामुळे त्यांना प्रारंभी तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास होता; परंतु समष्टी साधनेचा ध्यास घेऊन भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा सातत्याने केल्यामुळे त्यांचा आध्यात्मिक त्रास अल्पावधीत पूर्णपणे दूर झाला. याविषयी त्या म्हणतात, ‘प्रत्येक क्षणी ‘सेवेसाठी कसे प्रयत्न करू ? प्रत्येक क्षणी सेवेत कसे राहू ?’ यासाठी मी प्रयत्न करू लागले. जेव्हा प्रत्येक क्षण सेवेत घालवू लागले, तेव्हा त्रासाचे प्रमाण आपोआपच न्यून होत गेले. भावजागृतीचे प्रयत्न आणि अखंड सेवेत रहाणे, यांमुळे माझे त्रास न्यून झाले.’
३ आ. अविश्रांत आणि झोकून देऊन गुरुकार्य करणे : गुरुकार्य म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा श्वास आहे. केवळ काही घंटे विश्रांती घेऊन त्या दिवसरात्र गुरुकार्यात मग्न असतात. याविषयी त्या म्हणतात, ‘दिवसरात्र कितीही सेवा केली, तरी ‘आणखी किती करू’, असे होते. ‘विश्रांतीसाठी रात्री डोळे मिटूच नयेत, केवळ सेवारत रहावे’, असे वाटते. त्यामुळे जेवण-झोप यांची आठवणही येत नाही. करणारा देवच आहे. आता करत असलेली सेवा काहीच नाही. ‘आपल्याला आणखी पुष्कळ करायचे आहे’, असे वाटते.’
३ इ. प्रीती : ‘इतरांघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी त्यांना आत्यंतिक तळमळ आहे. याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणतात, ‘वात्सल्यभावाने ओतप्रोत असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांवर आईच्या मायेने केलेले प्रेम आणि साधनेत प्रगती होण्यासाठी केलेले साहाय्य यांची महती शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. त्यांच्यात ‘प्रीती’ हा स्थायी भाव आहे. त्यामुळे ‘घरादाराचा त्याग केलेल्या साधकांना माझ्यानंतर कोण सांभाळून घेणार ?’ आणि ‘त्यांची प्रगती कोण करून घेणार ?’ या चिंतेतून त्यांनी मला मुक्त केले आहे.’
३ ई. ‘श्री महालक्ष्मीतत्त्व’ जागृत होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कुंडलीत दशम स्थानात गुरु आणि शुक्र या ग्रहांची मघा नक्षत्रात युती आहे. हा योग ‘श्री महालक्ष्मीतत्त्वा’चा दर्शक आहे. दशम (कर्म) स्थानातील ग्रह प्रकर्षाने फळ देतात. सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये ‘श्री महालक्ष्मीतत्त्व’ असल्याचे सांगितले आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये देवीतत्त्व जन्मतः बीजरूपात होते; काळानुरूप ते प्रगट होऊ लागले. सप्तर्षींनी सांगितल्यानुसार ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून सूक्ष्म-स्तरावर मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे.
कृतज्ञता : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करण्याची संधी मिळाली, याविषयी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.४.२०२३)