भारतातील महान ऋषि परंपरा 

लेखांक ३

काही ऋषींचा परिचय

वेदांतील ज्ञानाचा प्रसार करणारे थोर ऋषि मुनी, त्यांची परंपरा, कार्य, त्यांनी केलेले संशोधन आणि शिकवण यांची माहिती आजच्या समाजाला अत्यल्प आहे. भारतातील ऋषि परंपरा इतकी पुरातन आहे की, वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. आजही भारतीय मनात ऋषि पदाविषयी नितांत आदर आहे. आधुनिक काळातही अनेक ऋषि होऊन गेलेले आहेत. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यास ही ऋषि परंपरा समजून घेणे उपकारक ठरेल. या सदराच्या माध्यमातून थोर ऋषींविषयीची अमूल्य माहिती आपण जाणून घेत आहोत. आतापर्यंत ऋषींचे कार्य, वेदकाळातील त्यांचे जीवन, त्यांचे प्रकार आदी माहिती घेतली. या लेखात काही ऋषींचा परिचय करू घेऊया.

१. सनकादी कुमार

‘हे ४ असून सनक, सनातन, सनन्दन आणि सनत्कुमार अशी त्यांची नावे आहेत. सृष्टी निर्माणापूर्वी ब्रह्मदेवाने त्यांना संकल्पाने निर्माण केले. ते नित्य ५ वर्षे वयाचेच आहेत. जन्मापासून ब्रह्मनिष्ठ आणि ईश्वरभक्त आहेत. ते कुठेही संचार करू शकतात; पण कैलासावर शंकराजवळ अधिक काळ असतात. पृथुराजाला उपदेश त्यांनीच केला. हे भक्तीमार्गाचे आचार्य आहेत. कल्पांतापर्यंत नित्य आहेत.

२. महर्षि अत्रि

हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असून त्यांची पत्नी अनसूया त्रिगुणातीत म्हणून अत्रि. दत्तात्रेय हे त्यांचेच पुत्र ! हे नित्य दक्षिण दिशेलाच रहातात. अनसूया ही सर्वश्रेष्ठ पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यप्रभावानेच ब्रह्मा, विष्णु आणि शंकर तिचे बालक बनून दत्तात्रेय झाले. ब्रह्मा चंद्र, विष्णु दत्त आणि शंकर दुर्वास या नावाने तिचे पुत्र झाले. रामचंद्रांनी वनवास प्रसंगी ‘सीतेला उपदेश करावा’, असे अनसूयेला विनवले होते.

३. महर्षि शांडिल्य

कश्यप वंशातील महर्षि देवल यांचे पुत्र शांडिल्य महर्षि ! स्वतंत्र स्मृति लिहिणार्‍या शंख आणि लिखित मुनींचे हे वडील. शांडिल्यांनी प्रभास क्षेत्रात उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. या प्रभास क्षेत्रातच त्यांनी शिवलिंग स्थापन केले. तोच सोरटी सोमनाथ होय. यांनी भक्तीशास्त्रावर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे नाव ‘शांडिल्य भक्तिसूत्रे’ ! ‘जीवाने ब्रह्मरूप होणे, हेच भक्ताचे फळ’, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.

४. महर्षि अगस्त्य

इंद्राने वृत्रासुराला मारले. त्या वेळी कालेय नावाच्या दैत्यांनी समुद्राचा आश्रय घेतला. रात्री ते समुद्राबाहेर येऊन ऋषिमुनींना त्रास द्यायचे. शेवटी देव अगस्त्यांना शरण गेले. त्यांनी एका चुळकेने समुद्र पिऊन टाकला आणि देवाने कालेय दैत्यांचा नाश केला. उन्मत्त आणि कामांध नहुष राजाला ‘अजगर हो’, असा शाप देऊन शिक्षा केली.

हे सप्तर्षीतील एक ऋषि ! रामाला त्यांनी अनेक शस्त्रांचे मंत्र दिले होते. विंध्य पर्वत वाढू लागला आणि सूर्याचा मार्ग अडवू लागला. त्या वेळी ‘मी दक्षिणेतून येईपर्यंत दंडवत स्थितीत पडून रहा’,  असे त्यांनी विंध्यास सांगितले. ते कायमचे दक्षिणेत राहिले.

(साभार : ‘अक्कलकोट स्वामीदर्शन’, वर्ष १९ अंक ४ ) à