वाचा नवे सदर !
चंद्रयान आणि सौरयान यांचे अवकाशात थेट प्रक्षेपण झाल्यानंतर ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला. त्यात भारतीय वेदांमध्ये ज्ञानाच्या आधारे आधुनिक विज्ञान प्रगती करू शकते आदी सांगून वेदांचे कौतुक केले आहे. या वेदांतील ज्ञानाचा प्रसार करणार्या थोर ऋषि-मुनींविषयी ऐकल्यावर भारतियांची छाती अभिमानाने फुलते. असे असले, तरी थोर ऋषि-मुनी, त्यांची परंपरा, कार्य आणि शिकवण यांची माहिती अत्यल्प आहे. मागील अंकात ऋषींचे कार्य, त्यांचे मनुष्याच्या जीवनातील योगदान यांविषयी माहिती जाणून घेतली. या लेखात पुढील भाग जाणून घेऊया.
लेखांक २
१. ऋषींचे प्रकार
अ. प्रजापती ऋषि : ब्रह्मदेव स्वतः आणि त्यांनी प्रजाविस्तार करण्यासाठी जे ऋषि उत्पन्न केले, ते प्रजापतिरूप ऋषि होत. महाभारतात ब्रह्मा, स्थाणू, मनु, दक्ष, भृगु, धर्म, तपस्, दम, मरीची, अंगिरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह, ऋतु, वसिष्ठ, परमेष्ठी, विवस्वान, सोम, कर्दम, क्रोध आणि विक्रीत असे २१ प्रजापती सांगितले आहेत. निरनिराळ्या पुराणांत ७, १०, १२, १३, १४ अशा प्रजापतींच्या विविध संख्या आढळतात.
आ. गोत्रर्षि : मानव वंशातील अनेक कुलशाखा ज्या ऋषींपासून प्रवृत्त झाल्या, त्या कुलशाखाप्रवर्तक ऋषींना ‘गोत्र’ असे पारिभाषिक नाव आहे. विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य हे ८ गोत्रप्रवर्तक ऋषि आहेत. या ८ ऋषींनी प्रवृत्त केलेल्या कुलांमध्ये असंख्य ‘गोत्रसंज्ञक ऋषि’ उत्पन्न झाले. त्यांपैकी काही ऋषींची नामनिर्देशपूर्वक गणना बोधायनादी सूत्रकार आणि पुराण यांनी उदाहरणादाखल केलेली आहे.
इ. आचार्य ऋषि :
रत्नकोशात ऋषींचे वेगळे ७ प्रकार सांगितले आहेत.
सप्त ब्रह्मर्षि-देवर्षि-महर्षि-परमर्षयः ।
काण्डर्षिश्च श्रुतर्षिश्च राजर्षिश्च क्रमवाराः ।।
अर्थ : ब्रह्मर्षि (ब्रह्मतत्त्व जाणणारे), देवर्षि (देवतांचे ऋषि), महर्षि (महान ऋषि), परमर्षि (सर्वश्रेष्ठ ऋषि), काण्डर्षी (वेदाच्या एखाद्या शाखेचे अध्ययन करणारे), श्रुतर्षि (श्रुती-स्मृतींचे जाणकार), राजर्षि (आधी राजा असून आध्यात्मिक बळावर ऋषि झालेले) हे ऋषींचे क्रमवार ७ प्रकार आहेत.
ब्रह्म जाणणारे ते ब्रह्मर्षि. यामध्ये कश्यप, वसिष्ठ, भृगु, अंगिरस, अत्रि इत्यादींचा समावेश आहे. देवजातीचे ऋषि ते देवर्षि. यामध्ये धर्म, पुलस्त्य, ऋतु, पुलह, नर-नारायण, वालिखिल्य, नारद इत्यादींचा समावेश आहे. महर्षि आणि परमर्षि यांचा स्पष्ट विभाग नाही. या २ शब्दांचा केवळ ‘श्रेष्ठ’ ऋषि या अर्थाने अनेक प्रकारच्या ऋषींना उद्देशून प्रयोग केलेला आढळतो. धर्मशास्त्र, पूर्वाेत्तर मीमांसा, व्याकरण, न्याय, धनुर्विद्या इत्यादी शास्त्रे प्रवृत्त करणारे जैमिनी, व्यास, शांडिल्य इत्यादी ऋषि आणि वेदकांडाचे प्रवर्तक ऋषि सोम, अग्नि इत्यादींना काण्डर्षि अशी संज्ञा आहे. अन्य ऋषींपासून विद्या ग्रहण करून जे ऋषिपदास पोचले, अशा ऋषींना ‘श्रुतर्षि’ अशी संज्ञा आहे. यांत आयुर्वेदपर ग्रंथांचे प्रणेते सुश्रुत इत्यादींचा समावेश आहे. क्षत्रिय वंशाचे किंवा प्रजानुरंजनामुळे जे ऋषित्वाला पोचले ते राजर्षि. यामध्ये ऋतुपर्ण, इक्ष्वाकु, नाभाग इत्यादींचा समावेश आहे.
२. ऋषिचर्या
सामाजिक आणि राजकीय कार्यात खर्ची घातलेला वेळ जो अतिशय मर्यादित आहे तो सोडल्यास, ऋषींचा बहुतेक वेळ तपश्चर्या आणि ज्ञानप्रसार यांतच व्यतित होत असे. शरीर, वाणी आणि मन या ठिकाणचे दोष नाहीसे करण्यासाठी शास्त्रविहित विशिष्ट कठोर कर्मे आचरणे असा ‘तप’ शब्दाचा अर्थ आहे. अशी तपश्चर्या हे ऋषि नियमितपणे करत असत.
अ. उपनिषत्कालीन ऋषि म्हणजे याज्ञवल्क्य, आरुणि, सनत्कुमार, रैक्व, शांडिल्य, ऐतरेय, दधीचि हे होत. उपनिषत्कालीन परंपराच पुढे पुराणकाळात चालू राहिली; मात्र पुराणकाळातील बहुतेक ऋषि हे गृहस्थाश्रमी होते. ते अरण्यावास करून राहिले, तरी ते गृहस्थाश्रमी होते आणि त्यांना मुले-बाळेही होती.
आ. रामायणाच्या काळात वसिष्ठ, विश्वामित्र इत्यादी ऋषि होऊन गेले, तर पांडवांच्या काळात व्यास होऊन गेले. परीक्षित आणि जनमेजय यांच्या काळात वैशंपायन ऋषींचा उल्लेख आढळतो; मात्र जनमेजयानंतर ऋषिपरंपरा खंडित झालेली दिसते; कारण चंद्रगुप्त मौर्य, पुष्यमित्र शृंग किंवा गुप्तराजे यांच्या काळातल्या कोणत्याही ऋषींचा पुराणात उल्लेख आढळत नाही.
ऋषिपरंपरा खंडित झाली असली, तरी भारतीय मनाला या अनन्यसाधारण संस्थेचे अतिशय आकर्षण राहिलेले आहे; म्हणूनच भारतीय मन खर्या अर्थाने प्रभावित होते, ते युद्धातील पराक्रमाने नव्हे, व्यापारातील यशानेही नव्हे किंवा राजकारणातील कौशल्यानेही नव्हे, तर वैराग्यमूर्ती, ज्ञानसंपन्न आणि तेजस्वी ऋषींमुळे !’
(क्रमशः)
– श्री. अ.ल. देशपांडे
(संदर्भ : भारतीय संस्कृतीतील ऋषिपरंपरा , डिसेंबर १९९६)