पालकांनी आरोग्‍यासाठी वेळ कसा काढावा ?

‘सध्‍या अनेक पालक त्‍यांच्‍या पाल्‍यांचा अभ्‍यास, शिक्षण आणि एकूण आयुष्‍य यांत इतके गुरफटून जातात की, यातच त्‍यांचा बराच वेळ जातो. पालकच पाल्‍यांच्‍या परीक्षांचा पाल्‍यांपेक्षा अधिक ताण घेतात. त्‍यांना स्‍वतःसाठी वेळच काढता येत नाही, तर आरोग्‍यासाठी वेळ काढणे, म्‍हणजे त्‍यांना कर्मकठीणच वाटते.

वैद्य समीर मुकुंद परांजपे

खरेतर परीक्षा आणि अभ्‍यास यांचे गांभीर्य मुलांना हवे. पालकांनी केवळ त्‍यांना आवश्‍यक त्‍या सोयीसुविधा पुरवण्‍याचे कर्तव्‍य करावे; मात्र असे चित्र दुर्लभ असते. मुले अभ्‍यास करून शिकतात, ते त्‍यांच्‍या महत्त्वाच्‍या परीक्षा देतात; पण या सगळ्‍यात पालकांना त्‍यांच्‍या किती तरी इच्‍छांना मुरड घालावी लागते. कित्‍येकदा त्‍यांना स्‍वतःचे छंद जपायला किंवा अन्‍य काही करायला वेळच मिळत नाही. मूल जेव्‍हा लहान असते, तेव्‍हा पालक त्‍याचे सर्व करतातच ना ! मग मूल मोठे झाल्‍यावर त्‍याला सवय लागावी म्‍हणून ‘स्‍वतःची कामे स्‍वतः करायला सांगणे’, हे पालकांनी अवश्‍य करावे. किमान त्‍याच्‍या संबंधित असणारी कामे तरी स्‍वतः न करता त्‍याला करू द्यावीत.

कित्‍येकदा मूल अभ्‍यास करत आहे; म्‍हणून त्‍याला सर्व काही बसल्‍या जागी दिले जाते. कधीतरी परीक्षांच्‍या काळामध्‍ये असे करणे ठीक आहे; पण नेहमीच असे केल्‍याने पालकांना त्‍यांचे वेगळे असे काही आयुष्‍यच रहाणार नाही. पालकांनी मुलांची शारीरिक कामे करून स्‍वतःच्‍या शरिराला किंवा त्‍यांच्‍या परीक्षांचा ताण घेऊन स्‍वतःच्‍या मनाला त्रास देऊ नये.

मुले खरोखर सलग एवढा अभ्‍यास करतात का की, ज्‍यामुळे त्‍यांना स्‍वतःची कामे करायलासुद्धा वेळ नसतो ? या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. मुले कितीतरी वेळ भ्रमणभाष पहाण्‍यात व्‍यतित करतात. मुलांनी त्‍यांचा हा ‘स्‍क्रीन टाइम’ म्‍हणजे भ्रमणभाष, संगणक, दूरचित्रवाणी आदी पहाण्‍याचा कालावधी जरा न्‍यून करावा अन् घरात साहाय्‍य करावे. लहान कामे जसे की, केर काढणे, इस्‍त्री करणे, जेवणानंतरची आवराआवर करणे, भांडी घासणे इत्‍यादी जरी मुलांनी केली, तरी पालकांना काही प्रमाणात तरी त्‍यांच्‍यासाठी वेळ मिळेल. व्‍यवस्‍थित नियोजन करून कामांची वर्गवारी केली, तर सर्वांनाच व्‍यायाम, प्राणायाम, वाचन, नामजप यांसाठी किंबहुना शारीरिक आणि मानसिक आरोग्‍य जपणे अन् ते टिकून ठेवणे यांसाठी प्रयत्न करता येतील !’ (१७.३.२०२३)

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी.

(संपर्क इ-मेल : [email protected])