(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, आम्ही केवळ ‘अल्ला’पुढे मस्तक झुकवतो !’-अबू आझमी

अबू आझमी यांनी विधानसभेत केले वक्तव्य

मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – आम्ही स्वत:च्या आईपुढेही नतमस्तक होत नाही. जगात कुणापुढेही मस्तक झुकवण्यास इस्लाम अनुमती देत नाही. आम्ही केवळ अल्लाला मानतो. आम्ही ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत काढले. या वेळी सत्ताधारी पक्षातील शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप यांच्या आमदारांनी ‘इस देश मे रहना, होगा तो ‘वन्दे मातरम्’ कहना होगा’, या घोषणा देत अबू आझमी यांच्या वक्तव्याला विरोध केला.

१८ जुलै या दिवशी सभागृहात छत्रपती संभाजीनगर येथील रोशनगेट येथे हिंदू-मुसलमान यांच्यामध्ये झालेल्या वादाविषयी लक्षवेधी सूचना उपस्थित करतांना आझमी यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी सभागृहात निर्माण झालेल्या वादंगामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

१. अबू आझमी लक्षवेधी सूचनेच्या वेळी म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्येच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात ‘सकल हिंदु समाजा’कडून काढण्यात आलेल्या मोर्च्यांमध्ये मुसलमानांना अपमानित करण्यात आले. ‘मुसलमान देशद्रोही आहेत’, असे भासवण्यात आले.

२. या वेळी शिवसेना-भाजप यांच्या काही आमदारांनी अबू आझमी यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची विनंती केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, ‘आझमी यांचे बोलणे पडताळून निर्णय घेण्यात येईल’, असे सांगितले.

३. अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानामुळे विधानसभेचे स्थगित झालेले कामकाज पुन्हा चालू झाल्यानंतरही त्यांनी स्वत:च्या वादग्रस्त विधानाविषयी क्षमायाचना किंवा खंत व्यक्त केली नाही; उलट पुन्हा स्वत:च्या वक्तव्याचे समर्थन केले.

‘वन्दे मातरम्’ कालही आपले राष्ट्रीय गीत होते आणि भविष्यातही राहील ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘वन्दे मातरम्’ हे कोट्यवधी देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ‘वन्दे मातरम्’ कोणत्याही एका धर्माचे नाही. ते धार्मिक गीत नाही. राज्यघटनेने ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे. राज्यघटनेला मानता म्हणूनच आपण सभागृहात आहात. ‘वन्दे मातरम्’ कालही आपले राष्ट्रीय गीत होते आणि भविष्यातही राहील. ‘वन्दे मातरम्’ म्हटल्याविना सभागृहाला प्रारंभ होत नाही. ही भूमी आपली माता आहे आणि आईपुढे नतमस्तक होऊ नये, असे कोणताही धर्म सांगत नाही.