१. गर्भधारणेच्या वेळी मधुमेह होण्याचा धोका टाळण्यासाठी वजन न्यून करण्याचे महत्त्व
‘‘डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियमित व्यायाम, आहार आणि गोळ्या सगळे व्यवस्थित चालू आहे. आजची ‘फास्टिंग शुगर’ ८९ आणि ‘पीपी शुगर’ ११८ आली आहे. (जेवणापूर्वीचे आणि जेवणानंतरचे शरिरातील साखरेचे एम्.जी./डी.एल्.मध्ये प्रमाण) ठीक आहे ना ?’’ नीनाचा हा संदेश वाचून मन २ मिनिटे भूतकाळात गेले. दीड वर्षांपूर्वी नीनाने पहिल्या गर्भावस्थेत अनियंत्रित मधुमेहामुळे तिचे बाळ गमावले होते. तेव्हा ती गावाकडे होती. तिचे वजन पहिल्या गर्भावस्थेत प्रारंभीपासूनच फार अधिक होते. तिला ‘वजन न्यून केल्यावरच गर्भधारणेचे नियोजन कर’, असे आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) पुष्कळ समजावून सांगितले होते, तरीही ती आणि तिच्या घरच्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. गर्भवती राहिल्यानंतर तिचे वजन अतिशय वेगाने वाढले आणि ७ व्या मासापासून साखरेचे प्रमाण वाढण्यास प्रारंभ झाला. गावाकडील स्त्रीरोग तज्ञांनी नीनाला कठोर पथ्य, प्रतिदिन नियमित चालायला जाणे, साखर (शुगर) नियंत्रणासाठी गोळ्या घेणे इत्यादी गोष्टी समजावून सांगितल्या; पण घरातील काही लोकांनी ‘काही होत नाही, तू दोन जिवांची आहेस, भरपूर खा’, असे म्हणून तिला उत्तेजन दिले. शेवटी आधुनिक वैद्यांची भीती खरी ठरली. नीनाच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐन ९ व्या मासात बंद झाले आणि तिने बाळ गमावले. नंतर मात्र सगळ्यांचेच डोळे खाडकन उघडले आणि पुढच्या गर्भारपणाच्या पूर्वी तिला शहरात आणायचा निर्णय घेण्यात आला.
या वेळी मात्र नीनाने पूर्ण मनावर घेऊन गर्भधारणेच्या पूर्वीच १० किलो वजन घटवले होते. ‘एच्बीए १ सी’ पातळी ६ टक्के किंवा अल्प आहे, जीवनसत्त्वाच्या गोळ्या चालू आहेत, तसेच नियमित व्यायाम आणि योग्य आहार चालू आहे’, अशी सगळी खात्री करूनच आम्ही नीनाच्या गर्भधारणेचे नियोजन केले. आता सगळे नियोजन ठरल्याप्रमाणे सुरळीत चालू आहे.
२. लठ्ठपणा आणि आरोग्याविषयीची अनास्था यांमुळे भारतामध्ये गर्भवतींना मधुमेह होण्याचे प्रमाण अधिक
पुण्यामध्ये नुकतीच स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ञ यांची परिषद झाली. त्यात गर्भावस्थेत वेगाने वाढणार्या मधुमेहांच्या रुग्णांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. पूर्वी या प्रकारचा मधुमेह केवळ उच्चभ्रू समाजातील स्त्रियांमध्ये आढळत होता; पण आता तो सर्व स्तरातील स्त्रियांमध्ये आढळत आहे. ससूनसारख्या रुग्णालयामध्येही अशा गर्भवती मोठ्या प्रमाणात येतात; पण वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे बाळ आणि आई दोघेही विविध गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये अडकतात. याची कारणे अर्थातच व्यायामाचा अभाव, अन्न पदार्थांची भरपूर रेलचेल आणि आरोग्याविषयीची अनास्था ही आहेत. भारतियांमध्ये गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आपल्या जेवणात कर्बोदके पुष्कळ अधिक आणि प्रथिने अल्प झाली आहेत अन् खाण्यावर संयम राहिला नाही. त्यामुळे भारतात जगातील सर्वाधिक मधुमेही दिसून येत आहेत.
आधुनिक संशोधनानुसार गर्भधारणा होतांना आणि झाल्यावर स्त्रीचे कुपोषण (पोषक आहार नसणे) होत असल्यास तिच्या पोटातील गर्भावर त्याचे विपरीत परिणाम होतात. तसेच अती वजन असणे, हेही एक प्रकारचे कुपोषणच आहे. त्याचे परिणाम गर्भाच्या जनुकीय रचनेवर होतात. त्यामुळे हे बाळ मोठे झाल्यावर त्याला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता पुष्कळ अधिक वाढते.
३. गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान आणि घ्यावयाची काळजी
गर्भारपणातील मधुमेहाचे २ प्रकार आहेत. पहिला प्रकार, म्हणजे गर्भधारणेच्या पूर्वीच असलेला मधुमेह आणि दुसरा प्रकार, म्हणजे साधारण ७ व्या मासामध्ये होणारा मधुमेह. बहुतेक करून दुसरा प्रकार अधिक आढळून येतो. प्रत्येक गर्भवतीची ७ व्या मासात ‘गॅमा ग्लुटामिल ट्रान्सफरेज’ (जीटीटी) नावाची चाचणी करण्यात येते. त्यात ७५ ग्रॅम ग्लुकोज देऊन २ घंट्यांनी गर्भवतीची ‘शुगर’ तपासतात. ती १४० एम्.एम्.ओ.एल्./लिटरहून अल्प येणे अपेक्षित असते. ७५ ग्रॅम ग्लुकोज देऊनही ज्या स्त्रियांची शुगर १४० हून अल्प येते, त्यांचे शरीर ग्लुकोजचे व्यवस्थित विघटन करू शकत आहे, असा त्याचा अर्थ आहे. ज्या स्त्रियांचे शरीर हे करू शकत नाही, त्यांची शुगर वाढते आणि मग मधुमेहाचे निदान केले जाते. १४० एम्.एम्.ओ.एल्./लिटरपेक्षा अधिक शुगर आली; म्हणून लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यानंतर भात, बटाटा, साखर, मैदा अशी कर्बोदके आहारातून वगळली आणि प्रतिदिन १ घंटा चालण्याचा व्यायाम चालू केला, तर शुगर नियंत्रणात येऊ शकते. गर्भारपणामध्ये उपाशीपोटी (फास्टींग बी.एस्.एल्. (ब्लड शुगर लेव्हल – रक्तातील साखरेचे प्रमाण)) ९० च्या खाली आणि जेवणानंतरची (पी.पी.बी.एस्.एल्.) १२० च्या खाली असावी लागते. गर्भारपणात स्त्रीच्या शरिरामध्ये स्त्रवणारे सगळेच ‘हॉर्मोन्स’ (संप्रेरक) तिची शुगर वाढवण्याचे काम करत असतात. एरव्ही हे बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असते; पण मधुमेही गर्भवतीच्या शरिरातील चयापचय वेगळे असल्याने तिची शुगर प्रमाणाबाहेर वाढत जाते.
४. गर्भवतीची शुगर वाढल्याने बाळावर होणारे परिणाम
गर्भवतीची शुगर वाढल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम हळूहळू तिच्या बाळावर होऊ लागतात. बाळाचे वजन अनियंत्रित वाढू लागते, बाळाभोवतीचे पाणी (लिकर) झपाट्याने वाढू लागते. बाळामध्ये हृदय, किडनी, मेंदू, पाठीचा कणा आणि पचन संस्था यांमधील विकृती, दुभंगलेले टाळू आणि ओठ अशी विविध व्यंगे निर्माण होऊ शकतात. असे बाळ वजन अधिक असूनही तब्येतीने अतिशय नाजूक होते. जन्मानंतर त्यांना शुगर अल्प होणे आणि कावीळ यांसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भारपणातील मधुमेहामुळे बाळाचे वजन वाढते, तसेच प्रसुतीच्या कळा सहन करण्याची शक्ती फारच अल्प होते. त्यामुळे ‘सिझरियन’ची (शस्त्रकर्म) शक्यता वाढते. सामान्य बाळंतपण झाल्यास बाळाचे डोके किंवा खांदे अडकून बसल्याने फार मोठा धोका उद़्भवू शकतो. हा मधुमेह अनुवांशिकही असू शकतो. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह होतो, त्यांना नंतरच्या आयुष्यात मधुमेह होण्याची शक्यता पुष्कळ अधिक असते. तसेच वयात आल्यानंतर ‘पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज’ (गर्भाशयामध्ये गाठी होणे) असणार्या मुलींमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते.
५. अधिक वजनाच्या मुलींमध्ये गर्भपात होण्याचे प्रमाण लक्षणीय
वयात येणार्या मुलींची नीट काळजी घेतली, तर भविष्यात हे प्रमाण अल्प करता येईल. या मुलींना नियमित व्यायाम आणि योग्य आहार यांची सवय लहानणापासूनच लावली पाहिजे. त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात रहायला साहाय्य होईल. पाळी चालू झाल्यावर ती २ ते ३ वर्षांत नियमित झाली नाही, तर स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेऊन पाळी नियमित होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी आपले वजन योग्य आहे ना, हे पाहिले पाहिजे. ‘वजन न्यून करून मगच गर्भधारणेचे नियोजन करा’, असे सांगितल्यावर पुष्कळ वेळा मुली अप्रसन्न होतात. त्यांचा पुढील समस्या टाळण्याचा प्रयत्न असतो. अधिक वजनाच्या मुलींमध्ये गर्भपात होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. जेव्हा गर्भवती तपासणी करण्यासाठी आमच्याकडे येतात, तेव्हा त्यांच्या वाढत्या वजनाकडे आमचे बारीक लक्ष असते. पुष्कळ वेगाने वाढणारे वजन ही धोक्याची चेतावणी आहे. कर्बोदके अल्प आणि प्रथिने अधिक हा नियम पाळला जायला हवा. त्यासाठी गर्भवतीला अती खायला घालणेे टाळायला हवे.
६. मधुमेहाचे निदान झाल्यावर गर्भवतीने घ्यावयाची काळजी
मधुमेहाचे निदान झाले की, आम्ही काही गोळ्या चालू करतो. गर्भवतीने ‘बी.एस्.एल्.’ करून आम्हाला नियमित कळवत रहाणे अत्यावश्यक आहे. गोळ्या, आहार आणि व्यायाम करूनही शुगर नियंत्रणात आली नाही, तर मग मात्र इन्सुलिनची इंजेक्शन्स चालू करावी लागतात. त्यासाठी कधी कधी रुग्णाला भरती करून शुगरची वारंवार तपासणी करून डोस ठरवावा लागू शकतो. इन्सुलिनचे इंजेक्शन कसे घ्यायचे, हे रुग्ण किंवा तिच्या नातेवाइक यांना शिकवले जाते. इन्सुलिन चालू केल्यानंतर रुग्णावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. शुगर अल्प झाल्यास साखर कायम जवळ ठेवणे महत्त्वाचे असते. अशा रुग्णाने ‘ग्लुकोमीटर’ घरात ठेवणे उत्तम. त्यामुळे शुगरची तपासणी घरीच नियमित करता येते. प्रयोगशाळेत रक्त देतांना नमुन्याची घरीच ‘ग्लुकोमीटर’वरही तपासणी करावी. त्यामुळे प्रयोगशाळेचा अहवाल आणि ‘ग्लुकोमीटर’वरचा अहवाल यांची तुलना करून बर्यापैकी शुगरची अचूकता घरीच तपासता येते.
७. मधुमेह असणार्या गर्भवतीच्या बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक !
मधुमेह असलेल्या गर्भवतीच्या बाळाकडेही विशेष लक्ष ठेवावे लागते. त्यासाठी अधिक वेळा ‘सोनोग्राफी’ केली जाते. तसेच ‘डॉप्लर स्टडी’चीही तपासणी केली जाते. बाळाला आईकडून होणारा रक्तपुरवठा तपासून बघितला जातो. मधुमेही स्त्रियांचे बाळ बहुतेक वेळा वजनाने अधिक असते; पण काही वेळा त्यांची वाढ खुंटते आणि त्यांचे वजन अन् वाढ अल्प होऊ लागते. हा चिंतेचा विषय असतो. अशा बाळांची प्रसूती वेळेपूर्वी करावी लागू शकते. मधुमेहासमवेत कधी कधी गर्भवतीचा रक्तदाबही वाढू लागतो. त्यासाठी वेगळी औषधे चालू करून त्याकडेही लक्ष ठेवावे लागते.
गर्भवतीचे दिवस जसजसे भरत येतात, तसतसे शुगर आणि रक्तदाब (वाढला असेल तर) हळूहळू वाढू लागतो. अशा वेळी गर्भवतींच्या प्रकृतीकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागते. धोक्याची शक्यता वाढल्यास वेळेपूर्वी प्रसुतीचा निर्णय घ्यावा लागू शकतो. आईला मधुमेह आहे, हे तिच्या बाळाला कळता कामा नये. इतकी तिची शुगर सामान्य असायला हवी. हे मधुमेह असलेल्या गर्भवतीच्या उपचारांचे ध्येय असावे लागते.
८. मधुमेह असणार्या गर्भवतीची प्रसूती करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
मधुमेह असलेल्या गर्भवतीची प्रसुती कधी करायची ? हे शुगर नियंत्रणात आहे कि नाही ? यावर ठरवले जाते. मधुमेह नियंत्रणात नसेल आणि दिवस भरेपर्यंत थांबणे शक्य नसेल अन् ‘सोनोग्राफी’मध्ये बाळावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसत असेल, तर प्रसुती आधी करण्याचा निर्णय घेतला जातो. बाळाचे फुफ्फुस चांगले कार्यरत होण्यासाठी गर्भवतीला ‘स्टिरॉइड्स’ची इंजेक्शन्स (आवश्यकता असल्यास) दिली जातात. त्यानंतर प्रसुती केली जाते. बाळ आणि आई यांची प्रकृती नाजूक असल्याने ‘सिझेरियन’ची शक्यता वाढते. बाळाचे वजन अधिक असणे, बाळाभोवतीचे पाणी अधिक असणे, डोके वर तरंगत रहाणे, मधुमेह आणि रक्तदाब यांमुळे त्याकडे जाणारा रक्तप्रवाह अल्प होणे अशी कारणे ‘सिझेरियन’साठी कारणीभूत असतात. प्रसूती झाल्यानंतरही या बाळांच्या प्रकृतीकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. त्यांना रक्तातील साखर अल्प होणे, कावीळ होणे अशा धोक्यांचा सामना करावा लागू शकतो.
९. गर्भावस्थेत मधुमेह त्रासदायक असला, तरी तो सहजपणे टाळू शकतो !
गर्भारपणात मधुमेह झालेल्या स्त्रियांनी प्रसूतीनंतरही आयुष्यभर काळजी घेणे आवश्यक आहे. प्रसूतीनंतर मधुमेह तात्पुरता नाहीसा होतो; परंतु नियमित व्यायाम आणि आहाराचे पथ्य न पाळल्यास मधुमेह माघारी फिरून कायमचा पाठीशी लागू शकतो. हृदयरोग, किडनीचे आजार, काही प्रकारचे कर्करोग यांचीही शक्यता वाढते. हा आजार त्रासदायक असला, तरी तो सहजपणे टाळू शकतो किंवा आटोक्यात ठेवू शकतो. कोणतीही गोष्ट तुम्ही २१ दिवस नियमित केली की, त्याची तुम्हाला सवय होते. त्यानंतर ते तुम्ही आयुष्यभर करू शकता. आजपासूनच पुढचे २१ दिवस तुम्ही पांढरा भात, बटाटे, साखर, मैदा आहारातून न्यून करून प्रतिदिन एक घंटा व्यायाम केला, तर पुढचे सहज जमणार ! आणि हो आपल्या नीनाची प्रसूती सुखरूप होऊन ती आता एका गोंडस मुलीची आई झाली आहे.
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे. (८.६.२०२३)
(साभार : फेसबुक)