हिंदु राष्ट्राची संकल्पना : सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन याचेच नाव !

सध्या रामनाथी (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानामध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. १६ जून या दिवशी या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

१. जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा हा आरंभ, म्हणजे आम्हा सर्व हिंदु राष्ट्रविरांसाठी गौरवाची अनुभूती देणारा क्षण आहे. ‘अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ या वर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या रूपात आयोजित होत आहे. गेल्या अकरा वर्षांत झालेल्या या अधिवेशनांची फलश्रुती म्हणजे सध्या यत्र-तत्र-सर्वत्र हिंदु राष्ट्राचीच चर्चा होत आहे. मला आठवते, पहिल्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वेळी आम्ही ‘हिंदु राष्ट्राचे घोषवाक्य काय असावे ?’, याचा शोध घेत होतो. त्या वेळी या अधिवेशनाचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूचना केली होती की, घोषवाक्य हे संस्कृत भाषेत असावे. त्यामुळे भाषेची अडचण न येता, ते उत्तरेपासून दक्षिण भारतापर्यंत लोकप्रिय होईल. वीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू क्रांतीकारक बाबाराव सावरकर यांनी स्वतःच्या एका पुस्तकात शेवटी ‘जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, असा शब्दप्रयोग केला होता. तो पाहिल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यात आणखी एक ‘जयतु’ शब्दाचा समावेश करून ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ हे महान वीररसात्मक घोषवाक्य हिंदु राष्ट्राला दिले आणि अल्पावधीतच ते सर्वत्र लोकप्रिय झालेले आज आपण सर्व जण अनुभवत आहोत.

या अधिवेशनांनी पाकिस्तानी-बांगलादेशी शरणार्थी हिंदूंसाठी कायदा बनवण्यापासून काशी-ज्ञानवापीच्या मुक्तीलढ्यापर्यंत अनेक संघर्ष केले आणि विजय प्राप्त केले. या अधिवेशनांनी प्रत्येक राज्य आणि क्षेत्र यांतील हिंदु शक्तींना (‘फोर्सेस’ना) हिंदु राष्ट्रासाठी संघटित केले आहे. हिंदु संघटना, धर्मनिष्ठ अधिवक्ते, विचारवंत, संत, व्यावसायिक, प्रसारमाध्यमे आदींची हिंदु ‘इको-सिस्टीम’ (परस्परांना संपर्क करणारी व्यवस्था) उभी केली आहे.

२. भारतभूमीवरील हिंदु राष्ट्रासमोरील आव्हाने !

२ अ. खलिस्तानचा आतंकवाद : हे एक भारत आणि हिंदु विरोधी युद्ध असून ते कॅनडा-पाकिस्तानसारख्या ख्रिस्ती-इस्लामी साम्राज्यवादी शक्तींद्वारे संचालित आहे. परकीय शक्तींच्या साहाय्याने पंजाबमधील धर्मांतरित ख्रिस्ती या आंदोलनात सहभागी आहेत. ‘अमेरिकेद्वारा प्रशिक्षित ख्रिस्ती मिशनरी आणि केरळमधील ‘इव्हॅन्जेलिकल’ (ख्रिस्ती श्रद्धावान) समूह या कार्यात सक्रीय आहे’, अशा वार्ता प्रसिद्ध झाल्या आहेत. ही हिंदु राष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. पंजाबमधील शीखबंधू हे हिंदु आहेत. पंजाबने भारताला ‘ऋग्वेद’ दिला, तर भारतीय संतांनी दिलेल्या शिकवणीवर आधारित ‘गुरुग्रंथसाहेब’ पंजाबला मिळाला आहे. काही अतीशहाणे हे खलिस्तानी आंदोलनाची हिंदु राष्ट्राशी तुलना करत आहेत. लक्षात घ्या, हिंदु राष्ट्राची चळवळ ही देश तोडण्यासाठी नाही, त्यात आतंकवाद नाही, ती राज्यघटनात्मक पद्धतीने कार्यरत आहे. खलिस्तानची चळवळ देशविघातक, आतंकवादी आणि असंवैधानिक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या तुलनांचा वैचारिक प्रतिकार करा !

२ आ. जिहादी कारवाया : सध्या भारतातील इस्लामी जगतात ‘सर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे करणे) घोषणा देणे, ही जणू ‘फॅशन’ झाली आहे. मदरसा, मशिदी, इस्लामिक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम आदींमध्ये या घोषणा सर्रास दिल्याच्या वार्ता प्रसिद्ध होत असतात. या घोषणांमधून उदयपूर (राजस्थान) येथील कन्हैय्यालाल असो कि अमरावती (महाराष्ट्र) येथील उमेश कोल्हे असो, याचे डोके शरिरापासून वेगळे करण्याचा जिहाद घडला. श्रद्धा वालकरचे केलेले ३५ तुकडे याच षड्यंत्राचा एक भाग आहेत. गेल्या वर्षभरात अनेक हिंदु कन्या, कार्यकर्ते आणि धर्मीय यांचे शिरच्छेद झालेल्या बातम्या हेच सांगतात की, भारतात रक्तरंजित जिहादचा प्रारंभ चालू झालेला आहे.

गेल्या २ वर्षांत रामनवमी, हनुमानजयंती इत्यादी सणांना दंगलींचे प्रमाण वाढलेले आपण अनुभवत आहोत. या वर्षी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर भारतातील प्रत्येक नगरात कट्टरपंथी समुदायाने मूकमोर्चे काढलेले आपण सर्वांनी ऐकलेले आहे. बिहारमध्ये पकडलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या आतंकवाद्याकडे भारताला वर्ष २०४७ पर्यंत ‘इस्लामी राज्य’ बनवण्याची योजना सांगणारे पुस्तकच मिळाले होते. भारतातील मौलानाही (इस्लामचे अभ्यासक) इस्लामी राष्ट्राचा विचार मांडू लागले आहेत. ‘इत्तेहाद मिल्लत कौन्सिल’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी म्हटले आहे, ‘‘जर खलिस्तानची मागणी करणार्‍यांवर खटले भरले जात आहेत, तर हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांवरही भरले जावेत, अन्यथा यापुढे मुसलमान युवकही वेगळ्या इस्लामी राष्ट्राची मागणी करतील !’’

बंधूंनो, खलिस्तानला समर्थन आणि हिंदु राष्ट्राला विरोध करण्यासाठी हे वक्तव्य नाही, तर इस्लामी राष्ट्राच्या मागणीचे संकेत करणारे हे वक्तव्य आहे. भारताला इस्लामी राज्य बनवू पहाणार्‍या या जिहाद्यांचे आव्हान भविष्यात हिंदु राष्ट्रासमोर असणार आहे.

२ इ. वाढता अधर्मवाद ! : हेही भविष्यात हिंदु राष्ट्रासमोरील आव्हान असणार आहे. सध्या समलिंगी समाजाच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयात आणि आधुनिकतावाद्यांकडून चर्चा चालू आहे. या अनैसर्गिक मनोविकृतीला ‘नैसर्गिक’ म्हटले जाऊ लागले आहे. समलिंगी विवाह ही पश्चिमी कुप्रथा भारतीय धर्मजीवनातील विवाहसंस्था, कुटुंबसंस्था, समाजसंस्था आणि जीवनमूल्ये उद्ध्वस्त करणारी आहे. समलिंगी विवाहाचे समर्थन, ‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या (विवाह न करता एकत्र रहाणे) व्यभिचाराला मान्यता, अश्लीलतेचे वाढते प्रस्थ, अशा अनैतिकतेला घटनात्मक करण्याचे प्रयत्न, हा अधर्मवादाचा उदय आहे. जेव्हा धर्मशास्त्रीय पद्धतीनुसार जगण्याची पद्धत नसते, समाज आणि राष्ट्राची रचना नसते, तेव्हा प्रत्येक माणूस असुर बनतो.

लक्षात ठेवा, धर्मग्रंथांवर विश्वास असो वा नसो, धर्मशास्त्रीय राज्यघटना सर्वांना अध्यात्मशास्त्रानुसार लागू आहे ! केवळ धर्मशास्त्रीय मार्गच माणसाला असुर होण्यापासून वाचवतो. म्हणूनच हा कल्याणकारी धर्मशास्त्रीय मार्ग दाखवण्यासाठी आम्हाला हिंदु राष्ट्र हवे आहे !

२ ई. अराजकतेकडे जाणारे राजकारण : हे सध्याचे सर्वांत गंभीर आव्हान आहे. ‘डेमोग्राफी इज डेमोक्रसी’ (लोकसंख्या हीच लोकशाही), हे तत्त्व असूनही आणि त्यानुसार लोकसंख्या नियंत्रण कायद्याची प्रचंड मागणी असूनही ती पूर्णत्वाला जाऊ शकलेली नाही. समान नागरी कायद्याची घोषणा उत्तराखंडमध्ये झाली; परंतु त्या पलीकडे काही घडलेले नाही. कर्नाटकमध्ये जिहादी हिंदु कार्यकर्त्यांचे गळे चिरत असतांना कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी काही झालेले नाही. उत्तरप्रदेश आणि आसाम राज्य वगळता सर्वत्रच सांस्कृतिक राष्ट्रवादापेक्षा ‘सेक्युलर’वादी (निधर्मीवादी) विकासवादी राजकारणाला प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यातून सध्याचे अराजक उत्पन्न झालेले आहे. माझी वाणी (भाषा) कठोर वाटली, तरी त्यातील भावना सत्याधिष्ठित आहेत, हे लक्षात घ्या !

सध्याच्या ध्रुवीकरणाच्या काळात हिंदु जागृत होत आहेत; पण हिंदूंच्या राजकीय पक्षांना जागृत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या भारत धर्म आणि अधर्म यांच्या उंबरठ्यावर उभा आहे. ‘भारताला हिंदु राष्ट्राकडे घेऊन जायचे असेल, तर धर्माच्या पक्षात कार्य केले पाहिजे’, हे सर्वच हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी लक्षात घ्यायला हवे ! या दृष्टीने या आव्हानाविषयी या अधिवेशनात आपण चर्चाही करणार आहोत.

हिंदु विचारांच्या राजकीय पक्षांची अयशस्विता पाहून अनेक जण विचारतात, ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ राजकारणामध्ये येण्याची भूमिका घेणार का ?’ याचे उत्तर असे की, ‘राजकीय कार्य करण्यासाठी राजकारणात यावे लागते’, हा एक अपसमज आहे. हिंदु राष्ट्राचा विचार हा राजकीय असला, तरी त्यासाठी आम्हाला राजकारणात येण्याची आवश्यकता नाही. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’द्वारे होणारे कार्य ज्ञानशक्तीचे आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्य क्रियाशक्तीचे असते. ज्ञानशक्तीच्या आधारावर क्रियाशक्ती कार्य करते !

३. हिंदु राष्ट्रावरील आक्षेपांचे प्रत्युत्तर आवश्यक !

सध्या देशभर हिंदु राष्ट्राची जशी चर्चा होत आहे, तसे हिंदु राष्ट्राचे विरोधक विविध आक्षेप घेत आहेत. या आक्षेपांचे प्रत्युत्तर देण्याचे वैचारिक कार्य आपल्याला भविष्यात करायचे आहे.

अ. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांना बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, ‘हिंदु राष्ट्राचा विचार मांडून तुम्ही धर्माचे राजकारण करू नका !’ मला सांगा, धर्माचे राजकारण करायचे नाही, तर काय अधर्माचे राजकारण करायचे ? राजकारणामध्ये धर्म होता, आहे आणि राहील. प्राचीन काळापासून राजकारणावर धर्माचे नियंत्रण होते; म्हणूनच राजकारण नियंत्रणात होते.

आ. वर्ष २०२२ मध्ये भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना १ ते ४ ऑगस्टच्या कालावधीमध्ये ‘बीबीसी’ या विदेशी प्रसारमाध्यमाने हिंदु राष्ट्राला विरोध करणारी एक ‘व्हिडिओ सिरीज’ प्रसारित केली. ‘बीबीसी’चे भारतात राहून हिंदु राष्ट्राला विरोध करण्याचे धाडस होतेच कसे ? आपण ‘बीबीसी’सारख्या भारतद्वेषी आणि हिंदुविरोधी प्रसारमाध्यमावर बंदी घालण्याची मागणी करायला हवी.

इ. काँग्रेसचे युवराज (राहुल गांधी) लंडनमध्ये जाऊन म्हणाले, ‘भारत एक राष्ट्र नाही, तर राज्यांचा संघ आहे.’ अशी वक्तव्ये विदेशी हस्तकच करू शकतात, हे लक्षात घ्या !

बंधूंनो, पृथ्वीच्या पाठीवर भारत हे एकच राष्ट्र असे आहे की, जे इतर देशांप्रमाणे क्रांती, बंड वा युद्ध यांतून निर्माण झालेले नाही, तर ऋषींच्या तपस्येतून निर्माण झाले आहे. सर्व प्रकारच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक पुराव्यांनुसार हे सिद्ध झाले आहे की, भारत हे मानवसृष्टीतील पहिले राष्ट्र आहे. वेदांमध्ये ३४ ठिकाणी राष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. जर भारत एक राष्ट्र नाही, तर भारतीय राज्यघटनेतील राष्ट्रगान (वन्दे मातरम्) आणि राष्ट्रगीत (जन गण मन), राष्ट्रध्वज, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्रतीक इत्यादी शब्दांचा प्रयोग, हे कशाचे प्रमाण आहे ? सुदैवाने या वक्तव्याला प्रचंड विरोध झाल्याने युवराजाला (राहुल गांधी यांना) सध्या भारतात पायी चालावे लागत आहे.

ई. हिंदु राष्ट्र आले, तर ‘अल्पसंख्यांकांचे काय होणार ?’, असा प्रश्न काही जण विचारतात ! घाबरण्याची आवश्यकता नाही ! सर्वांचे पूर्वज सनातनीच आहेत ! कुणावरही अन्याय होणार नाही !

उ. अनेकांचा प्रश्न असतो की, हिंदु राष्ट्र धर्माधारित असेल कि घटनात्मक असेल ? भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी धर्माधारित राज्यव्यवस्था अनुभवलेली आहे आणि आता दोन्ही देशांत घटनात्मक व्यवस्था आहे. घटनात्मक व्यवस्थेत लोकेच्छेला, म्हणजे बहुमताला प्राधान्य असते. त्यानुसार लोकांना अभिप्रेत अशी राज्यव्यवस्था बनवण्याचे प्रावधान (तरतूद) असते. भारतीय राज्यघटनेतही अनुच्छेद ‘३६८ ब’मध्ये असे प्रावधान आहे. त्यामुळे घटनात्मक प्रक्रियेद्वारे हिंदु राष्ट्र होण्याला कुणाचाही विरोध नाही. आम्ही या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातून सुतोवाच करतो की, केंद्र सरकारने घटनात्मक प्रक्रियेद्वारे भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची दृढ इच्छाशक्ती दाखवावी.

आम्हाला घटनात्मक व्यवस्थेसह सनातन धर्माधारित व्यवस्थाही हवी आहे. आम्ही कुणीही ‘सेक्युलर’ व्यवस्थेचे समर्थक नाही. आम्ही विशुद्ध सनातन धर्मावर आधारित रामराज्याच्या व्यवस्थेचे पक्षकार आहोत. आमच्या प्राचीन धर्माधारित व्यवस्थेत राजकारणामध्ये शुचिता होती; कारण ती धर्माद्वारे नियंत्रित होती. चंद्रगुप्त सम्राट होते, तर त्याला नियंत्रित करणारा राजगुरु चाणक्य होता ! राजाजवळ राजदंड होता, तर राजगुरुजवळ धर्मदंड होता ! आम्हाला लोकशाहीमध्ये धर्मनिष्ठ शासनकर्ता हवा आहे आणि त्यालाही राजकार्य करण्यासाठी धर्माेपयोगी मार्गदर्शन करणारी व्यवस्थाही हवी आहे. यासाठी वर्तमान व्यवस्थेला धर्माधारित बनवण्यासाठी आम्हाला आपले प्राचीन अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र आणि वैदिक ज्ञान यांचा सदुपयोग करून नवनिर्माण करावे लागेल. ही एक प्रकारची धर्माची संस्थापना असेल !

४. मंदिरमुक्ती अभियान

अशीच धर्मसंस्थापना ही आपल्याला मंदिरांच्या क्षेत्रातही करावी लागणार आहे. लक्षात घ्या, ‘मंदिरमुक्ती अभियान हा हिंदु राष्ट्राचा पाया आहे !’ अद्यापपर्यंत अनेक राजकीय घोषणा होऊनही हिंदूंची मंदिरे सरकारमुक्त आणि इस्लामी अतिक्रमणमुक्त झालेली नाहीत, हे विदारक वास्तव आहे. धर्मनिरपेक्ष व्यवस्था हिंदूंच्या मंदिरांचे संरक्षण करील, याची काडीमात्र शक्यता नाही. धर्मनिरपेक्ष शासनाने धर्ममय मंदिरांचे संचालन करणे, हे असंवैधानिक आहे. बंधूंनो, मंदिरे ही आमच्या हिंदु राष्ट्राचे ऊर्जास्त्रोत आहेत. त्यामुळे केवळ अयोध्येतील राममंदिरच नाही, तर काशी-मथुरा-भोजशाळा यांसारख्या सर्वच इस्लामी अतिक्रमणग्रस्त मंदिरांच्या मुक्तीसाठी हे अधिवेशन कटिबद्ध असेल. मला सांगायला आनंद वाटतो की, या वर्षी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या पुढाकारातून ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना झाली असून या महासंघाने मंदिरे सरकारमुक्त करण्याची घोषणा केली आहे. आज या निमित्ताने मी गोमंतकातील भाजप शासनाचेही अभिनंदन करतो. त्यांच्या पुढाकारातून गोव्याचे राजदैवत श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार शक्य झाला आहे. ‘आता लवकरात लवकर पोर्तुगीज आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या गोमंतकातील सर्वच मंदिरांचा जीर्णाेद्धार भाजप शासनाने करावा’, अशी आमची हार्दिक इच्छा आहे.

५. आवाहन

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणजे एक प्रकारचे लोकमंथन आहे ! ‘अध्यात्म आमचा स्वभाव असल्याने या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त आम्ही हिंदु राष्ट्रासारख्या राजकीय चर्चाही धर्माला अनुसरून करू’, अशी आशा बाळगताे. हा विचार महोत्सव हा हिंदु राष्ट्राचे कार्य करणार्‍यांना शिकण्यासाठी आहे. म्हणूनच आम्ही ‘पुछता है भारत’ म्हणण्यापेक्षा ‘सिखता है भारत !’ म्हणतो. आम्ही शक्तीला ‘लोकमंगल’ कार्याशी जोडतो. आज येथे एकत्रित आलेली ही हिंदु शक्ती ही हिंदु राष्ट्र निर्माणाच्या विश्वकल्याणकारी कार्यासाठी जोडली जाणार आहे. आपल्या सर्वांकडून हिंदु राष्ट्राचे ऐतिहासिक कार्य व्हावे, अशी प्रार्थना करतो.

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.


वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ हा शब्दप्रयोग या वर्षी कशासाठी ?’, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात असेल. आमचे झारखंड येथील मित्र आणि ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी त्यांच्या संघटनेचे ब्रीद ‘हिंदु राष्ट्र । हिंदु विश्व ।’ ठेवले आहे. या महोत्सवाचे ब्रीदही ‘हिंदु राष्ट्र से हिंदु विश्व तक’, असे आहे. याचे कारण आपल्या सनातन धर्मदर्शनात हिंदु विश्वाचा, म्हणजेच वैश्विक हिंदु राष्ट्राचा विचार आहे. सनातन धर्म सार्वभौमिक आहे, म्हणजे तो सर्व भूमींना लागू आहे आणि हीच त्याची विशेषता आहे. आपण ‘मंत्रपुष्पांजली’मध्ये म्हणत असतो –

ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्याईस्यात् सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् । पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळिती  ।।

अर्थ : सर्वसामर्थ्यवान्, चक्रवर्ती राजा असलेले आमचे हे राज्य एकछत्री, सर्व ऐश्वर्याने युक्त, मोक्षप्रद, साधनेला पोषक, सिद्धीप्राप्त, सर्वश्रेष्ठ, सर्व विश्वाचे अधिपतीत्व असलेले महान, विशाल राज्य, विश्वाच्या अंतापर्यंत, म्हणजे परार्ध (म्हणजे ब्रह्मदेवाच्या जीवनातील उर्वरित अर्धे जीवन) संपेपर्यंत चिरकाल नांदो. आमचा राजा समुद्रवलयांकित पृथ्वीचा सम्राट असो.

आमच्या सर्व शास्त्रांचा हा आदर्श आहे की, चक्रवर्ती सम्राटाने संपूर्ण पृथ्वीवर ‘धर्मा’ची स्थापना करायला हवी. तो त्याचा अधिकार आणि कर्तव्य आहे. ‘या पृथ्वीवर धर्मचक्र प्रवर्तित होत राहील, हे सुनिश्चित करणे’, हा त्याचा राजधर्म राहिलेला आहे.

असे असले, तरी धर्मशास्त्र, पुराणे, इतिहासग्रंथ यांमधून हेच प्रमाणित होते की, संपूर्ण पृथ्वीवर ‘धर्मा’ची स्थापना अत्यंत प्रतापी सम्राटच करू शकतात. त्यामुळे आधुनिक काळात भौगोलिक सीमा राष्ट्रीयता निर्धारित करत असल्या, तरीही पूर्वी या राष्ट्रीय सीमासुद्धा सम्राटाच्या पुरुषार्थानुसार कमी-जास्त होत होत्या.

‘हिमालयापासून विंध्य आणि त्याच्या दक्षिणेस कुमारी अंतरीप (कन्याकुमारी)’पर्यंत पसरलेले क्षेत्र ‘आर्यावर्त’ आहे, ज्याच्या दक्षिणेस, पूर्वेस आणि पश्चिमेस समुद्र आहे. हे ‘आर्यावर्त’च यज्ञासाठी विशेष रूपामध्ये योग्य क्षेत्र आहे. जेथे वैदिक यज्ञ होत नाहीत, त्या क्षेत्राला ‘म्लेंच्छ क्षेत्र’ म्हटले जाते. अशा प्रकारे सध्याचा भारत हा सनातन धर्माच्या साधनेचे केंद्रीय क्षेत्र आहे. शक्ती, तप आणि पुरुषार्थ यांच्या बळावर या क्षेत्राला निरंतर विकसित करणे आणि विश्वशांती प्रस्थापित करणे, हा येथील क्षत्रियांचा राजधर्म आहे. अशा प्रकारे हिंदु राष्ट्राला भौगोलिक क्षेत्रापर्यंत मर्यादित रहाण्याचे कोणतेही बंधन नाही. विश्वशांतीसाठी यज्ञ आणि युद्ध करणारे केवळ हे हिंदु राष्ट्रच आहे.

अमेरिकी वैज्ञानिक रॉबर्ट ओपनहायमर यांनी ॲटम (अणू) बाँबचा शोध लावला. या बाँबच्या हिरोशिमा-नागासकीच्या पहिल्या हिंसक प्रयोगानंतर त्यांनी वक्तव्य केले, ‘विज्ञानामुळे जगाला विध्वंस मिळतो; पण सनातन धर्मातील तत्त्वांमुळे विश्वाला शांती मिळते.’ या सनातन धर्मातील तत्त्वांमुळे निर्माण झालेल्या सभ्यतेमुळे गेल्या १० सहस्र वर्षांमध्ये या हिंदु राष्ट्रातील धर्मनिष्ठ समाजाने शस्त्र आणि शक्ती संपन्न असूनही युद्धाद्वारे कोणावरही अत्याचार केले नाहीत. या सभ्यतेमध्ये असे काही आहे, जे संपूर्ण विश्वातील मानवांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि ते वर्तमानकाळात आत्मसात् केल्याविना वैश्विक सभ्यता खर्‍या अर्थाने उन्नत होऊ शकत नाही !

हिंदु राष्ट्राच्या दृष्टीतून विश्व एक परिवार आहे; म्हणून आपण ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (वसुधा म्हणजे पृथ्वी हेच कुटुंब) म्हणतो. अमेरिकी, युरोपीय आणि चिनी देशांच्या दृष्टीतून विश्व एक बाजार आहे. ते या जगाकडे उपभोगाच्या दृष्टीतून पहातात. आम्ही ‘चराचरात ब्रह्म आहे’, हे मानत असल्याने आम्ही त्याचा उपभोग घेऊ इच्छित नसतो. म्हणूनच सनातन भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, ते विश्वकल्याणाचे कार्य करते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणूनच मी पुन्हा सांगू इच्छितो की, हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकल्पना नाही. ते आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृतीचे आणि सनातन धर्मातील विश्वदर्शनाचेच नाव आहे. त्यामुळे ‘सनातन भारत’ म्हणा, ‘हिंदु राष्ट्र’ म्हणा कि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र’ म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे.

गेले वर्षभर इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने चालू आहेत. तेथील इस्लामी शासनाने निदर्शने करणार्‍या ७०० विद्यार्थिनींवर विषप्रयोग केला आहे. तेथील विद्यार्थिनींवर रासायनिक आक्रमणे केली जात आहेत. स्वकन्यांना ठार मारणारे शासनकर्ते असलेल्या इराणी भूमीतही आज वैश्विक हिंदु राष्ट्र हवे आहे. पाकिस्तानमध्ये प्रतिदिन धर्मांतरित होणारे हिंदु परिवार आणि बलात्कारित होणार्‍या हिंदु स्त्रिया या भारतीय हिंदु राष्ट्राकडे मोठ्या अपेक्षेने पहात आहेत. दुसरीकडे आर्थिक मंदीमध्ये अडकलेला श्रीलंकेसारखा देशही आज भारताच्या वैश्विक संस्कृतीचे गुणगान गात आहे. ख्रिस्ती अमेरिका आणि रशिया या पारंपरिक शत्रूंनाही हिंदु राष्ट्राशी आर्थिक मैत्री हवी आहे. गेल्या १० वर्षांत भारतात हिंदु राष्ट्राचा विचार जसा प्रबळ होत आहे, तसाच विचार अवघ्या जगतात येत्या १० वर्षांत होईल, याची निश्चिती बाळगा ! या विचारांचे बीजच हा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आहे !

मला आठवते की, वर्ष २०१२ मध्ये ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे एकमेव व्यासपीठ हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करत होते. आज वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करणारी अनेक व्यासपिठे आहेत आणि ती सर्वच राज्यांत निर्माण झालेली आहेत. त्याचप्रमाणे वैश्विक हिंदु राष्ट्राचा विचार देणारे हे पहिले व्यासपीठ असले, तरी भविष्यात याविषयीची चर्चा जगभर चालू होईल !

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती.