अभ्यासाचे तंत्र विकसित करा !

मुलांनो, आपण पहातो की, दोन मुले सारखीच बुद्धीमान (हुशार) असली, तरीसुद्धा त्यापैकी एकाला चांगले गुण मिळतात, तर दुसर्‍याला अल्प. अभ्यासात मिळणारे यश हे बर्‍याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. आताच्या काळात अभ्यासाचे तंत्र मुले आणि पालक यांना माहिती असणे आवश्यक आहे.

१. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच अभ्यास करावा. यामुळे अभ्यास चांगला झाल्याने परीक्षेच्या वेळी ताण येत नाही आणि त्यामुळे परीक्षेची भीती वाटत नाही.

२. प्रत्येक विषयाचा अभ्यास आवडीने आणि मनापासून करावा. ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे किंवा जी कला शिकावयाची आहे, तिचे महत्त्व आणि लाभ समजून घ्यावेत. त्यानंतर अभ्यासास प्रारंभ करावा. आवडीने आणि मनापासून अभ्यास केल्यामुळे विषयाचे आकलन लवकर होते.

३. पुस्तकातील धडा अथवा एखादा विषय वाचतांना त्यातील परिच्छेदांचे दोन-तीन वेळा वाचन करावे. त्यानंतर प्रत्येक परिच्छेदाचा सारांश काढावा, म्हणजे त्या परिच्छेदातील महत्त्वाचा भाग स्वतःच्या शब्दांत लिहून काढावा. दहा ते बारा ओळींचा परिच्छेद असेल, तर तीन ते चार ओळींत त्याचे सार लिहून काढावे. लिहिलेले दीर्घकाळ स्मरणात रहाते.

४. शिक्षक शाळेत जो विषय शिकवणार असतील, त्या विषयाचे घरी आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी वाचन करावे.

५. शिक्षक शिकवत असतांनाच तो विषय पूर्ण लक्ष देऊन ऐकावा. त्यातील काही समजले नसल्यास तासिका संपल्यावर शिक्षकांना त्याविषयी विचारून घ्यावे.

६. आपण जो विषय शाळेत शिकलो, तो विषय ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेला नाही अशा विद्यार्थ्यांना स्वतः शिकवावा. आपण इतरांना शिकवतांना आपली पुन्हा एकदा उजळणी होते.

७. सकाळची वेळ शांत असते, तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोन्ही तरतरीत असतात; म्हणून या वेळी अवघड वाटणार्‍या विषयाचा अभ्यास करावा. जो विषय समजत नाही किंवा अवघड वाटतो, त्या विषयास अधिक वेळ द्यावा. तो विषय किंवा ती प्रश्नोत्तरे दोन-तीन वेळा वाचावीत. नंतर त्यावर वर्गातील बुद्धीमान विद्यार्थी आणि त्या विषयाचे शिक्षक यांच्याशी चर्चा करावी.

८. एखाद्या विषयावर साधारणपणे ४५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ मन एकाग्र करणे अवघड असते. त्यामुळे मध्ये मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. विश्रांतीच्या काळात ५ मिनिटे प्रार्थना आणि नामजप करावा.

९. अभ्यासाचा कंटाळा येऊ नये, यासाठी वाचनानंतर लेखन, लेखनानंतर वाचन किंवा पाठांतर, पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास करावा.

१०. अभ्यास चांगला होण्यासाठी चिकाटी, प्रयत्नांत सातत्य, एकाग्रता, पाठांतर इत्यादी गुण वाढवल्याने अभ्यास चांगला होण्यास साहाय्य होते.

वरील सूत्रे लवकरात लवकर आचरणात आणून उज्वल यशाकडे वाटचाल करूया !

१. अभ्यासाला बसण्याच्या ठिकाणी देवतांची चित्रे ठेवावीत

२. श्री गणपति, श्री सरस्वतीदेवी आणि कुलदेवता / उपास्यदेवता यांची चित्रे किंवा यांपैकी उपलब्ध असेल, त्या देवतेचे चित्र अभ्यासाच्या पटलावर अथवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावे. देवतेचे चित्र समोर ठेवून तिच्या चरणांकडे पहात प्रार्थना आणि नामजप केल्याने मन लवकर एकाग्र होते.

पुढील प्रार्थना करा !

१. अभ्यासाला प्रारंभ करण्यापूर्वी विद्येशी संबंधित देवता श्री गणपति आणि श्री सरस्वतीदेवी यांना प्रार्थना करावी, ‘अभ्यास चांगला होण्यासाठी मला बुद्धी द्या आणि मी करणार असलेल्या अभ्यासाचे मला नीट आकलन होऊ दे.’

२. अभ्यास करतांना मध्ये मध्ये कुलदेवतेला / उपास्यदेवतेला प्रार्थना करावी, ‘माझा अभ्यास एकाग्रतेने होऊ दे.’

३. अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी दहा मिनिटे नामजप करावा : प्रार्थनेनंतर अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी १० मिनिटे कुलदेवतेचा किंवा उपास्यदेवतेचा नामजप करावा.

(संदर्भ : सनातन-निर्मित-ग्रंथ ‘अभ्यास कसा करावा?’)