‘भारतातील प्रमुख सप्तनद्यांमध्ये (गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या सप्तनद्यांमध्ये) गंगा नदीला अग्रस्थान प्राप्त आहे. ज्याप्रमाणे श्री दुर्गादेवी शक्तीचे, श्री सरस्वतीदेवी ज्ञानाचे आणि श्री महालक्ष्मीदेवी धन अन् ऐश्वर्य यांचे प्रतीक आहेत, तसेच पावित्र्य अन् दिव्यता यांचे प्रतीक श्री गंगा नदी आहे. भगवती गंगा ठिकठिकाणच्या लोकांची तृष्णा भागवून त्यांना तृप्त करून सद्गती प्राप्त करून देते. अध्यात्मशास्त्रात जे स्थान श्रीमद्भगवद्गीतेचे आहे, ते धर्मशास्त्रात गंगा नदीचे आहे. जेष्ठ मासाच्या शुक्ल पक्षातील दशमीला गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. त्यामुळे जेष्ठ शुक्ल प्रतिपदेला ‘गंगा दशहरा’ हा महोत्सव आरंभ होऊन त्याची सांगता जेष्ठ शुक्ल दशमीला होते. या लेखात श्री गंगा नदीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये लेखबद्ध आणि काव्यबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख श्री गंगादेवीच्या चरणी सविनय अर्पण करत आहे.
१. ‘गंगा’ या शब्दाची उत्पत्ती
१ अ. सूक्ष्मातील ज्ञानावर आधारित असलेला ‘गंगा’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ : ‘गं’ हा बीजमंत्र श्री गणेशाची संबंधित असून त्याचे कार्य ‘दु:खहरण करणे’, हे आहे. गंगा नदीची उत्पत्तीच पतीत, पापी आणि दीन लोकांचे, म्हणजे तीव्र प्रारब्धाने ग्रासलेल्या लोकांचे दु:ख हरण करणे हे आहे. त्यामुळे तिच्या नावातील ‘गं’ हा बीजमंत्र असून ‘गा’ हे अक्षर ‘प्रवाहित होणे’, या अर्थाने उत्पन्न झाले आहे. त्यामुळे ‘गंगा’ या शब्दाचा अर्थ आहे, ‘जी इतरांचे दु:ख हरण करण्यासाठी प्रवाहित होते ती ‘गंगा’ आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.५.२०२३)
१ आ. सनातनचा ग्रंथ – ‘गंगामहात्म्य’ : आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह’, यामध्ये सांगितलेला ‘गंगा’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ
१ आ १. गमयति भगवत्पदम् इति गङ्गा ।
अर्थ : (गंगेमध्ये स्नान करणार्या जिवाला) भगवंताच्या चरणांपर्यंत पोहोचवते, ती ‘गंगा’.
१ आ २. गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभि: इति गङ्गा ।
अर्थ : ‘मोक्षार्थी’, म्हणजे मुमुक्षू जिच्याकडे जातात, ती गंगा होय.
२. गंगा नदीच्या विविध रूपांनुसार आणि गुणवैशिष्ट्यांनुसार असणारी विविध नावे !
गंगा नदीची विविध रूपे विख्यात आहेत. गंगा नदी ही दिव्य स्वरूपा असल्यामुळे तिच्यामध्ये अनेक दैवी गुणवैशिष्ट्ये आहेत. त्या गुणवैशिष्ट्यांनुसार तिला विविध नावे किंवा आध्यात्मिक संबोधने प्राप्त झाली आहेत.
२ अ. गंधर्वांची स्वरगंगा : गंगा नदीच्या उगमस्थानी तिच्या प्रवाहाचा नाद अतिशय मंजूळ आहे. हा नाद ऐकल्यावर असे वाटते की, सरस्वतीच्या वीणेसमान गंगा नदीच्या प्रवाहातून ‘स्वरब्रह्माची’ निर्मिती झाली आहे. त्यामुळे दैवी संगीत गाणारे आणि स्वर्गलोक तसेच गंधर्वलोक येथे निवास करणारे संगीतप्रेमी गंधर्व गंगा नदीला आदराने ‘स्वरगंगा’ असे संबोधतात.
२ आ. हिमवानची हिेमगंगा : गंगा नदीचा उगम हिमालयातील ‘गंगोत्री’ या स्थानी झाला आहे. त्यामुळे हिमवान किंवा हिमालय हे तिचे पिता आहेत. शीत ऋतुमध्ये जेव्हा हिमालयात बर्फ पडतो, तेव्हा न्यूनतम तापमानामुळे गंगा नदीचे जलही काही वेळा गोठून जाते. त्यामुळे तिला ‘हिमगंगा’ हे नाव प्राप्त झाले आहे.
२ इ. हिरण्यमय कांचनगंगा : गंगा नदी ही ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये होती, तेव्हा तिचे स्वरूप दिव्यतम आणि सुवर्णमय होते. तिची कांती सोन्याप्रमाणे तेजस्वी होती. त्यामुळे तिला ‘कांचनगंगा’ हे नाव प्राप्त झाले आहे.
गंगेची दिव्यकांती रविसमान । मंजूळ वाणी वीणेसमान ।
कोमल काया फुलासमान । सात्त्विक सौंदर्य शारदेसमान ।।
२ ई. वात्सल्यसिंधु प्रेमगंगा : गंगेच्या कृपेने अनेक पतित आणि पीडित जिवांचा उद्धार होतो. ज्याप्रमाणे माता तिच्या बाळाचे संगोपन करून त्याला वाढवते, त्याप्रमाणे गंगानदी प्रेमाच्या सहस्र धारांचा वर्षाव करून अनेक जिवांचा उद्धार करते. गंगानदीमध्ये मातेप्रमाणे वात्सल्य आणि प्रेम ओतप्रोत भरलेले आहे. त्यामुळे गंगा नदीच्या दिव्यतेला देवता ‘देवीचे’ आणि वात्सल्याला मनुष्य ‘मातेचे’ स्थान देतात. त्यामुळे तिला ‘वात्सल्यमय प्रेमगंगा’ किंवा ‘गंगामाता’ , असे संबोधले जाते.
२ उ. त्रिपथगामिनी गंगा : जेव्हा शिवाने त्याच्या जटेतून गंगेला मुक्त केले, तेव्हा तिच्या तीन धारा प्रवाहित झाल्या. एक धारा स्वर्गलोकाकडे प्रवाहित झाल्यामुळे त्या प्रवाहाला ‘मंदाकिनी’ किंवा ‘देव गंगा’ हे नाव प्राप्त झाले. दुसरा प्रवाह पृथ्वीवर प्रवाहित झाल्याने तिला ‘काशी’ किंवा ‘भागीरथी’, अशी विविध नावे प्राप्त झाली. तिचा तिसरा प्रवाह पाताळाकडे गेल्यामुळे तिला ‘पाताळगंगा’ किंवा ‘भोगावती’ हे नाव प्राप्त झाले. अशाप्रकारे गंगेचे ३ प्रवाह तीन लोकांमध्ये गेल्यामुळे तिला ‘त्रिपथगामिनी गंगा’ असेही संबोधतात.
२ ऊ. शक्तीदायिनी शक्तीगंगा : गंगा नदीमध्ये पुष्कळ प्रमाणात दैवी शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे तिचे दर्शन घेणारे, तिच्यात स्नान करणारे, तिची पूजा अन् आरती करणारे, अशा प्रत्येकाला गंगा नदीतून दैवी ऊर्जा प्राप्त होते. या ऊर्जेच्या बळावर अनेक जीव धर्माचरण आणि साधना करू शकतात. त्यामुळे तिला ‘शक्तीदायिनी शक्तीगंगा’, असे संबोधले आहे.
२ ए. मुक्तीदायिनी ज्ञानगंगा : ज्ञानाच्या प्राप्तीमुळे मनुष्य अज्ञानातून मुक्त होतो. गंगा नदी शिवाच्या जटेतून बाहेर पडल्यामुळे तिच्यामध्ये शिवगुरूंचे अनंत ज्ञान सामावले आहे. त्यामुळे गंगादेवीच्या उपासनेमुळे मनुष्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊन त्याचे सर्व प्रकारचे भ्रम आणि अज्ञान दूर होऊन त्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्ती मिळते. तसेच जिवाच्या भावानुसार त्याला सलोक (देवतेच्या लोकात रहाता येणे), समीप (देवतेच्या जवळ वास करता येणे), सरूप (देवतेप्रमाणे दिव्य रूप प्राप्त होणे) आणि सायुज्य (देवतेच्या दिव्य अशा सगुण रूपाशी एकरूप होणे) अशा चारही प्रकारच्या मुक्ती मिळतात.
२ ऐ. मोक्षदायिनी भक्तीगंगा : गंगानदी परम पावन आहे. तिच्यामध्ये शिवगुरूंचे ज्ञान आणि विष्णुगुरूंची भक्ती असे दोन्ही दिव्य घटक सामावले आहेत. तसेच तिची उत्पत्ती शिवाच्या जटेतून झाली, तर तिचा वास श्रीविष्णूच्या चरणांशी आहे. शिवाकडून ज्ञान आणि विष्णुकडून मोक्ष यांची प्राप्ती होते. त्यामुळे गंगानदीच्या भक्तीपूर्ण उपासनेमुळे ती भक्ताला श्रीमन्नारायणापर्यंत पोचवते आणि त्याला मोक्ष देते. त्यामुळे तिला ‘मोक्षदायिनी भक्तीगंगा’ असे संबोधले आहे.
२ ओ. प्राणदायिनी जीवनगंगा : गंगानदीच्या प्रवाहात अनेक जीव वास करतात. त्याचप्रमाणे गंगानदीच्या तटावर अनेक वृक्ष-लता, पशु-पक्षी आणि मनुष्य वास करतात. ज्याप्रमाणे देहामध्ये प्राणाचा संचार असल्यामुळे व्यक्ती जिवंत रहाते, त्याप्रमाणे गंगानदीच्या कृपेने अनेक जिवांना त्यांचे जीवन सुखाने जगता येते. त्यामुळे तिला ‘प्राणदायिनी जीवनगंगा’, असे संबोधले आहे.
२ औ. आनंददायिनी भावगंगा : जेव्हा मनुष्याच्या हृदयामध्ये भगवंताप्रतीच्या भावाचा उगम होतो, तेव्हा त्या भावाचे स्वरूप गंगानदीप्रमाणेच शुद्ध, सात्त्विक आणि निर्मळ असते. त्यामुळे हृदयात वहाणार्या भावगंगेमुळे जिवाला आनंद, दिव्यानंद, अत्यानंद, ब्रह्मानंद आणि परमानंद इत्यादी आनंदाच्या विविध प्रकारांची अनुभूती येते. अशी आध्यात्मिक स्तरावरील अत्युच्च अनुभूती देणार्या गंगादेवीला ‘आनंददायिनी भावगंगा’, असे संबोधले आहे.
२ अं. आकाशगंगा : आकाशामध्ये विविध ग्रह, तारे आणि नक्षत्र यांना धारण करून ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांची अखंड प्रदक्षिणा घालणार्या गंगेला ‘आकाशगंगा’, असे संबोधले आहे. आकाशगंगेचे स्वरूप अत्यंत दिव्य आणि भव्य आहे.
२ अ: अमृतगंगा : गंगादेवीच्या हातामध्ये धन्वंतरी देवतेप्रमाणे अमृत कुंभ किंवा कलश आहे. गंगादेवी समस्त जिवांना ज्ञानामृत आणि भक्ती-अमृत पाजून सर्वांना संतुष्ट करते. गंगानदीचे जल हे अमृताप्रमाणे दिव्य, निर्मळ आणि पवित्र आहे. त्यामुळे तिला ‘अमृतगंगा’ असेही संबोधले जाते.
२ क. त्रिदेवतातत्त्वधारिणी महागंगा : जेव्हा वामनावतार झाला, तेव्हा विराट रूप धारण केलेल्या श्रीवामनाच्या पायाचा धक्का ब्रह्मांडाच्या बाहेर असलेल्या पंचमहाभूतांच्या कवचातील आपतत्त्वाच्या कवचाला झाला. त्यामुळे आपतत्त्वाचे कवच भेदले जाऊन त्यातून जल वाहू लागले. या जलाची पृथ्वीवर अवतीर्ण होण्याची वेळ अजून आली नव्हती. त्यामुळे ब्रह्मदेवाने हे जल त्याच्या कमंडलुमध्ये धारण केले. त्यानंतर देवासुर संग्रामात श्रीविष्णूच्या नेतृत्वाखाली लढणार्या देवतांचा विजय झाल्यावर ब्रह्मदेवाने या कमंडलूतील जलाने श्रीहरिविष्णूची पाद्यपूजा केली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये बद्ध असलेले अंतरिक्षातील जल गंगादेवीच्या रूपाने प्रगटले. त्यामुळे गंगानदीचे एक नाव ‘अंतरिक्ष जल’ असेही आहे. त्यानंतर गंगानदी श्रीहरि विष्णूच्या चरणांशी वैकुंठात वास करू लागली. जेव्हा भगीरथाने त्याच्या शापित पूर्वजांच्या मुक्तीसाठी शिवाची आराधना केली, तेव्हा शिवाने प्रसन्न होऊन गंगेचे आवाहन केले. तेव्हा गंगेच्या पाण्याचा प्रवाह श्रीहरि विष्णूच्या चरणांपासून पृथ्वीवरील कैलासाच्या दिशेने वहात आला. तिचा वेग प्रचंड असल्यामुळे ती जर पृथ्वीवर थेट अवतरित झाली असती, तर पृथ्वी दुभंगली असती. त्यामुळे गंगेच्या वेगावर आवर घालण्यासाठी शिवाने विराट रूप धारण करून जटा मोकळ्या करून तिला जटेमध्ये धारण करून जटाबंध केला. त्यानंतर भगीरथाच्या प्रार्थनेवरून शिवाने जटा मोकळ्या करून गंगेच्या पाण्याचा प्रवाह जटेतून प्रवाहित केला. तेव्हा गंगेचे जल गंगानदीच्या रूपाने शिवाच्या जटेतून पृथ्वीवर प्रगट झाले.
अशाप्रकारे गंगानदीमध्ये ब्रह्मा, विष्णु आणि शिव या त्रिदेवांचे तत्त्व आहे. त्रिदेवांचे तत्त्व धारण करणारी ती ब्रह्मांडातील एकमेवाद्वितीय दैवी नदी असल्यामुळे तिला ‘महागंगा’ असेही म्हणतात. तिच्यातील ब्रह्मतत्त्वामुळे कार्यरत झालेल्या पापनाशिनीतत्त्वामुळे मनुष्य आणि पितर, विष्णुतत्त्वामुळे कार्यरत झालेली भक्ती आणि दिव्यता यांमुळे समस्त ३३ कोटी देवता आणि शिवतत्त्वामुळे कार्यरत झालेले तपोबळ आणि वैराग्य यांच्यामुळे ८८ सहस्र ऋषीमुनी यांचा उद्धार होतो. अशाप्रकारे ‘गंगातीर्थ’ हे ‘ब्रह्मतीर्थ, विष्णुतीर्थ आणि शिवतीर्थ’, अशा तीन तीर्थांचे एकत्रित तीर्थ असल्यामुळे ते अमृताहूनही पवित्र आहे. त्यामुळे गंगानदीच्या जलाला ‘गंगातीर्थ’, किंवा ‘देवतीर्थ’ असेही संबोधले जाते.
२ ख. गंगानदीची इतर काही नावे : अशाप्रकारे गंगानदीला अंतरिक्ष जल, ब्रह्मद्रवा, विष्णुपदी, भागिरथी ( राजा भगिरथामुळे गंगानदी वैकुंठातून पृथ्वीवर आली. त्यामुळे तिला ‘भागिरथी’, या नावाने संबोधले जाते. ), जान्हवी, त्रिपथगा, मंदाकिनी, हुगली, मुख्या, पंडिता, उत्तर वाहिनी, शिवाया, देवनदी अशा विविध नावांनी संबोधले जाते. (सनातनचा ग्रंथ – ‘गंगामहात्म्य’ : आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह’, यामध्ये गंगानदीची सविस्तर माहिती दिलेली आहे.)
३. गंगानदीच्या तीन रूपांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
४. गंगानदीची विविध गुणवैशिष्ट्ये विशद करणारे काव्य !
हे गंगादेवी, तू मुक्ती आणि मोक्षदायिनी !
गंगे, तू मोक्षदायिनी आणि पापनाशिनी ।
हे गंगे, तू त्रिपथगामिनी आणि परमकल्याणी (टीप १)।। १ ।।
हे गंगे, तू जीवनदायिनी आणि धर्मअनुगामिनी ।
हे गंगे, तू ब्रह्मनंदिनी आणि मुक्तीदायिनी ।। २ ।।
हे गंगे, तू पीडानाशिनी आणि दु:खभंजिनी ।
हे गंगे, तू सुखदायिनी आणि समृद्धीदायिनी ।। ३ ।।
हे गंगे, तू जन्हु नंदिनी (टीप २)आणि चैतन्यदायिनी ।
हे गंगे, तू तपस्वी योगिनी आणि मनमोहिनी ।। ४ ।।
हे गंगे, तू हिमवान नंदिनी आणि भगिरथ अनुगामिनी ।
हे गंगे, तू जगत उद्धारिणी आणि पतित पावन पापमोचनी ।। ५ ।।
हे गंगे, तू स्वर्गगामिनी मंदाकिनी ।
हे गंगे, भागिरथी वसुंधरागामिनी ।। ६ ।।
हे गंगे, तू समस्त उद्धारिणी आणि श्वेतवर्णी ।
हे गंगे, तू शीतलतादायिनी आणि गुणवर्धिनी ।। ७ ।।
हे गंगे, तू तेजोवर्धिनी आणि दिव्यत्व दायिनी ।
हे गंगे, तू ज्ञान, भक्ती आणि पुण्य प्रदायिनी ।। ८ ।।
हे गंगे, तू ब्रह्मलोकवासिनी आणि वैकुंठगामिनी ।
हे गंगे, तू कैलासगामिनी आणि शुभफलदायिनी ।। ९ ।।
हे गंगे, तू लघुरूप धारिणी गंगोत्रीच्या उगमस्थानी ।
हे गंगे, तू गंगासागर येथे विशालरूप धारिणी ।। १० ।।
हे गंगे, तू दैत्य संहारिणी आणि भक्तांची तारिणी ।
हे गंगे, तू अमृतकुंभ धारिणी आणि तेजोवर्धिनी ।। ११ ।।
हे गंगे तू भक्तीदायिनी, हे गंगे तू मुक्तीदायिनी ।
हे गंगे तू शक्तीदायिनी, हे गंगे तू कीर्तीदायिनी ।। १२ ।।
हे गंगे, तू पुण्यवर्धिनी आणि पाप विनाशिनी ।
हे गंगामाते तुला वंदन करते माझे दोन्ही कर जोडूनी ।। १३ ।।
टीप १ – परम कल्याणी : जी सर्वांचे परमकल्याण करणारी असते, तिला ‘परम कल्याणी’ असे म्हणतात.
टीप २ – जन्हु नंदिनी : राजा भगिरथाचे अनुगमन करत जेव्हा गंगानदी वाहू लागली, तेव्हा वाटेमध्ये ‘जन्हु’ ऋषींचा आश्रम लागतो. त्यांचे दर्शन घेण्यासाठी राजा भगिरथ तेथे काही वेळ थांबतो; परंतु गंगानदीला तिच्या प्रवाहाचा वेग थांबवता येत नाही. त्यामुळे तिच्या प्रवाहाने जन्हु ऋषींचे यज्ञकुंड आणि यज्ञशाला वाहून जातात. त्यामुळे जन्हु ऋषि क्रोधित होऊन गंगानदीला पिऊन टाकतात. त्यानंतर गंगानदीने त्यांची क्षमायाचना केल्यावर जन्हु ऋषि त्यांच्या कानातून गंगानदीचा प्रवाह प्रगट करतात आणि गंगानदी पुन्हा धरणीवर वाहू लागते. त्यामुळे एकप्रकारे गंगानदी ही जन्हु ऋषींची कन्या झाल्यामुळे तिला ‘जन्हु नंदिनी’ किंवा ‘जान्हवी’ या नावाने संबोधले जाते.
श्रीगंगामातेच्या चरणी प्रार्थना आणि कृतज्ञता !
‘हे गंगादेवी, तू आमच्यावर कृपावंत होऊन आमचा उद्धार कर. हे माते, तुझ्या कृपेने वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत आणि तुझा महिमा गाण्यासाठी माझ्याकडे बुद्धीही नाही. हे गंगामाते, मी तुला संपूर्ण शरण आले आहे. तुझ्या असीम कृपेसाठी मी तुझी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |