प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ‘एन्.सी.आय.’चे लोकार्पण !
नागपूर, २८ एप्रिल (वार्ता.) – नागपूर येथे उभ्या राहिलेल्या ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीने ग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्था विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्य भारतातील राज्यांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे. राज्यातही उत्तम आरोग्ययंत्रणा उभारण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
समृद्धी महामार्गाच्या ‘झिरो माईल’ शेजारी जामठा परिसरात स्थित राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट) सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते २७ एप्रिल या दिवशी लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय कर्करोग संस्था (एन्.सी.आय.) ही कर्करोगावर उपचार करणारी मध्य भारतातील सर्वांत मोठी संस्था ठरली आहे. या संस्थेचा लाभ हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या राज्यातील कर्करुग्णांना विशेषत्वाने होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एन्.सी.आय. या संस्थेला सेवाव्रती कार्यासाठी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून ही संस्था निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले.
‘राज्यासमोर आरोग्य सेवा हे मोठे आव्हान आहे. नुकताच कोरोना संकटाचा अनुभव आपण घेतला असून हवामान पालट आणि उष्माघात या प्रमाणेच कर्करोग हीसुद्धा मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे. श्री. फडणवीस यांचे वडील, त्यांचे सहकारी श्री. शैलेश जोगळेकर यांच्या पत्नी आणि माझी आई यांचा मृत्यू कर्करोगानेच झाल्याचा उल्लेख करून या वेदनादायी आठवणी मागे ठेवत सार्वजनिक हितासाठी लोकप्रतिनिधींनी असे कार्य करायचे असते आणि हाच मार्ग आम्ही अवलंबला आहे’, असेही ते म्हणाले.
देशाला कर्करोगमुक्त करण्यासाठी एन्.सी.आय. उपयुक्त ठरेल ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
कर्करोगावरील उपचारासाठी आता विदर्भातील रुग्णांना मुंबई आणि अन्य ठिकाणी न जाता
‘एन्.सी.आय.’मध्ये येथेच अत्याधुनिक उपचार घेता येणार आहेत. अमेरिकेत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ३३
टक्क्यांनी घट झाली आहे; मात्र भारतात अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. ‘एन्.सी.आय.’सारख्या संस्था देशात
उभ्या राहिल्यास कर्करोगाच्या रुग्णांची संख्या अल्प होईल आणि देश या आजारापासून मुक्त होईल.
कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारपद्धत आणि संशोधन केंद्र उभारणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
विदर्भातील कर्करोगाच्या रुग्णांना मुंबईसह देशाच्या अन्य भागात उपचारासाठी जावे लागत असे. यावर कायम तोडगा काढण्यासाठी ३० वर्षांपासून पाहिलेले स्वप्न ‘एन्.सी.आय.’च्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या संस्थेच्या माध्यमातून विदर्भ, महाराष्ट्रासह मध्य भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना स्वस्तात उत्तम उपचार उपलब्ध होणार आहेत. हे कार्य पुढे घेऊन जात रुग्णांच्या नातेवाइकांच्या नि:शुल्क निवासासाठी येथे धर्मशाळा उभारण्यात येणार आहे. पूर्व विदर्भात थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून या आजारावर संशोधन अन् उपचार करण्यासाठी येत्या काळात ‘एन्.सी.आय.’मध्ये संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.
एन्.सी.आय. ही कर्करोग उपचारासाठी एक उत्तम संस्था ! – प.पू. डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक
एन्.सी.आय. ही संस्था कर्करोगग्रस्तांना हिंमत देणारी आणि त्यांच्या उपचारासाठी एक उत्तम संस्था ठरली आहे. डॉ. आबाजी थत्ते यांच्या नावाशी आणि लोकोत्तर कार्याशी जोडलेली ही संस्था कर्करोगग्रस्तांना दिलासा देणार आहे. सरकार एकीकडे संस्था उभारतेच; मात्र आरोग्यासारख्या सार्वजनिक विषयावर देशातील जनतेनेही स्वतःही पुढे येणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेसाठी ‘एन.सी.आय.’प्रमाणे संस्था उभारण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घ्यावा.
संस्थेच्या मुख्य इमारतीमध्ये दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह व्यापार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज गौतम अदानी, दिलीप सिंघवी, समीर मेहता, पार्थ जिंदाल, जयप्रकाश रेड्डी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाल कर्करुग्णांच्या कक्षाला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
राष्ट्रीय कर्करोग संस्थेचा एकूण २५ एकरचा परिसर असून ४७० खाटांची व्यवस्था !
राष्ट्रीय कर्करोग संस्थेचा एकूण परिसर २५ एकरचा असून ४७० खाटांची व्यवस्था आहे. सध्या या ठिकाणी कर्करोगावर उपचार चालू आहेत. १८ ऑगस्ट २०१२ या दिवशी या संस्थेच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. २८ फेब्रुवारी २०१५ या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमीपूजन करण्यात आले. वर्ष २०१७ मध्ये पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ‘पद्मविभूषण’ पुरस्कारप्राप्त उद्योजक रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आले. वर्ष २०१८ मध्ये बालकांसाठी २७ खाटांचा स्वतंत्र वॉर्ड चालू करण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये ‘विप्रो’ कंपनीचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी या संस्थेची पहाणी करून कौतुक केले. वर्ष २०२० मध्ये ‘आयुषमती’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन कर्करोगाविषयीची महिलांच्या मनातील भीती दूर व्हावी. यासाठी करण्यात आले होते. आता या संपूर्ण सोयीसुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संदेश !
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांच्या लिखित संदेशाचे वाचन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केले. आपल्या संदेशात शाह म्हणाले, ‘‘कर्करोगापासून मुक्तीसाठी पहिले पाऊल’ हे ‘एन्.सी.आय.’चे बोधवाक्य आहे. याच वाक्याची प्रचीती या संस्थेत उपचार घेणार्या रुग्णांना येते. ‘एन्.सी.आय.’च्या प्रेरणेतून देशात सेवेच्या संकल्पकार्यास वाहिलेल्या संस्थांना बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था यांच्या सहयोगाने २ दशकांपासूनचे या संस्थेच्या निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे.’’