देवतेच्या मंदिराच्या कळसाकडे ब्रह्मांडातील संबंधित देवतेच्या सूक्ष्म लोकातून प्रक्षेपित होणार्या देवतेच्या सूक्ष्मतम तत्त्वलहरी आकृष्ट होतात आणि त्या मंदिराच्या गाभार्यात प्रवाहित होऊन देवतेच्या मूर्तीमध्ये आकृष्ट होऊन त्यात घनीभूत होतात. त्यानंतर देवतेच्या गर्भागारातून प्रक्षेपित होणार्या देवतेच्या सूक्ष्म स्तरावरील तत्त्वलहरी मंदिराच्या कळसाच्या माध्यमातून सभोवतालच्या वायुमंडलात प्रक्षेपित होतात.
१. मंदिराच्या वरील कळसाच्या जवळ लावलेल्या धर्मध्वजाचे महत्त्व
मंदिराच्या कळसाच्या जवळ लावलेल्या धर्मध्वजाचे (ॐ चिन्ह असलेल्या भगव्या रंगाच्या ध्वजाचे) कार्य हे प्रामुख्याने तेजतत्त्वाच्या स्तरावर असते. त्यामुळे धर्मध्वजाच्या भगव्या रंगातून धर्मशक्ती आणि त्यावरील ॐ चिन्हातून धर्मशक्ती अन् ज्ञानशक्ती यांचा मिलाप झालेली दिव्य शक्ती वातावरणात प्रक्षेपित होत असते. धर्मध्वजामध्ये कळसातून प्रक्षेपित होणार्या सूक्ष्मतर स्तरावरील देवतेच्या तत्त्वलहरी आकृष्ट होत असतात आणि त्या धर्मध्वजाच्या टोकातून तेजतत्त्वाच्या स्तरावर सूक्ष्म स्तरावर वातावरणात प्रक्षेपित होतात. जर मंदिरावरील धर्मध्वज कळसाच्या जवळ असेल, तर त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात देवतेच्या सगुण तत्त्वलहरी कार्यरत होतात. जर धर्मध्वज कळसापासून दूर असेल, तर कळसातून प्रक्षेपित झालेल्या देवतेच्या निर्गुण-सगुण स्तरावरील तत्त्वलहरी धर्मध्वजाकडे अल्प प्रमाणात आकृष्ट होतात आणि बहुतांश लहरी थेट वायुमंडलात विलीन होतात. त्यामुळे देवळाच्या कळसापासून धर्मध्वज नेमका किती अंतरावर असायला हवा ?, याचे अध्यात्मशास्त्र येथे दिले आहे.
२. धर्मध्वजापर्यंतच्या मंदिराच्या कळसापासून अंतरानुसार कार्यरत झालेले तत्त्व आणि त्याचा सूक्ष्मातून होणारा परिणाम
३. देवतांच्या प्रकारानुसार त्यांच्या मंदिराच्या कळसापासून धर्मध्वजापर्यंत योग्य अंतर असण्याचे महत्त्व
३ अ. एखादे धर्मकार्य जर विशिष्ट स्थानापुरते मर्यादित असेल, तर त्या क्षेत्रातील कनिष्ठ देवतांच्या मंदिरावरील धर्मध्वज मंदिराच्या कळसापासून १० ते १२ इंच इतक्या अंतरावर असणे लाभदायक ! : कनिष्ठ देवतांच्या मंदिरावरील धर्मध्वज मंदिराच्या कळसापासून १० ते १२ इंच इतक्या अंतरावर असल्यास त्यामध्ये कनिष्ठ देवतेच्या इच्छाशक्तीशी संबंधित असणार्या पृथ्वी आणि आप या स्तरांवरील तत्त्वलहरी अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन त्या धर्मध्वजाच्या माध्यमातून वायुमंडलात प्रक्षेपित होतात. इच्छाशक्तीमुळे विशिष्ट प्रकारचे कार्य विशिष्ट ठिकाणी करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे एखादे धर्मकार्य जर विशिष्ट स्थानापुरते मर्यादित असेल, तर त्या क्षेत्रातील कनिष्ठ देवतेच्या मंदिरावरील धर्मध्वज मंदिराच्या कळसापासून १० ते १२ इंच इतक्या अंतरावर असल्यास त्याचा समष्टीला अधिक प्रमाणात लाभ होतो.
३ आ. हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत मंदिरावरील कळसाचे टोक आणि त्यावर असलेल्या ध्वजाची खालची कड यांतील अंतर १३ ते १४ इंच इतके असणे लाभदायक : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना धर्मकार्य करण्यासाठी विविध देवतांच्या सगुण-निर्गुण स्तरावरील धर्मशक्तीची आवश्यकता आहे. ही धर्मशक्ती तेज, वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावर अनुक्रमे इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तिन्ही शक्तींच्या बळावर समष्टीमध्ये केवळ स्थानापुरते मर्यादित न रहाता काळाच्या स्तरावर कार्यरत होते. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी उच्च देवतांच्या मंदिरावरील धर्मध्वज मंदिराच्या कळसापासून १३ ते १४ इंच इतक्या अंतरावर असल्यास त्याचा समष्टीला सर्वाधिक लाभ होतो.
३ इ. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मंदिरावरील कळसाचे टोक आणि त्यावर असलेल्या ध्वजाची खालची कड यांतील अंतर सर्वाधिक, म्हणजे १५ इंच असणे लाभदायक : हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर साधकांची साधना प्रामुख्याने ईश्वरप्राप्ती करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे त्यांना उच्च देवतांच्या निर्गुण-सगुण स्तरावरील वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावर कार्यरत झालेल्या ज्ञानशक्तीची आवश्यकता असते. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर देवतांच्या मंदिरावरील धर्मध्वज मंदिराच्या कळसापासून १५ इंच इतक्या अंतरावर असल्यास त्याचा समष्टीला सर्वाधिक प्रमाणात लाभ होईल.
यावरून आपल्या लक्षात येते की, सध्याच्या काळाला, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत उच्च देवतांच्या मंदिरावरील कळसाचे टोक आणि त्यावर असलेल्या ध्वजाची खालची कड यांत मंदिराच्या उंचीप्रमाणे १३ इंच इतके अंतर असेल, तर ते सर्वांत लाभदायक आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२२)
|