नवी मुंबईत विविध ठिकाणी भव्य नववर्ष स्वागतयात्रा पार पडल्या !

 

वाशी येथील शोभायात्रेत स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळा आणि त्यांच्या वरील विविध ग्रंथांचे पूजन करून पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात आली
मिरवणुकीत उपस्थित धर्माभिमानी

नवी मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – गुढीपाडव्यानिमित्त सीबीडी, नेरूळ, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, ऐरोली आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

सानपाडा येथे अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मावळे, वासुदेव यांची वेशभूषा परिधान केलेले लहान मुले आणि अन्य.

श्री स्वामी नारायण गुरुकुल राजकोट संस्थान वाशी शाखेच्या वतीने व्यसनमुक्ती विषयावर चित्ररथ आणि फेरी काढण्यात आली
सानपाडा येथे अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या छायाचित्राचे पूजन करून पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात आली
शोभायात्रेत वासुदेव आणि पिंगळा

वाशी येथे ‘हिंदु नववर्ष स्वागतयात्रा समिती’च्या वतीने काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेमध्ये ढोल-ताशा, महिलांचे लेझिम पथक, तरुणांचे ध्वज पथक, श्रीमंत गावदेवी मरीआई मंदिर ट्रस्टचे मंगळागौरी पथक, याचसमवेत वारकरी संप्रदाय, स्वामी नारायण संस्था, बालाजी मंदिर यांची भजनी मंडळे, ‘चेंदा मेलन’ संस्था आणि दशावतारी सहभागी झाले होते. महिला पारंपरिक वेशभूषेत दुचाकीवरून या फेरीत सहभागी झाल्या होत्या. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आणि त्यांच्यावरील विविध ग्रंथांचे पूजन करून त्यांची पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात आली होती. ‘सेक्टर १४’ मध्ये स्वामीनारायण मंदिर येथून ही शोभायात्रा काढण्यात आली होती.
सानपाडा येथे ‘अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान’ यांच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ट्रेलरवर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य होर्डिंग, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मावळे, वासुदेव आणि अन्य ऐतिहासिक शूरवीरांची वेशभूषा केलेली लहान मुले होती. तुतारी, स्थानिक ग्रामस्थांचे ब्रांझ पथक या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. तसेच ढोल-ताशा, महिलांचे लेझिम पथक यांचा सहभाग होता. अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या छायाचित्राचे पूजन करून पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात आली होती. या स्वागतयात्रेचा प्रारंभ हुतात्मा बाबू गेनू मैदान येथून करण्यात आला.

सीबीडी येथे ‘सकल हिंदु समाज’ यांच्या वतीने कालीमाता मंदिर ते अलबेला हनुमान मंदिरपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. तसेच अन्य सामाजिक आणि धार्मिक संस्था यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुढ्या उभारून एकमेकांना शुभेच्छा देत नववर्षाचे स्वागत केले.