लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आदींच्या १५ ठिकाणांवर ‘ईडी’च्या धाडी

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि पत्नी राबडीदेवी

नवी देहली – राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, माजी आमदार अबू दोजाना, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या देहली, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतील १५ ठिकाणांवर अंमलबजावणी संचलनालयाने (‘ईडी’ने) धाडी घातल्या.

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना त्यांनी भूमीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात या धाडी घालण्यात आल्या. याआधी सीबीआयने राबडीदेवी यांची या प्रकरणी चौकशी केली होती. या धाडीविषयी पक्षाचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी सांगितले की, भाजपचा लोकशाहीवर विश्‍वास उरलेला नाही यामुळेच आम्हाला त्रास दिला जातो आहे. लोकांना हे सगळे कळत आहे.