स्‍त्रियांना ‘विधवा’ म्‍हणण्‍याऐवजी ‘पूर्णांगी’ म्‍हणा ! – रूपाली चाकणकर, अध्‍यक्षा, राज्‍य महिला आयोग

‘दिशा सोशल फाऊंडेशन’च्‍या वतीने ‘जागतिक महिला दिना’ ’चे औचित्‍य साधून विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्‍कार

पुणे – पतीचे निधन झाल्‍यानंतर संबंधित स्‍त्रीला ‘विधवा’ हा शब्‍द वापरणे अपमानास्‍पद आहे, असे सांगत ‘पूर्णांगी’ हाच शब्‍द महिलांचा खर्‍या अर्थाने सन्‍मान करणारा आहे. यापुढे ‘विधवा’ हा शब्‍द काढून त्‍याऐवजी ‘पूर्णांगी’ हा शब्‍द कायमस्‍वरूपी वापरण्‍यात यावा, अशी विनंती राज्‍य महिला आयोगाकडून सरकारकडे करण्‍यात येणार आहे, अशी माहिती राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. ‘दिशा सोशल फाऊंडेशन’च्‍या वतीने ‘जागतिक महिला दिना’चे औचित्‍य साधून ‘चारचौघी’ या नाटकातील कलावंत, लेखक, दिग्‍दर्शक यांच्‍याशी गप्‍पांचा कार्यक्रम, तसेच विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्‍कार चिंचवड येथे आयोजित करण्‍यात आला होता. वेळी उपस्‍थितांशी संवाद साधतांना त्‍या बोलत होत्‍या.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मशास्‍त्रात ‘विधवा’ आणि ‘विधुर’ असे म्‍हटले जाते. विधवा’चा अर्थ रिकामे होणे किंवा निरश्रित असा आहे. ‘विधुर’ या शब्‍दाचा अर्थ ‘अपूर्ण’ असा होतो. ‘पती-पत्नी मिळून परिपूर्णता येते’, असे हिंदु धर्म सांगतो. धर्मातील ही संकल्‍पना समजून घेणे आवश्‍यक आहे. विधवांना ‘पूर्णांगी’ म्‍हणून त्‍यांच्‍या समस्‍या सुटणार आहेत का ? त्‍या सुटण्‍यासाठी महिला आयोगाने प्रयत्न करावेत !

जिजामाता, राणी लक्ष्मीबाई किंवा अहिल्‍याबाई होळकर या स्‍त्रिया विधवा झाल्‍या; परंतु त्‍यांचे साहसी व्‍यक्‍तीमत्त्व झाकोळले गेले नाही. विधवा झाल्‍याने या स्‍त्रियांच्‍या क्षमतेवर परिणाम झाला नाही !

राज्‍यघटनेने धर्मस्‍वातंत्र्य दिले आहे. विधवा झाली; म्‍हणून एखाद्या स्‍त्रीवर अत्‍याचार होत असल्‍यास तिने त्‍याविषयी अवश्‍य आवाज उठवावा; मात्र कुणा विधवा स्‍त्रीला हिंदु धर्माप्रमामणे विधवा धर्माचे पालन करायचे असेल, तर त्‍यावर कुणी का आक्षेप घ्‍यावा ?