विवाहाचे महत्त्व आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’पासून मुक्तीची आवश्यकता !

सध्या विवाहरहित सहजीवन किंवा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांवर अनेकविध चर्चा चालू आहेत. खरेतर हिंदु जीवनरचनेमध्ये विवाहसंस्कार असून ती वैदिक काळापेक्षाही प्राचीन आहे, तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये कोणतेही बंधन नसल्याने ते स्वच्छंदी आहे. विवाह आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांमधील भेद अन् विवाह संस्काराचे प्राचीन संदर्भ यांचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

१. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे सहजीवनाच्या अंधार्‍या गुहेत प्रवेश !

‘सध्या विवाह आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. ही चर्चा विवाहावर थोडी आणि सहजीवनावर अधिक होत आहे. खरेतर विवाहात सहजीवन असते, तर विवाहरहित सहजीवन किंवा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ अपूर्ण आहे. या सहजीवनात कोणतेही बंधन नसल्याने ते स्वच्छंदी आहे. हा सामान्य आकर्षणाचा एक कटू परिणाम आहे. रूप हे आकर्षणाचा आधार आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये काही आश्वासने आणि वास्तवापासून लांब कल्पना आहेत. तेथे ना वाजंत्री ना वरात, ना आई-वडिलांचे आशीर्वाद, ना ज्येष्ठांच्या शुभेच्छा, ना सामाजिक समर्थन, ना मंगलगीते, ना उपहार (भेटवस्तू), केवळ दोघांचा संवाद आणि सहजीवनाच्या अंधार्‍या गुहेत प्रवेश.

अनेक अभिनेत्रींनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये फसून आत्महत्या केल्या. सध्या श्रद्धा वालकर हत्याकांड चर्चेत आहे. गुन्हेगार आणि गुन्हा यांचीच चर्चा अधिक होते; पण मूळ समस्येकडे कुणीच लक्ष देत नाही अन् पोलीस आता कापलेले अवयव शोधत आहेत. आता अशा घटना सामान्य झाल्या आहेत; परंतु अद्यापही सहजीवनाची मूलभूत कारणे आणि परिणाम यांवरील चर्चा होत नाही. विवाहाच्या भारतीय परंपरेचा उल्लेखही केला जात नाही. तथाकथित प्रगतीशील तत्त्वांकडून प्राचीन परंपरांवर टीका केली जाते. खरेतर निश्चितपणे प्राचीनतेवर विचार आणि पुनर्विचार चालू राहिला पाहिजे; परंतु जुने अन् नवीन यांच्या आवश्यकतांची समीक्षाही होणे आवश्यक आहे. ‘लिव्ह इन रिलेशन’चे परिणाम भयावह आहेत. अशी रक्तरंजित जीवघेण्या आधुनिकीकरणापासून लवकर मुक्ती मिळवणे आवश्यक आहे.

२. पितृऋणातून मुक्त होण्यासाठी विवाह आणि मूल आवश्यक !

श्री. हृदयनारायण दीक्षित

हिंदु जीवनरचनेमध्ये विवाह हा संस्कार आहे. भारताची विवाह संस्था वैदिक काळाहूनही प्राचीन आहे. विवाहाविना व्यक्ती अपूर्ण आहे. विवाहामुळेच व्यक्ती पती, तसेच पिता होतो. स्त्री ही विवाहामुळेच आई बनते. आई-वडील होण्यासाठी मूल आवश्यक आहे. आई-वडिलांना भारतीय जनमानसात श्रद्धेचे स्थान आहे. ते ‘तैत्तिरीय उपनिषदा’मध्ये ‘मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’ (आई-वडिलांना देव मानावे.), असे म्हटले आहे. भारताच्या म्हणजेच भारतियांच्या मनात आई-वडिलांचे श्रेष्ठत्व अतिशय खोलवर रुजलेले आहे. पृथ्वी सर्वांना धारण करते आणि आकाश सर्वाधिक उंच असून ते शब्द गुण धारण करणारे आहे. त्यामुळे पृथ्वी आई आणि आकाश वडील आहे. तैत्तिरीय उपनिषदानुसार मनुष्य हा देव, ऋषि आणि पितृ असे ३ ऋण घेऊन जन्माला येतो. पितृऋणातून उतराई होण्यासाठी विवाह आणि मूल आवश्यक आहे. वैदिक समाजात अविवाहिताला यज्ञाचा अधिकारी समजण्यात आले नाही.

३. विवाह हे देव, ऋषि आणि ज्येष्ठ परिजन यांचे आशीर्वाद मिळण्याचे माध्यम !

काही डावे विचारसरणीचे लोक वैदिक समाजाला स्वैराचारी असल्याचे सांगतात. त्यांना ऋग्वेदात विवाह संस्काराची गहन उपस्थिती दिसत नाही. सहस्रो वर्षे प्राचीन ऋग्वेदात विवाहाचे सुंदर वर्णन आहे. येथे सूर्याची पुत्री ‘सूर्या’ हिच्या विवाहावर सूक्त आहे. वैदिक ऋषींचे कथन आणि चित्रण यांची स्वत:ची शैली आहे. ऋषींच्या काव्य सृजनामध्ये सूर्या ही सूर्यदेवाची मुलगी आहे. आधुनिक काळात विवाहाच्या वेळी नवर्‍या मुलीच्या मैत्रिणी तिच्यासमवेत असतात. ऋग्वेदानुसार सूर्याच्या विवाहात ऋचा (काव्य) मैत्रिणी होत्या. गीतगाथा तिचे सुंदर वस्त्र होते. तसेही विवाह शुभ कार्य आहे. ऋषींचे वर्णन आल्हाददायक आहे.

सूर्याच्या विवाहाची गाथा वाचतांना रोमांचकारी वाटते. कदाचित् आपणही त्या विवाहाच्या निमंत्रणाला असावे, असे वाटते. ऋषि म्हणतात, ‘‘रथ हे तिचे मन होते आणि आकाश त्या रथाचे चक्र होते.’’ मनाचे रथ होणे म्हणजे मनोरथ. विवाहापूर्वी मुलगी पितृकुळात रहाते आणि विवाहानंतर पतीकुळाची होऊन जाते. ऋषि म्हणतात, ‘‘हे पुत्री, विवाह तुला पितृकुळातून मुक्त करतो आणि पतीकुळाला जोडतो. इंद्र मोठी देवता आहे. ‘ही पुत्री सौभाग्यवती आणि पुत्रवती व्हावी’, अशी त्यांना प्रार्थना.’’ वैदिक काळापासून विवाहामध्ये ज्येष्ठांसमवेत चर्चा करण्याचीही परंपरा होती.

विवाहाप्रसंगी इंद्रासह सर्व देवतांकडे आशीर्वाद मागितले जातात. हिंदु परंपरेत विवाह महत्त्वपूर्ण संस्कार आहे. ऋग्वेदाच्या एका मंत्रात अग्नीला ‘तुम्ही ३३ प्रमुख देवतांना त्यांच्या पत्नींसमवेत यज्ञाला आणावे’, असे म्हटले आहे. येथे प्रमुख ३३ देव विवाहित आहेत. शुभकार्यात ते पत्नींसमवेत येतात. आधुनिक काळातील विवाहातही प्राचीन विवाहाचे अनेक पुरावे पहाता येतात. विवाहाच्या मंडपात दोन्ही बाजूंचे विद्वान पुरोहित बसतात. पुरोहित ऋषि परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. विवाहामध्ये वधूवर अग्नीचे ७ फेरे घेतात. अग्नी ही वैदिक देवता आहे. ती विवाहाची प्रभावी साक्षी आहे. याला ‘देवसाक्ष’ म्हणता येईल. दोन्ही बाजूंनी आमंत्रित अतिथीही विवाहात सहभागी होतात आणि दोघांनाही आशीर्वाद देतात. विवाहाच्या या संस्कारामध्ये गीत, संगीत आदी लोकसाक्ष आहेत.

४. भारतीय विवाह परंपरेत ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची अनुभूती

प्रामुख्याने देव, ऋषि आणि लोक असे विवाहाचे प्रमुख ३ साक्ष बघायला मिळतात. इस्लामी परंपरेत विवाह एक अनुबंध (करार) आहे. भारतीय परंपरेत समाजाच्या सामूहिक उपस्थितीचा संस्कार आहे. विवाह पवित्र बंधन आहे. विवाह समाज संघटनाचा आधार आहे. विवाहामुळे कुटुंबसंस्था निर्माण होते. कुटुंबांच्या योगाने समाज बनतो. कुटुंब ही प्रेमपूर्ण संस्था आहे. त्यामुळे भारतीय चिंतनामध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) ही अनुभूती आहे. भारतीय विवाहाचे कार्य लक्ष देण्यासारखे आहे. या प्रसंगाविषयी ऋग्वेदात मुलीला म्हणतात, ‘‘मी सौभाग्य वृद्धीसाठी तुझा हात हातात घेत आहे.’’ त्यामुळे विवाहाला ‘पाणिग्रहण संस्कार’ असेही म्हणतात. याप्रसंगी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ‘हिचे पती दीर्घायु होवोत, ते १०० वर्षे जिवंत राहो, तसेच या दांपत्याला शत्रू आणि आजार यांनी पीडित करू नये’, असा आशीर्वाद देव अन् शक्ती देतात.

ऋग्वेदाच्या याच सूक्ताच्या सुंदर मंत्रामध्ये म्हटले आहे, ‘‘हे मुली, तू सासू, सासरे, नणंद आणि दीर यांची सम्राज्ञी हो.’’ हा मंत्र तत्कालीन समाजात स्त्रियांच्या स्थितीचा संकेत आहे. येथे मुलगी शासनकर्ता होण्यासाठी आशीर्वाद आहे. ‘वैदिक काळाला मागास आणि स्त्रीची कमकुवत स्थिती असणारा’, असे सांगणार्‍या विद्वानांसाठी हे सूक्त वाचनीय आहे. येथे नववधू सेविका नाही, तर सम्राज्ञी आहे.

५. जगातील समाजशास्त्रज्ञांना भुरळ पाडणारी भारतीय विवाह पद्धत !

विवाहात ‘सप्तपदी’ हा विधी भावप्रवण आहे. वर मुलीला म्हणतो, ‘मी तुझ्या सुख-दु:खात बरोबरीचा वाटेकरी राहीन. मी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करीन. केवळ एक जन्मच नाही, तर ७ जन्मांपर्यंत तुझ्या समवेत राहून सुख-दु:खात सहभागी रहाण्याचा माझा संकल्प आहे.’ ७ ही संख्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रकाशाच्या किरणांमध्ये ७ रंग, संगीतात ७ सूर, आठवड्यात ७ दिवस, आकाशातही सप्तर्षी दिसत असतात. वैदिक आर्यांचे प्रिय स्थान सप्त सिंधु आहे. ७ नद्यांचे क्षेत्र आहे. तसे वर मुलीचा (वधूचा) योग दोन असतो; परंतु दार्शनिक स्तरावर दोन्ही मिळून एक होऊन जातात. दोघांचेही मन अग्नीदेव मिळवतात. ऋग्वेदामध्ये पती-पत्नीसाठी ‘दांपत्य’ हा योग्य शब्द आहे. स्त्री-पुरुष यांना एकाच वेळी व्यक्त करण्यासाठी ‘दांपत्य’सारखा शब्द अन्य भाषांमध्ये नाही. ऋग्वेदाच्या म्हणण्यानुसार आधी पृथ्वी आणि आकाश हेही मिळालेले होते. तेव्हा दोघांचेही योग्य नाव ‘रोदसी’ होते. म्हणतात की, मरुदगणांनी (एक देवगण) दोघांनाही वेगवेगळे केले. वैदिक विवाह परंपरेत वर आणि मुलगी असे दोघे असतांनाही ते एक आहेत. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या सहजीवनात अशी मान्यता आणि संस्कार नाही. जगातील समाजशास्त्रज्ञ भारतीय विवाह पद्धतीमधील स्थैर्य पाहून आश्चर्यचकित होतात. काहीतरी आहे की, जे भारतीय विवाहांना कायम बनवतात आणि त्याचे मूळ हिंदुत्वाचे संस्कार आहे.’

– श्री. हृदयनारायण दीक्षित, लेखक आणि विधानसभा माजी अध्यक्ष, उत्तरप्रदेश (८.१२.२०२३)

(साभार : ‘भारत समाचार’चे संकेतस्थळ)