रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघातानंतर मृत्यू

  • सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद

  • रिफायनरी समर्थकावर घातपाताचा आरोप

पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघातानंतर मृत्यू

राजापूर – ६ फेब्रुवारीच्या दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर अतीवेगाने येणार्‍या महिंद्रा थार या गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते घायाळ झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हालवण्यात आले होते; मात्र ७ जानेवारीच्या सकाळी त्यांचे निधन झाले. थारचे चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात ३०८ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून या अपघातात मृत झालेल्या वारीसे यांच्या नातेवाइकांनी हा प्रकार घातपाताचा असल्याचा आरोप केला आहे.

६ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी ‘रिफायनरी ग्रुप’मध्ये एका बातमीची ‘पोस्ट’ केली होती. ‘‘मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फलकांवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींची छायाचित्रे’’ अशा आशयाच्या बातमीचे ते कात्रण होते. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या फलकासंदर्भातील ही बातमी होती. यानंतर दुपारी १.१५ वाजता हा अपघात झाला होता.

नातेवाइकांचा आरोप

वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपानंतर चालक आंबेरकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची ‘पोस्ट’ टाकतो त्याच्याच गाडीला धडक बसून त्याचा मृत्यू होतो हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप वारीसे यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

(सौजन्य : ABP MAJHA)

आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद करण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी

सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो. हा योगायोग असू शकत नाही. हा ठरवून घडवून आणलेला घातपात आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त, पत्रकार हल्लाविरोधी कृृती समितीचे राज्यप्रमुख एस्.एम्. देशमुख यांनी केली आहे. या प्रकरणी आरोपीस अटक केली गेली असली, तरी आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद केला जावा, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.