सौंदर्यवती पद्मावतीला प्राप्त करण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी निरनिराळ्या योजना आखू लागला. तो लवकरच सेनेसह मेवाडकडे निघाला. ‘देहलीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी मेवाड जिंकण्यासाठी नाही, तर केवळ महाराणी पद्मावतीला प्राप्त करण्यासाठी येत आहे’, हे ऐकल्यावर राजपूत संतापाने क्रोधित झाले. राजपुतांनी गर्जना केली, ‘‘नाही ! नाही !! नाही !!! आम्ही असे होऊ देणार नाही.’’ याविषयी पद्मावती म्हणाली,
मेवाड रक्षणासाठी । या नश्वर देहासाठी ।
हे विचार करणे कसले । द्या ठार करूनी मज आता ।
मग राजधर्म रक्षावा ॥
‘स्वामी, मेवाड रक्षणासाठी मला ठार करावे’, हे महाराणी पद्मावतीचे बोलणे ऐकल्यावर महामंत्री जालीमसिंह पुढे येऊन हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘महाराणी, आपण धन्य आहात; पण हा वैयक्तिक प्रश्न नाही, तर समस्त राजपूत जातीचा प्रश्न आहे. शत्रूने येऊन आमच्या स्त्रीरत्नांचा अपमान करावा आणि तरीही आम्ही कासावीस न होता निमूटपणे सर्व सहन करावे ? इतका मेवाड असमर्थ झालेला नाही, देवी !’’
कपटी सुलतानाने कट-कारस्थान रचून गडाला वेढा घातला; पण पद्मावतीला मिळवण्याच्या प्रयत्नांत तो या वेळी अयशस्वी ठरला; पण त्याने महाराणा रतनसिंहांना बंदिस्त केले. पद्मावती धैर्याने म्हणाली, ‘‘सुलतानास कळवावे की, आम्ही आमच्या ७०० दासी आणि मैत्रिणी यांसह देहलीला यायला सिद्ध आहोत; पण त्याआधी सुलतानाने गडाभोवतीचा वेढा काढून आपले सैन्य तूर्तास देहलीला पाठवावे. आमच्या पालख्या छावणीत आल्यावर प्रथम महाराणा स्वामींच्या तंबूकडे नेल्या जातील. त्या वेळी त्या तंबूवर पहारा नसावा. आमची भेट संपताच स्वामींना मुक्त करावे.’’ या गनिमी काव्याद्वारे महाराणांना तिकडून पसार केले आणि ते गडावर सुखरूप पोचले. ३ वर्षांनी अल्लाउद्दीन खिलजी पुन्हा चितोडमध्ये आला. या वेळी राजपुतांचा पराभव होणार असल्याचे लक्षात आल्यावर महाराणी म्हणाली, ‘‘आम्ही जोहार करून पतीव्रता धर्माचे पावित्र्य राखू. अग्नीत प्रवेश करणार.’’
महाराणी पद्मावती आणि अन्य राजपूत स्त्रिया यांचा जोहार !
२६.८.१३०३ ची सकाळ. चितोेड आणि राजपूत जाती यांच्या नाशाचा काळाकुट्ट दिवस ! सर्वांगावर केसरिया बाणा धारण केलेले राजपूत वीर शेवटचा निरोप घेण्यासाठी रांगेने उभे होते. गुहेतील आणि गुहेबाहेरील चंदनी चितांनी पेट घ्यायला प्रारंभ केला होता. सर्व राजपूत स्त्रियांनी सोळा शृंगार केले होते. महाराणी पद्मावती आरतीचे ताट घेऊन पुढे आली. हसतमुखाने तिने पतीच्या कपाळावर ओल्या कुंकवाचा लालजर्द टिळा लावला आणि ताटातील पुष्पहार महाराणा रत्नसिंंहाच्या गळ्यात घातला. तिने पतीच्या पायांना स्पर्श करून तेच हात डोक्यावरून फिरवले अन् म्हणाली, ‘‘स्वामी, आता आम्हाला प्रसन्न चित्ताने आमच्या पतीव्रता धर्माचे पालन करण्यासाठी सर्व भावनांतून मुक्त करावे. राणाजी, मोहमायेचा त्याग करून आपणही शत्रू सैन्याचे कर्दनकाळ ठरावे. आपल्या पुढे जाऊन पवित्र स्वर्गवेदीवर आम्ही आपली प्रतीक्षा करत आहोत.’’ इतके बोलून ज्या ठिकाणी अग्नी लपालप सहस्र जिभांनी धडाडत होता, त्या गुहेत ती निघून गेली. तेथील प्रत्येक स्त्रीने तिचे अनुकरण केले.
या जोहार सोहळ्यात १ – २ नाही, तर १५ सहस्र स्त्रियांनी प्राणाहुती दिली. गर्वाने राजपुतांच्या माना ताठ होत्या. त्यांच्या डोळ्यांत रक्त उतरत होते. त्यांचे बाहू स्फुरण पावत होते. त्यांचे हात तलवार चालवण्यासाठी सळसळत होते. घोड्यावर स्वार होऊन केसरिया परिधान केलेले एकेक रण बांकुरे (रणवीर) भुकेलेल्या सिंहासारखे शत्रू सैन्यावर तुटून पडले. भयंकर कापाकापीला प्रारंभ झाला. सर्व राजपूत मुळा आणि गाजर कापल्याप्रमाणे यवन सैनिकांची मुंडकी उडवू लागले. रणांगणात जणू महांकाळाचे तांडवच चालू झाले.
महाराणा राजपुताला साजेल अशा वीरतेने लढले आणि राजपुती गौरवाचे संरक्षण करत धारातीर्थी पडले. अल्लाउद्दीन आनंदाने ओरडला, ‘‘आमचा विजय झाला. आता चितोडची महाराणी पद्मावती माझी आहे.’’ राजा मालदेव म्हणाला, ‘‘आता त्या कधीच मिळणार नाहीत; कारण जसे राजपूत विरांनी क्षात्रधर्माचे पालन करत वीरगती प्राप्त केली, त्याचप्रमाणे राजपूत स्त्रियांनी पतीव्रता धर्माचे पालन करत जोहार केला आणि तेजस्वी इतिहास घडवला. स्वतःचे जीवन कृतार्थ केले.’’
– ह.भ.प. (सौ.) श्रेया साने, गोवा. (वर्ष २०१७)