प्रवाशांनी तक्रारी केल्यास वाढीव शुल्क आकारणार्‍या ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई करू ! – शंभूराज देसाई, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन मंत्री

विधानपरिषद लक्षवेधी २०२२

चारचाकी वाहनांची नोंदणी करतांना सर्व नियमांची पूर्तता हवी !

शंभूराज देसाई

नागपूर – नाशिक-संभाजीनगर मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून ‘यापुढे चारचाकी वाहनांची नोंदणी करतांना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची निश्चिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी’, असे निर्देश देण्यात आले आहेत. सणांच्या वेळी बाहेरगावी प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून अधिक प्रमाणात तिकिटांचे शुल्क आकारण्यात येते; मात्र प्रवाशांकडून संबंधित ट्रॅव्हल्स चालकांविरोधाच्या तक्रारी केल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. प्रवाशांनी तक्रारी केल्या, तर ट्रॅव्हल्स चालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रभारी उपप्रादेशिक परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांनी २३ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिले. सदस्य सचिन अहिर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देतांना बोलत होते.

सचिन अहिर म्हणाले की, ८ ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजता नाशिक ते संभाजीनगर मार्गावर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला मोठा अपघात झाला होता. बसला आग लागून १२ प्रवाशांचा मृत्यू, तर ३८ प्रवासी गंभीर घायाळ झाले होते. नाशिक येथील सप्तशृंगी गड ग्रामपंचायत पथकर नाक्याजवळ एस्.टी. बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. राज्यात वारंवार असे रस्ते अपघात होत असतांना पोलीस यंत्रणा आणि परिवहन विभाग गंभीर नाही. वाहनचालक बेधडकपणे प्रवासी कोंबून प्रवाशांकडून वाढीव भाडे वसूल करून त्यांची लुबाडणूक करत आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे ? असे प्रश्न उपस्थित केले.

आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून वाहन परवाना रहित !

याला उत्तर देतांना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, खासगी बसचा अपघात होऊन आगीत काही प्रवाशांचा मृत्यू होणे ही गोष्ट गंभीर आहे. आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याप्रकरणी चिंतामणी टॅ्रव्हल्स चालकांवर गुन्हा नोंद करून वाहन परवाना आणि वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रहित करण्यात आले आहे. याविषयी कडक धोरण राबवणार असून भरारी पथकांच्या क्षमतेत वाढ करण्यात येईल. भरारी पथक अधिक कार्यक्षमतेने कार्यरत करणार असून पथकाला लक्षांक देऊन वाहने पडताळण्याचे काम करणार आहे. यासाठी परिवहन उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांद्वारे कडक देखरेख केली जाईल.

३ सहस्र ८८५ वाहनांमध्ये विविध दोष आढळले !

शंभूराज देसाई म्हणाले की, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लागावी आणि अपघात अल्प करण्यासाठी २४ घंटे विशेष पडताळणी मोहीम चालू करणार आहे. वाहन सुस्थितीत असल्याचे वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये लावणे बंधनकारक करण्यासाठी नियमावली सिद्ध केली जाईल. हे प्रमाणपत्र लावण्ो सक्तीचे केले जाईल. ऑक्टोबर २०२२ मध्ये विशेष मोहिमेतंर्गत वाहनांची पडताळणी केली असता ३ सहस्र ८८५ वाहनांमध्ये विविध दोष आढळले आहेत.

परिवहन विभागात नवीन बसविषयी निर्णय घेतला जाईल !

ते म्हणाले की, परिवहन विभागात ५ सहस्र ५०० वाहने नवीन घेण्यात आली आहेत. काही डिझेलवरील वाहने ‘सी.एन्.जी.’वर केली आहेत, तसेच जुन्या आणि वापरास योग्य नसलेल्या एस्.टी. बस नवीन घेण्यासाठी निर्णय घेतला जाईल.

अधिक भाडे आकारणार्‍या ४९८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !

विविध सणांच्या कालावधीत खासगी टॅ्रव्हल्सचालकांना दीडपट भाडे आकारण्याची शासनाने अनुमती दिली आहे. तरीही अनेक ट्रॅव्हल्सचालक प्रवाशांकडून १ सहस्र ५०० ते २ सहस्र रुपये वाढीव भाडे आकारतात. असे प्रत्येक जिल्ह्यात होत आहे; मात्र प्रवाशांकडून याविषयी तक्रारी केल्या जात नाहीत. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई करता येत नाही. असे असले, तरी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने पडताळणी करून विविध सणांच्या कालावधीत अधिक भाडे आकारणार्‍या एकूण ४९८ खासगी टॅ्रव्हल्सचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.