(म्हणे) ‘स्टेन स्वामी यांना गोवण्यासाठी संगणकात पुरावे पेरण्यात आले !’

  • कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

  • अमेरिकेतील न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळेचा दावा !

शहरी नक्षलवादी आणि कथित सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी

वॉशिंग्टन (अमेरिका) – महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी अमेरिकेतील ‘आर्सेनल कन्सल्टिंग’ या न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळेने शहरी नक्षलवादी आणि कथित सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांच्या संगणकात डिजिटल पुरावे (गुन्हेगारी कागदपत्रे) पेरण्यात आल्याचा दावा तिच्या अहवालात केला आहे.

१. या अहवालात म्हटले आहे की, संगणकाचे डिजिटल फूटप्रिंट प्रथम स्पायवेअरने हॅक केले गेले. यानंतर हॅकरने जवळपास ५० धारिका संगणकामध्ये पेरल्या. स्वामी आणि माओवादी बंडखोर यांच्यात संबंध असल्याचे सिद्ध करणारे दस्तऐवज संगणक ड्राइव्हमध्ये ठेवण्यात आले होते. स्वामी यांचे संगणक २० जुलै २०१७ या दिवशी पहिल्यांदा हॅक करण्यात आल्याचा दावाही प्रयोगशाळेने केला आहे. त्यानंतर ५ जून २०१९ या दिवशी त्यांच्या संगणकावर कागदपत्रे पाठवण्यात आली.

२. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) वर्ष २०२० मध्ये आरोप केला होता की, स्टेन स्वामी यांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते आणि विशेषतः ते प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या संपर्कात होते.

३. स्टेन स्वामी ऑक्टोबर २०२० पासून तळोजा कारागृहात होते. येथे त्यांचा वर्ष २०२१ मध्ये आजारपणामुळे मृत्यू झाला.

संपादकीय भूमिका

  • स्टेन स्वामी यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. शहरी नक्षलवादी स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. अन्वेषण यंत्रणांची कारवाई खोटी ठरवण्यासाठी आणि नक्षलवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी आता २ वर्षांनंतर अशा प्रकारचा दावा करण्याचा प्रयत्न अमेरिकेतील संस्था करत आहे, असेच म्हणायला हवे !
  • भारतात नक्षलवादी कारवाया करणार्‍यांना आंतरराष्ट्रीय पाठबळ आहे, हे पुन्हा एका अमेरिकी संस्थेच्या दाव्यामुळे सिद्ध झाले !