सातारा, ९ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात सीमाप्रश्नी वातावरण वेगळे वळण घेऊ लागले आहे. केंद्र सरकारने दोन्ही राज्यांची बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढावा, अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. सोलापूर, अक्कलकोट, सुरगणा भागांतील नागरिकांना कुणी भडकावत आहे का ? याची पडताळणी झाली पाहिजे. ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील वाहतूक सुरळीत झाली आहे. सीमाप्रश्नी शिंदे गटाचे खासदार लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहेत. शंभूराज देसाई यांनी सातारा येथील निवास्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेव्हा ते बोलत होते.
(सौजन्य : Jai Maharashtra News)
मंत्री देसाई पुढे म्हणाले की, मी आणि मंत्री चंद्रकांत पाटील बेळगावला गेलो नाही, म्हणून आम्ही षंढ असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. खासदार राऊत यांना न्यायालयीन कामकाजासाठी बेळगाव येथे जायचे होते; मात्र आक्रमण होईल अथवा अटकेच्या भीतीने ते बेळगावला गेले नाहीत. एवढी भीती वाटत होती, तर दुसर्याला षंढ का म्हणता ? खासदार राऊत हे समाजहितासाठी नाही, तर पत्राचाळ घोटाळाप्रकरणी कारागृहात गेले होते. ‘राऊतसाहेब जामिनावर बाहेर आहात, सुटका झाल्यासारखी छाती बडवू नका’, असा सल्ला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार राऊत यांना दिला.