महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. या प्रकरणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना केले. ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही’, असेही बोम्माई यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना दूरभाष करून चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा वाद सोडवण्यासाठी गृहमंत्री शहा यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री बोम्माई यांना विचारले असता त्यांनी वरील विधान केले.
Told BJP brass won’t cede inch to Maharashtra, says Karnataka CM Basavaraj Bommai https://t.co/kd5fr6QLlx
— The Times Of India (@timesofindia) December 9, 2022
बोम्माई पुढे म्हणाले की, नड्डा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दूरभाष करून शांतता राखण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात असलेल्या कन्नड भाषिकांचे रक्षण करण्याविषयी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्याशीही चर्चा झाली आहे.