वैराग्यस्वरूप, क्षमाशील आणि भक्तवत्सल असणारे दत्तात्रेय !

‘भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत शिष्य अवस्थेत वावरतात. शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.

१. दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम असणे

कु. मधुरा भोसले

‘भगवान दत्तात्रेय म्हणजे ‘ब्रह्मा, विष्णु आणि महेश’ या त्रिमूर्तींचे रूप ! ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप, श्रीविष्णु वात्सल्यस्वरूप अन् शिव वैराग्यस्वरूप आहे. अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणार्‍या दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे.

२. वैराग्य आणि संन्यस्त

भगवान दत्तात्रेयांमध्ये वैराग्य असल्यामुळे ते संन्यस्त जीवन व्यतीत करतात. त्यांचा निवास मेरुशिखरावर असतो. संध्या आणि अन्य दिनक्रम ते इतर ठिकाणी पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती प्रबळ असल्याने त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही. त्यामुळे ते ‘स्वेच्छाविहारी’ आहेत. ते जीवनमुक्त असल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विचरण करतात. दत्तात्रेय आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याचा आशीर्वाद देतात. जगात सर्व काही मिळू शकेल; परंतु देवदुर्लभ असे वैराग्य केवळ श्रीगुरुकृपेनेच मिळते.

३. अखंड शिष्यभावात असणे

भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत शिष्य अवस्थेत वावरतात. शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे. शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय होय. श्रीमद्भागवताच्या ११ व्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. ‘आपण कोणते गुरु केले आणि त्यांच्यापासून काय बोध घेतला’, हे अवधूत यांनी यांत सांगितले आहे. त्यांच्या शिष्यावस्थेमुळेच त्यांनी २४ गुरु आणि २४ उपगुरु केले. ते प्रत्येक प्राणीमात्राला गुणगुरु मानतात आणि प्रत्येकाकडून शिकत असतात.

४. क्षमाशील

शिष्य कितीही चुकला, तरी गुरु त्याला क्षमा करून पुन्हा शिकण्याची संधी देतात, याचे उत्तम उदाहरण भगवान दत्तात्रेय आहेत. ते केवळ शिष्याचे दोष क्षमा करत नसून विरोधकांचे अपराधही क्षमा करून त्यांचा उद्धार करतात. श्रीपादश्रीवल्लभ यांचा द्वेष करणार्‍या ‘नरसावधानी’ नावाच्या मनुष्याला कर्मफलन्यायानुसार कठोर शिक्षा मिळाली होती. तेव्हा त्याने श्रीपादश्रीवल्लभांचे चरण धरले. यावर क्षमाशील वृत्तीच्या श्रीपादश्रीवल्लभांनी नरसावधानीला क्षमा करून त्याचा उद्धार केल्याचे उदाहरण श्रीपादश्रीवल्लभ यांच्या जीवनचरित्रात आढळते. दत्तगुरूंच्या क्षमाशीलतेची अनेक उदाहरणे गुरुचरित्रात आपल्याला पहावयास मिळतात.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०१६)