खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लुट थांबवण्यासाठी ‘सुराज्य अभियान’
ठाणे – राज्यातील बहुतांश खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट नोंदणी केंद्रांवर अद्यापही शासनमान्य तिकीटदर लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येत्या दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची पुन्हा लुटमार होण्याची शक्यता आहे. ‘आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाने ठाणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील आणि कल्याण येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. २ वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देतांना अधिवक्ता शुभम देसाई, अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, हिंदु धर्माभिमानी राकेश गोडांबे, अतुल शिरसाट आणि रूपेश भोईर उपस्थित होते.