‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !
मुंबई – प्रादेशिक परिवहन विभागाकडून खासगी ट्रव्हल्सवाल्यांकडून घेतल्या जाणार्या अवाजवी शुल्काविषयी किती कारवाया केल्या, याची ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी राज्यभरात अनेक ठिकाणी विचारणा केली असता बहुतांश ठिकाणी देण्यात आलेल्या माहितीत वाढीव दराच्या संदर्भात अत्यंत तुटपुंजी कारवाई केल्याचे आढळून आले. परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीत बहुतांश कारवाया या मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, अग्नीशमन यंत्रणेचा अभाव, तांत्रिक कारणांची पूर्तता केलेली नसणे, नावांच्या पाट्या योग्य पद्धतीने नसणे, प्रवाशांना सोयी न देणे अशाच प्रकारच्या होत्या. यावरून प्रादेशिक परिवहन विभागाला वाढीव दराच्या संदर्भात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाई करण्यात रसच नसल्याचे स्पष्ट होते.
आर्थिक लुटीचा पर्दाफाश करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची चळवळ स्तुत्य उपक्रम ! – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, कोल्हापूरआर्थिक लुटीचा पर्दाफाश करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची चळवळ हा ‘सनातन प्रभात’चा ‘स्तुत्य उपक्रम’ आहे, असे मत कोल्हापूर येथील विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी व्यक्त केले. ‘सनातन प्रभात’च्या वतीने चालवण्यात येणार्या चळवळीची माहिती सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी त्यांना दिल्यावर त्यांनी हे मत व्यक्त केले. |
सातारा येथे खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाईसाठी विशेष मोहीम; परंतु नियमबाह्य तिकीटदर आकारणार्यांवर कारवाई नाही !
सातारा – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कारवाईसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये आतापर्यंत २७ हून अधिक खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली. प्रवासी वाहतुकीसाठी अनुमती नसतांना प्रवाशांची ने-आण करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, आवश्यक कागदपत्रे नसणे, अग्नीशमन यंत्रणा बंद स्थितीत असणे, वाहन कर न भरणे आदी कारवाया करण्यात आल्या आहेत. चालू वर्षांत सप्टेंबरपर्यंत ५३३ खासगी बसगाड्यांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. भविष्यात खासगी बसगाड्यांच्या पडताळणीची मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. राहुल कोल्हापुरे यांना दिली.
राज्यातील अन्य जिल्ह्यांतही वरीलप्रमाणे कारवाया झाल्याचे आढळून आले; परंतु अधिक दर आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना आढळून आले.