राज्यातील एस्.टी.च्या भाड्यात १० टक्क्यांची शुल्कवाढ लागू !

  • प्रवाशांमध्ये तीव्र अप्रसन्नता !

  • ३१ ऑक्टोबरपर्यंत भाडेवाढ लागू !

मिरज, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट चालू असतांनाच राज्य परिवहन महामंडळाने ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत एस्.टी.च्या प्रवासी भाड्यात २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्क्यांची शुल्कवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या लाल परीचा प्रवास महागला आहे. ‘एस्.टी.’ची ही हंगामी भाडेवाढ केवळ १० दिवसांसाठी म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत रहाणार असून ती साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही यांसाठी लागू रहाणार आहे. शिवनेरीला ही भाडेवाढ लागू रहाणार नाही, अशी माहिती येथील विभाग नियंत्रकांनी २१ ऑक्टोबर या दिवशी दिली. (दिवाळी चालू झाल्यावर खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट चालू असतांनाच प्रवाशांना दिलासा देण्याच्या ऐवजी ही भाडेवाढ करणे म्हणजे प्रवाशांच्या समस्येत भर घालण्यासारखेच आहे. – संपादक)

दिवाळीच्या १० दिवस पूर्वीपासूनच मुंबई, पुणे, संभाजीनगरसह अन्य शहरांमध्ये नोकरीनिमित्त गेलेले नोकरदार आणि शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी परत येण्यास प्रारंभ होतो. याच काळात महामंडळाने केलेली भाडेवाढ ही सर्वसामान्यांचा खिसा कापणारी असल्याच्या प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. ही शुल्कवाढ केल्याने अनेक प्रवासी अप्रसन्न झाले आहेत.

प्रवाशांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया

१. श्री. सतीश पाटील – राज्य परिवहन महामंडळाने एस्.टी.ची केलेली १० टक्के शुल्कवाढ अयोग्य आणि प्रवाशांची लूट करणारी आहे. एस्.टी.ने ही शुल्कवाढ केली, तरी खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत एस्.टी. चांगल्या पद्धतीची सुविधा देत नाही. सध्या मिरज ते पुणे एस्.टी.चे ३६५ रुपये भाडे आहे; मात्र खासगी ट्रॅव्हल्स ३७० रुपये शुल्क आकारतात, तसेच खासगी ट्रॅव्हल्समधून आरामदायी प्रवास होतो.

२. सौ. कल्पना देशमुख – एस्.टी.ची भाडेवाढ मान्य नाही. एस्.टी. स्वच्छ नसतात, एस्.टी. कोणत्या गावी जाणार आहे, याचे फलकही लावलेले नसतात. सुविधांची वानवा आहे. कोणतीही एस्.टी. वेळेवर येत नाही आणि जातही नाही. मग ही शुल्कवाढ कशासाठी ?

३. श्री. नामदेव माने – गरिबांची लूट करण्यासाठीच ही शुल्कवाढ केली आहे. १० दिवसांच्या भाडेवाढीतून अधिक उत्पन्न मिळाल्याने एस्.टी. महामंडळ कर्मचार्‍यांना १ मासाचा बोनस देते; मात्र खराब झालेल्या आणि दयनीय स्थितीत असलेल्या एस्.टी.कडे कुणीही लक्ष देत नाही, हे दुर्दैवी आहे.