मृत्यूनंतर समवेत नेण्याचे चलन म्हणजे साधना !

एक मोठे अतिशय धनाढ्य उद्योगपती होते. त्यांच्याकडे भरपूर गाड्या, बंगले यांसह त्यांची अनेक आस्थापने होती. कशालाच काही कमी नव्हते. एक दिवस ते गाडीमधून आस्थापनात जात असतांना त्यांनी वाहनचालकाला रेडिओ लावायला सांगितला. रेडिओवर कुठल्या तरी चॅनेलवर कुणाचे तरी आध्यात्मिक बोलणे चालू होते. ती व्यक्ती सांगत होती, ‘मनुष्य आयुष्यात भौतिक अर्थाने जे काही कमावतो, ते सर्वकाही मृत्यूसमयी त्याला येथेच सोडून जावे लागते. तो त्यातील काही म्हणजे काहीच घेऊन जाऊ शकत नाही.’ उद्योगपतीने हे ऐकल्यावर ते एकदम अंतर्मुख झाले. त्यांना एकाएकी जाणवले, ‘आपण जे काही प्रचंड वैभव उभारले आहे, त्यातील एकही रुपया मरतांना आपण आपल्या पुढल्या जन्मासाठी घेऊन जाऊ शकत नाही. सर्वकाही येथेच सोडून जावे लागणार आहे.’

१. स्वतः मिळवलेली अगणित संपत्ती मृत्यूनंतर कशी घेऊन जाता येईल, याविषयी उद्योगपतीने कर्मचार्‍यांना शोध घेण्यास सांगणे

त्या उद्योगपतींना एकदम कसे तरीच झाले. कमालीची अस्वस्थता आली. कार्यालयात पोचल्यावर त्यांनी तातडीने एक बैठक बोलावली. बैठकीला सगळे अधिकारी आणि कायदेतज्ञ बोलावले. उद्योगपतींनी सांगितले, ‘मी ही अगणित संपत्ती मिळवली आहे, ती मी मरतांना माझ्यासमवेत घेऊन जाऊ इच्छितो, तर मी ती कशी घेऊन जाऊ शकतो ? ते मला तुम्ही नीटपणे, विचारपूर्वक सांगा.’ सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. ‘साहेब आज काहीतरी असंबद्ध काय बोलत आहेत ? मरतांना तर कुणालाच काही समवेत नेता येत नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि हे तर ढीगभर संपत्ती समवेत न्यायची भाषा बोलत आहेत. हे कसे जमणार ?’, असे प्रश्न त्यांच्या मनात चालू झाले.

उद्योगपतींनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितले. ‘जो कुणी मला यासाठी १०० टक्के प्रभावी पद्धत सांगेल, त्याला मी अमाप संपत्ती देईन’, असे घोषित केले. त्यामुळे प्रत्येक जण पद्धत शोधायचा प्रयत्न करू लागला, माहिती काढू लागला. प्रत्येक जण अथक प्रयत्न करत होता; पण उत्तर काही सापडत नव्हते. उद्योगपती दिवसागणिक उदास होत होते. मग त्यांनी यासाठी विज्ञापने दिले. भलेमोठे बक्षीस ठेवले.

२. मृत्यूनंतर ‘साधना’ नावाचे चलन घेऊन जाता येते, याविषयी एका व्यक्तीने उद्योगपतींना समजावून सांगणे

एक दिवस अचानक एक माणूस या उद्योगपतीच्या कार्यालयामध्ये आला. तो उद्योगपतीला भेटला. तो म्हणाला, ‘‘माझे नाव श्याम आहे. मला तुम्हाला काही विचारायचे आहे. त्यानंतर मी यावर काही उत्तर सांगू शकेन.’’ उद्योगपतींनी त्याला ‘विचार’ म्हणून सांगितले. त्यावर त्यांच्यात पुढील संभाषण झाले.

श्याम : तुम्ही कधी अमेरिकेला गेला आहात का ?
उद्योगपती : हो.

श्याम : तुम्ही तेथे खरेदी केली आहे का ?
उद्योगपती : हो.

श्याम : पैसे कसे दिले ?
उद्योगपती : कसे म्हणजे ? आपले पैसे देऊन अमेरिकी डॉलर्स विकत घेतले आणि दिले.

श्याम : अन्य कुठल्या कुठल्या देशात गेला आहात ?  तिथे काय खरेदी केले आणि कोणकोणते चलन वापरले ?   
उद्योगपती : ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाचे डॉलर्स, सिंगापूरला सिंगापूर डॉलर्स, जपानला येन, बांगलादेशला टका, सौदी अरेबियाला रियाल, दुबईला दिरहाम, युरोपला युरो हे चलन म्हणून वापरले. म्हणजेच ज्या ठिकाणी जी चलने चालतात, तीच घेऊन वापरावी लागतात.

श्याम : म्हणजे तुमच्याकडे असलेले पैसे हे सर्व ठिकाणी जसेच्या तसे चालत नाहीत. ते तुम्हाला देशानुरूप आणि जागेनुरूप पालटून घ्यावे लागतात. मग त्याच न्यायाने तुम्हाला तुमचे पैसे देऊन त्याबदल्यात मृत्यूनंतर वापरायचे चलन देखील विकत घ्यावे लागेल. तिथे तुमचे रुपये कसे चालतील ? तिथे हे चलन चालणार नाही; कारण मृत्यूनंतरचे चलन ‘साधना’ आहे. तेथे तुम्हाला ते घ्यावे लागेल. मगच तुम्हाला ते वापरता येईल. तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हाला ‘साधना’ नावाच्या चलनामध्ये रूपांतर करून घ्यावे लागेल. मगच ते समवेत नेता येईल आणि तिथे वापरता येईल.
उद्योगपतीच्या लक्षात आले की, शेवटी ‘साधना’च समवेत न्यायला हवी. पृथ्वीवरील चलन असेच पालटून घ्यावे लागेल. त्यासाठी नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, धर्माचरण करावे लागते आणि ते समवेत नेता येईल. उद्योगपतीला त्याच्या प्रश्नाचे यथार्थ उत्तर मिळाले. ते श्यामच्या पाया पडले. त्याला योग्य पुरस्कार देऊन त्याचा सत्कार केला.

उद्योगपतीने ठरवले की, आता जे काही मिळवले आहे, ते ‘साधना’ नावाच्या चलनामध्ये पालटून घ्यायचे. शेवटपर्यंत तेच करायचे. (मृत्यूनंतर) वर जातांना तेवढे पुरे आहे.

(साभार : सामाजिक संकेतस्थळ)

पाण्यात आणि मनात साम्य काय ?

पाणी आणि मन हे दोन्ही जर गढूळ असतील, तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात. दोन्ही जर उथळ असतील, तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात. दोन्ही स्वच्छ असतील, तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात; पण पाण्यात आणि मनात मुख्य भेद तो काय ? पाण्याला बांध घातला, तर पाणी ‘संथ’ अन् मनाला बांध घातला, तर माणूस ‘संत’ होतो.
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)