मुख्यमंत्री कार्यालयातील श्री सत्यनारायण पूजेच्या विरोधात मानवी हक्क कार्यकर्त्याची राज्यपालांकडे तक्रार !
मुंबई, १० जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घातलेली सत्यनारायणाची पूजा म्हणजे भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वाची पायमल्ली आहे, अशी दर्पाेक्ती पुणे येथील मानवी हक्क कार्यकर्ते अधिवक्ता विकास शिंदे यांनी केली. शिंदे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
तक्रारीमध्ये अधिवक्ता विकास शिंदे यांनी लिहिले आहे की,
१. सरकारच्या वर्ष २०१७ च्या परिपत्रकानुसार, ‘कोणतेही सरकारी, निमसरकारी कार्यालय, तसेच शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करता येणार नाहीत. देवतांची चित्रे लावता येणार नाहीत’, असे स्पष्ट लिहिले आहे.
२. राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला काळीमा फासण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून होत असेल, तर शासनाच्या अन्य यंत्रणांकडून धर्मनिरपेक्ष वागणुकीची अपेक्षा ठेवणे खुळेपणाचे ठरते.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केल्याने अथवा अल्पसंख्यांकांच्या हितासाठी वेगळे मंत्रालय उघडल्याने अथवा काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाल्याने भारतीय राज्यघटना धोक्यात येत नाही; परंतु सरकारी कार्यालयात सत्यनारायणाची पूजा घातल्यामुळे राज्यघटना धोक्यात येते ? अशा प्रकारे सोयीने धर्मनिरपेक्षता अवलंबणार्यांमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे, हे लक्षात घ्या ! |